रत्नागिरीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर डुगवे या गावातील ओढ्यात एका पाषाणावर वैशिष्ट्यपूर्ण असे स्वयंभू श्री क्षेत्र लोटेश्वर वसलेले आहे. पावसाळ्यात तर इथले निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. त्याचा व्हिडिओ आणि त्या मंदिराविषयीची आख्यायिका येथे देत आहोत.
……………
रत्नागिरी तालुक्यातील कुरतडे या गावाजवळ असलेल्या डुगवे नावाच्या गावात स्वयंभू श्री क्षेत्र लोटेश्वर वसलेले आहे. कुरतडे या गावी चांदेराईमार्गे किंवा तोणदेमार्गे जाता येते. कुरतडे गावाच्या जवळच डुगवे हे गाव आहे. त्या गावातील या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराच्या परिसरातच त्या मंदिराविषयीची आख्यायिका दिलेली आहे. ती अशी –
डुगवे गावाच्या ओढ्यामध्ये पाषाणावर स्वयंभू श्री लोटेश्वराचे देवस्थान आहे. सद्यस्थितीमध्ये असलेल्या मंदिर परिसरात प्राचीन काळात घनदाट जंगल होते. गावामध्ये एक ब्राह्मणाचे घर होते (त्याचे नाव आता कोणालाही सांगता येत नाही.) त्या मालकाकडे गायी व बैल होते. ते सांभाळण्यासाठी एक गुराखी होता. तो गुराखी रोज गुरे चरविण्यासाठी घेऊन जायचा. त्यातील एक तान्ही गाय गुराख्याची नजर चुकवून नेहमी (जिये स्वयंभू श्री लोटेश्वर विराजमान आहेत तो पाषाण) येथे यायची. तेथे वेलीची मोठी जाळी निर्माण झाली होती. तेथून ती चढून उंच पाषाणावर जाऊन दुधाचा पान्हा सोडायची व परत गुरांमध्ये जाऊन मिसळायची. हे गुराख्याला माहिती नव्हते. घरी गाय दूध देत नसे म्हणून मालक गुराख्यावर दूधचोरीचा संशय घ्यायचा. एक दिवस गुराख्याने त्या गायीवर पाळत ठेवली. तेव्हा त्याच्या असे निदर्शनास आले की ती गाय वेलींच्या जाळीवरून जाऊन एका मोठ्या पाषाणावर पान्हा सोडतेय. हे पाहून तो अवाक झाला. पाहिलेला प्रकार त्याने आपल्या मालकाजवळ येऊन कथन केला.
हे ऐकून मालकाला क्रोध आला. तो हातात कोयती घेऊन आला आणि वेलींच्या वाटेने जाऊन त्याने त्या वेलीमध्ये अडकलेल्या भागावर घाव घातला आणि मोठा आघात झाला. वेलींचे दोर तुटून त्या ठिकाणी शिवलिंग दिसले. आघात झाल्यामुळे शिव-लिंगाला थोडा छेद गेला. (शिवलिंगावर झालेला आघात आजही दिसून येतो.) हा घडलेला प्रकार गावामध्ये हळूहळू समजला. सारे गावकरी या ठिकाणी जमा झाले. त्यांनी देवासमोर लोटांगणे घातली. शिवलिंगाचे दर्शन घडले तो दिवस पौष महिन्यातील सोमवार होता. सर्व ग्रामस्थांनी मिळून तेथील घनदाट जंगल साफ केले व पाषाणावर गवताचे (केंबळी) मंदिर बांधले व भाविकांना दर्शन घेण्यासाठी कळकाच्या (बांबूचा प्रकार) साह्याने पाषाणापर्यंत निसण (शिडी) तयार करण्यात आली. त्यानंतर पुढे ६०च्या दशकात वादळामध्ये मंदिराचे नुकसान झाले. त्यानंतर ग्रामस्थांनी मिळून कौलारू मंदिर उभे केले. पुढे जसजशी प्रसिद्धी होत गेली तसतसा मंदिराचादेखील कायापालट होत गेला. कौलारू मंदिराचे पुढे घुमटाकार मंदिरामध्ये रूपांतर झाले. २४ डिसेंबर २०१८ रोजी श्री प. पू. विद्यानृसिंह भारती स्वामी श्री जगद्गुरु स्वामी (शंकराचार्य करवीर पीठ) यांच्या शुभहस्ते मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा झाला.
श्री स्वयंभू लोटेश्वर पौष महिन्यात प्रकट झाले म्हणून आणि श्रींचे दर्शन प्रथम गुराख्याला झाले म्हणून पौष महिन्याच्या सोमवारी गुराख्यांचे जेवण म्हणून देवाचा नैवेद्य केला जातो व येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसादाचा लाभ घेता येतो. तसेच शिवरात्रीलादेखील श्री स्वयंभू लोटेश्वर मंदिरामध्ये शिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम साजरा केला जातो. हा पाषाण कोणत्याही आधाराविना ओढ्यामध्ये उभा आहे. पावसाळ्यामध्ये हा तराळी ओढा दुथडी भरून वाहत असतो. त्याचा यत्किंचितही परिणाम पाषाणावर दिसून येत नाही. श्री लोटेश्वरचरणी जो भक्त मनोभावे आपले गाऱ्हाणे मांडतो, त्याच्या सर्व इच्छा-मनोकामना पूर्ण होतात.

