राज्यातील पहिला प्रकल्प
दापोली : स्वच्छ एसटी आणि स्वच्छ बस स्थानक प्रकल्प निवेदिता प्रतिष्ठान आणि दापोली एसटी आगार यांच्या संयुक्तपणे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन आज झाले. राज्यातील अशा तऱ्हेचा हा पहिलाच प्रकल्प आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक एसटी बसमध्ये एक कचरा पिशवी चालकाच्या केबिनच्या मागील बाजूला बसवण्यात आली आहे. या पिशवीतच प्रवाशांनी प्रवास करताना आपल्याकडील पाण्याच्या रिकाम्या आणि थंडपेयाच्या बाटल्या आणि खाऊच्या रॅपर्सचा कचरा टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दापोलीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांनी या प्रकल्पाचे स्वागत करून राज्यातील पहिला स्वच्छ एसटी आणि स्वच्छ बस स्थानक प्रकल्प दापोलीतून सुरू होत असल्याचा अभिमान व्यक्त केला. प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्याची हमी त्यांनी दिली.
आगारप्रमुख रेश्मा मधाळे यांनी सांगितले की, निवेदिता प्रतिष्ठानमुळे स्वच्छता कार्यात राज्यात दापोली आगाराचा वेगळा ठसा उमटवणे शक्य झाले आहे. प्रवाशांनी या व्यवस्थेचा लाभ घेऊन पर्यावरण संवर्धन कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्थानकावर प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिक रॅपर्स टाकण्यासाठी दोन स्वतंत्र पिंजरे ठेवण्यात आले आहेत. त्याचा प्रवाशांनी वापर करायचा आहे. प्रवास करताना खाऊचे रॅपर्स आणि रिकाम्या बाटल्या खिडकीतून बाहेर अथवा गाडीत इतस्ततः न टाकता एसटीमधील कचरा पिशवीतच टाकायचा आहे. तसे आवाहनही आगार प्रमुख रेश्मा मधाळे यांनी यानिमित्ताने केले आहे.
प्रत्येक गाडी दापोली बसस्थानकात परत आल्यावर कचरा पिशवी बदलण्यात येणार आहे. या पिशवीत जमा होणारा आणि स्थानकावर जमा होणारा कचरा निवेदिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती निवेदिता प्रतिष्ठानचे प्रशांत परांजपे यांनी दिली. निवेदिता प्रतिष्ठानतर्फे प्लास्टिक बाटल्यांपासून बनवलेला बुके देऊन आगारप्रमुख रेश्मा मधाळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्रकल्प यशस्वी करण्यासाठी दापोलीच्या किशोर फर्निचर मार्टचे दिनेश जैन, पी. बी. गुरव अँड कंपनीचे पद्माकर गुरव, आनंद फाऊंडेशन संचालित बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र, वराडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत कऱ्हाड, रामराजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या राणे मॅडम, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक निर्बाण, ए. जी. हायस्कूलचे मुख्याध्यापक सतीश जोशी, नॅशनल हायस्कूलचे मुख्याध्यापक मुल्ला, दापोली अर्बन बँक कॉलेजचे प्राचार्य जगदाळे, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राऊत, ज्ञानदीप विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. मोरे, गुडघे गावचे पोलीस पाटील श्रीरंग दांडेकर, निवेदिता प्रतिष्ठानचे विद्याधर ताम्हणकर, अविनाश खुळे, महेश्वरी विचारे, मराठी पत्रकार परिषद आणि प्रवासी एसटीप्रेमी संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र केळकर, जालगाव इंजिनिअरिंगचे सुहास मेहता, दापोली एसटी आगारातील अधिकारी, चालक-वाहक आणि कर्मचारी तसेच एसटीच्या प्रवाशांचे सहकार्य लाभले.



