कॅनव्हास आणि गणेश

पनवेलमधील चित्रकार गणेश म्हात्रे यांचे चित्रप्रदर्शन मुंबईतील सर जहांगीर आर्ट दालनात सुरू होत आहे. अवचित भेट झालेल्या या चित्रकाराचे कलाप्रेमीने रेखाटलेले व्यक्तिचित्र.

………………………..

‘चित्रकार’ हा शब्दच जरा वेगळा वाटतो… माणूस काहीसा हटके वागतो. का? तर त्याचे शब्द मुखी नसतात. त्याच्या हातातील पेन्सिल, ब्रश, रंग, कागद, कॅनव्हास हीच खरी त्याची जगण्याची दुनिया… त्याच विश्वात तो जगतो, बोलतो, काहीवेळा चिंतनात मग्न होऊन जातो. डगला-कुर्ता, मळकट जीन्स आणि कॅन्व्हासचे बुट्स. केसांची पुरचुंडी केलेली किंवा केस असेच हवेत झुलणारे, एकूण काय तर आत्मचिंतनात मश्गुल दिसणारा तो एक चित्रकार!

पनवेलजवळच्या खारघर येथील सेक्टर दहा येथे माझ्या मुलाच्या घरी मी गावाहून निघालो होतो. शेजारच्या इमारतीत तळमजल्यावर एका ब्लॉकमध्ये बरीचशी मुले बसून कागदावर ड्रॉइंग काढताना दिसली. हा प्रकार काय असावा? म्हणून पुढे जाऊन पाहू लागलो. आत बरीचशी लहान मुले होती. त्यांच्या हातात पेन्सिल आणि स्केच बुक दिसली. जिन्स आणि टी शर्टमधला तिशीतला एक तरुण त्या मुलांना स्केच कसे असावे, याचे धडे देताना दिसला. मला पाहताच तो तरुण नम्रतेने पुढे आला व चौकशी करू लागला. चपला बाहेर काढून मी आत गेलो आणि पाहतो तर काय?

क्लासच्या चारही भिंतींवर सुरेख, देखणी निसर्गचित्रे फ्रेम करून लावलेली. काहीसा भारावून गेलो, त्या कलाकाराचे नाव गणेश म्हात्रे. मूळ गाव पेण (जि. रायगड)! शिक्षणोत्तर, सपत्नीक व्यावसायिक ड्रॉइंग क्लासेस त्याने सुरू केले. एकूणच उपस्थित लहानग्यांसमवेत ती दोघेही रमून जात. अशीच आमची वरचेवर अधूनमधून भेट होत राहिली. गणेश स्वाभाविक बोलका, चेहऱ्यावर स्मित जपणारा. मस्त मराठी तरुण मित्र माझ्या उतारवयात लाभला मला. गुजर, मारवाडी आणि इतर प्रांतीय भाषिकांमध्ये गणेश हा एकमेव मराठी भाषिक मित्र म्हणून लाभला. तसा तो माझ्या मुलाच्या वयाचा! पण मैत्री मस्त जमली. त्याने व त्याच्या पुणेरी पत्नीने मिळून अनेक कॅन्व्हास रंगवून ठेवलेले होते. सच्चे कलाप्रेमी! मेहनतीने आपले जीवन जगत आहेत.

मूळ शेतकरी कुटुंबातील संस्कार झाल्याने उच्च विचार साधी राहणी आणि कष्ट करण्याची तयारी. असेच जगणे राहिले पाहिजे. बोलता बोलता माझा एक काव्यसंग्रह – वळणावळणाची वाट – पुण्यात प्रकाशनाधीन होता. त्यांतील काही निवडक कविता गणेश याने वाचल्या. कुठेतरी त्यातील काही ओळी त्याच्या अंतर्मनात जाऊन रुतल्या असाव्यात. चार दिवसांत माझ्या कवितासंग्रहास समर्पक असे मुखपृष्ठ त्याने तयार करून दिले. माझे काळीज भरून आले. खरेच गणेश हा नावाप्रमाणे देव निघाला. कलेचा, बुद्धीचा उपासक! विशेष म्हणजे ते चित्र त्याने विनामूल्य दिले!

त्यानंतर त्याच्या चित्रांचे अनेक असे इव्हेंट्स होत राहिले. नवी मुंबई येथील तो एक नामवंत कलाकार म्हणून ओळखला जाऊ लागला. फालतूपणा त्याच्या एकूण वागण्यात कधी कधीच दिसला नाही. गेल्या दशकापासून मी त्याला ओळखतो. मुलांची शिकवणी पूर्ण झाली की मग तो आपल्या वैयक्तिक आर्टकडे लक्ष द्यायचा. मध्येच करोना संकट आले. आर्ट क्लासेस बंद करावे लागले. सहपरिवार गणेश आपल्या पेण येथील गावी निघून गेला. आणि आता पुढे काय…?

अधूनमधून आम्ही फोनाफोनी करायचो. व्हॉट्स अॅप, फेसबुकवरच्या माध्यमातून माझ्या कविता तर गणेशकडून चित्रे शेअर होत राहिली. मध्येच त्याने माझ्या लिखित शॉर्ट स्टोरीवर दोन मिनिटांची फिल्म शूट केली होती, पुढे त्याचे काय झाले, ते नाही समजू शकलो. कोविडमुळे पार घाबरून गेलो म्हणून कदाचित ते सर्व विसरून आज नव्याने जीवन जगत आहोत. द शो मस्ट गो ऑन!

हा लेख गणेश म्हात्रे यांच्या कर्तृत्वाची विशेष दखल घ्यावी म्हणूनच लिहिला आहे. अतिशय विनम्र आणि संवेदनशील असा हा मनस्वी कलासक्त चित्रकार आपल्या मातीशी कायम एकरूप राहिला हे महत्त्वाचे! गणेश सिने क्षेत्रातील कला दिग्दर्शक म्हणून पूर्ण जबाबदारीने काम करतो. त्याची एकूणच बैठक कलेशी जोडली गेली असल्याने त्याचा एकूण स्वभावच निगर्वी सतेज आणि उत्साही असतो. माझ्या वृद्धावस्थेत लाभलेला हा सर्वांत तरुण मित्र. ईश्वर त्याला खूप खूप यश देवो, मुळातच श्रमिक स्वभाव असल्याने कामात गणेश कायम तत्पर असतोच. त्याला साजेशी सुविद्य पत्नी लाभली आहे. छान, गोंडस अशी दोन मुले लाभली आहेत. त्याचे कौटुंबिक जीवन अतिशय प्रगल्भ आहे. असेच पुढे चित्रमय जीवन त्याला जगायचे आहे.

मुंबईतील सर जहांगीर आर्ट दालनात चित्रकार गणेश म्हात्रे यांचे चित्रप्रदर्शन सुरू होत आहे. सोशल मीडियावर सर्वत्र त्यांच्या उत्पल नामक चित्रप्रदर्शनाच्या जाहिराती सध्या झळकत आहेत. माझ्यासारखे अनेक त्यांचे चाहते आहेत जे खूप उत्सुकतेने प्रदर्शनाचा आस्वाद घेऊ इच्छित असतील. मला तर जायचेच आहे. गणेश यांचे हे प्रथमच प्रदर्शन नाही, तरीही स्वाभाविक ते आतुर आहेत, जाणकारांनी यावे आणि प्रदर्शनास भेट द्यावी.

गणेश यांची स्केचस, ड्रॉइग्ज, ब्रशची सफाई मी अतिशय जवळून पाहिली आहे. कलेची समज, विषयाची डूब, उत्तम जनसंपर्क आणि जमिनीवर राहून लोकांशी बोलणारा हा कलाकार. त्याला मी मनस्वी शुभेछा तर देतोच शिवाय पुढील वाटचालीत कायम यश मिळो, हीच सदिच्छा.

  • इक्बाल मुकादम
    दापोली
    (99206 94112)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply