जी-ट्वेंटीच्या अंतर्गत देशभरात होत असलेल्या परिषदांपैकी एक परिषद रत्नागिरीजवळ शिरगाव येथे होत आहे. त्यानिमित्ताने स्थानिक महिला बचत गटांच्या चळवळीला आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. जी-ट्वेंटी (ग्रुप ऑफ ट्वेंटी) हा जगभरातील १८ देश आणि युरोपियन युनियन यांचा समावेश असलेला एक आंतरराष्ट्रीय मंच आहे. जागतिक आर्थिक धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांना एकत्र आणण्यासाठी १९९९ साली या गटाची स्थापना करण्यात आली. गटाच्या सदस्य देशांमध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की आणि युनायटेड स्टेट्स यांचा समावेश आहे. याशिवाय युरोपीय संघातील २७ देशांचा सहभाग आहे. जागतिक सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के आणि जगाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व हा गट करतो. माहिती तंत्रज्ञान, सेवा, कृषी आणि अन्य उत्पादने यांसारख्या क्षेत्रांसह भारताची अर्थव्यवस्था वैविध्यपूर्ण आहे. जी-ट्वेंटीमध्ये भारताच्या सहभागाचा उद्देश भारताच्या विकासाचा कार्यक्रम पुढे नेणे, आर्थिक समावेशनाला चालना देणे आणि हवामान बदलासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देणे हा आहे.
अशा तऱ्हेने दोनतृतीयांश जगाशी थेट संबंध असलेल्या जी-ट्वेंटी गटाचे यजमानपद वर्षभरासाठी भारताकडे आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचे नेतृत्व करत आहेत. या परिषदेमार्फत देशभरातील विविध समस्यांची चर्चा व्हावी, त्यावर उपाययोजना करता यावी, चांगल्या गोष्टी जगासमोर याव्यात, यासाठी ठिकठिकाणी छोट्या परिषदा घेतल्या जात आहेत. देशभरात अशा पद्धतीने २०० परिषदांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील एक परिषद महिलांसाठी आहे. त्याकरिता मुंबईच्या श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. या विद्यापीठाशी रत्नागिरीजवळच्या शिरगाव येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महिला संगणक महाविद्यालय संलग्न आहे. त्यामुळे विद्यापीठाने महिलांविषयीची एक परिषद घेण्यासाठी या महाविद्यालयाची निवड केली. तेथे बचत गटांविषयीची चर्चा आणि ऊहापोह होणार आहे.
बचत गटांच्या चळवळीचा प्रारंभ बांग्लादेशमध्ये झाला. पण नंतर ती भारतातही चांगलीच मूळ धरू लागली आहे. मात्र बचत गटांच्या कामांमध्ये तोच तोपणा येत आहे. सारख्याच उत्पादनांमुळे तयार झालेल्या मालाचा उठाव होत नाही. शिवाय बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या विक्रीची व्यवस्था नाही, ही सगळ्यात मोठी समस्या आहे. प्रशासकीय पातळीवरही बचत गटांच्या बाबतीत मोठी उदासीनता आहे. त्यात नावीन्य यावे, तोचतोपणा टाळावा, केवळ वस्तूंची निर्मिती नव्हे, तर सेवा उद्योगांच्या अभावामुळे निर्माण होणारी पोकळी दूर करण्यासाठी बचत गटांचा उपयोग होऊ शकतो का, याचा विचार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी प्रशासनाची मानसिकता दिसत नाही. एक शासकीय उपक्रम म्हणूनच बचत गटांकडे पाहिले जाते. त्यातूनही अनेक समस्या उद्भवतात. हे आणि असे अनेक मुद्दे शिरगाव येथील परिषदेत मांडले जावेत, अशी अपेक्षा आहे. शनिवारी, १५ जुलै रोजी ही परिषद होणार आहे. त्याचे निष्कर्ष केंद्र सरकारपर्यंत पोहोचविले जाणार आहेत. अर्थातच ते जी-ट्वेंटी परिषदेमध्येही मांडले जाणार आहेत. एका परीने आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरीच्या दारी आली असून विविध ठिकाणच्या महिला बचत गटांविषयीचे अनेक मुद्दे प्रातिनिधिक स्वरूपात रत्नागिरीतून जागतिक व्यासपीठावर मांडले जाणार आहेत. त्यामुळे त्यातील समस्याही सोडविल्या जाऊ शकतील. आंतरराष्ट्रीय परिषदेची रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेली ही देणगीच म्हणावी लागेल.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १४ जुलै २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – १४ जुलै २०२३ रोजीचा अंक

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia14july
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : आंतरराष्ट्रीय परिषद आपल्या दारी
https://kokanmedia.in/2023/07/14/skmeditorial14july/
मुखपृष्ठकथा : जाऊ या ‘अपघात समृद्धी’कडून शून्य अपघातांकडे! : द्रुतगती महामार्गांवर सतत होत असलेले अपघात आणि वाहतूक कोंडी या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख…
रत्नागिरीत होणार जी-२० ची डब्ल्यू-२० परिषद
पावसाळ्याच्या खेळखंडोब्याला राज्यकर्तेच जबाबदार : अॅड. गिरीश राऊत यांचा लेख
उसवलेले धागे : यशवंत सुरोशे यांचा ललित लेख
कोकणवासीयाने साकारले शिवराज्याभिषेकाचे बोधचिन्ह : सुभाष लाड यांचा लेख
याव्यतिरिक्त, वाचक विचार, व्यंगचित्र आदी…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

