प्लास्टिकच्या पर्यायाचा व्यवसाय

जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे पर्यावरण दिनाचे प्रदर्शन घडविणारे कार्यक्रम झाले. कचरा गोळा करणे हा पर्यावरण दिनाचा मुख्य कार्यक्रम असतो. तो सर्वत्र मोठ्या उत्साहात उत्साहात पार पडला. समुद्र आणि नद्यांची किनारपट्टी, रस्ते, गटारे, बागा, क्रीडांगणे, शासकीय कार्यालयांचे आवार आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक गोळा करण्यात आले. प्लास्टिकचा कचरा पर्यावरणाला किती हानिकारक आहे, याबद्दलची चर्चासत्रे, भाषणे ठिकठिकाणी झाली. पण हा कचरा का निर्माण होतो, याच्या मुळाशी जाऊन त्यादृष्टीने कधीच विचार होत नाही. अधूनमधून वेगवेगळ्या समारंभांच्या आणि दिनविशेषांच्या निमित्ताने प्लास्टिक गोळा करणे हाच कार्यक्रम राबविला जातो. प्लास्टिक आणि थर्माकोल हे पर्यावरणाला अत्यंत हानिकारक घटक असतील तर ते तयारच होणार नाहीत, त्यांची निर्मिती थांबेल, अशी व्यवस्था करणे सरकारच्याच हातात आहे. निर्मितीवरील बंदी सरकारने निक्षून अमलात आणली पाहिजे. मात्र त्याबाबतीत आनंदीआनंदच आहे. प्लास्टिक आणि थर्माकोलची निर्मिती झालीच नाही, तर ते प्रदूषणकारी घटक कचऱ्यात फेकले जाण्याची आणि पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यताच नाही.

प्लास्टिकच्या निर्मितीवरील बंदी अमलात येण्याची मात्र शक्यता नाही. त्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे प्लास्टिकला कोणताही पर्याय उपलब्ध झालेला नाही. निर्मितीवर बंदी घालण्याऐवजी प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्याचा फतवा काढला जातो. खास अभियान राबविले जाते. त्या काळात प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होते. त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. हे सारे केले की सरकारची पर्यावरणरक्षणाबाबतची जबाबदारी संपते. मुंबईसह कोकणासारख्या अतिपाऊस असलेल्या भागात प्लास्टिकला किती महत्त्व आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पावसाळ्याच्या चार महिन्यांकरिता प्लास्टिकला कोणताही पर्याय उपलब्ध नाही. अनेक शेतकऱ्यांची घरे, गोठे, प्लास्टिकनेच आच्छादलेले असतात. शेतीकरिता वापरली जाणारी इरली आणि पावसाळ्यापासून संरक्षण करणाऱ्या घोंगड्यांनाही प्लास्टिकचे आवरण दिले जाते. पावसापासून बचाव करण्यासाठी त्याला कोणताच पर्याय नसतो. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या मुलांच्या दप्तरापासून ते दूध, तेलासारख्या दैनंदिन वापराच्या अनेक गरजा प्लास्टिकचा वापर केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. पाण्यापासून संरक्षण मिळण्यासाठी प्लास्टिक हा सध्या तरी अत्यंत उत्तम पर्याय आहे.

असे असले तरी प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होणार असेल, तर प्लास्टिकचा वापर थांबवायला हवा, यात कोणतीच शंका नाही. मात्र अचानक हा वापर थांबविता येणार नाही. त्याला कोणता तरी तितकाच समर्थ पर्याय दिला गेला पाहिजे. हा पर्याय उपलब्ध करणे मोठे आव्हानाचे आहे. हेच आव्हान स्वीकारले गेले पाहिजे. त्याबाबत अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. पर्यावरणस्नेही प्लास्टिकची निर्मितीही केली जात आहे. मात्र प्रदूषणकारी प्लास्टिकएवढे ते किफायतशीर नाही. सहज परवडणारे नाही. म्हणूनच त्यावर संशोधन आणि त्यातून निर्मिती झाली पाहिजे. प्लास्टिकचा शोध जेव्हा लागला, तेव्हा ज्या गोष्टींचा विचार झाला होता, तसाच विचार करून नवनिर्मिती झाली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केबीबीएफ या संघटनेतर्फे ग्लोबल मीट आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये व्यवसायाच्या विविध विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा होणार आहे. याच संघटनेने स्वतःची कंपनी स्थापन करण्याचेही ठरविले आहे. अशाच प्रयत्नांमधून प्लास्टिकला पर्याय ठरणाऱ्या पर्यायावर संशोधन आणि त्याचे उत्पादन असा एखादा प्रकल्प संघटनेला हाती घ्यायला हरकत नाही. त्याबाबत या मीटमध्ये किंवा भविष्यातही विचार व्हावा. केवळ उद्योग-व्यवसाय म्हणून नव्हे, तर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी हा व्यवसाय उपयुक्त ठरणार आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ९ जून २०२३)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply