रत्नागिरी : महावितरणतर्फे सौरछतासाठी दिल्या जाणाऱ्या ४० टक्के अनुदानाचा लाभ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५७ घरगुती ग्राहकांनी घेतला आहे.
भविष्यातील ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने सौरछत हे सुरक्षा छत आहे. विपुल प्रमाणात व सहजपणे सौरऊर्जा उपलब्ध आहे. सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी सौरछताकरिता ४० टक्क्यांपर्यंत अनुदानाची योजना सुरू आहे. महावितरणमार्फत ही योजना राबविली जात आहे. आपल्या छतावर ६१४ किलोवॉट क्षमतेची सौरयंत्रणा अनेक ग्राहकांनी बसविली आहे, तर ९६ ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक घरगुती ग्राहकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील १०१ (४०० किलोवॉट) तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५६ (२१४ किलोवॉट) घरगुती ग्राहकांनी या अनुदान योजनेचा लाभ घेऊन सौरछत यंत्रणा बसविली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ६३ (१८६ किलोवॉट) तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३ (९९ किलोवॉट) घरगुती ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या योजनेतून घरगुती ग्राहकांना १ ते ३ किलोवॉटपर्यंत सौरछत संचास ४० टक्के, तर पुढील ३ पेक्षा अधिक ते १० किलोवॉटपर्यंत २० टक्के अनुदान आहे. सामूहिक वापरासाठी ५०० किलॉटपर्यंत मात्र प्रत्येक घरासाठी १० किलोवॉट मर्यादेत समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान दिले जाते. सौरछत संच अनुदानासाठी प्रतिकिलोवॉट संचाचे मूलभूत दर निश्चित केले आहेत. त्यानुसार १ ते ३ किलोवॉटकरिता ४१ हजार ४०० रुपये, ३ पेक्षा अधिक ते १० किलोवॉटकरीता ३९ हजार ६०० रुपये, १० ते १०० किलोवॉटकरिता ३७ हजार रुपये, तर १०० ते ५०० किलोवॉटकरिता ३५ हजार ८८६ रुपये असे दर आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध वर्गवारीतील ५२३ ग्राहकांनी ४९९४ किलोवॉट क्षमतेची व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२७ ग्राहकांनी २०१२ किलोवॉट क्षमतेची विनाअनुदानित तत्त्वावरील सौरयंत्रणा घेतली आहे. एक किलोवॉट क्षमतेची सोलर रूफ टॉप यंत्रणा बसविण्यासाठी जेथे सावली पडत नाही अशी साधारणपणे १०८ स्क्वेअर फूट जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे. एक किलोवॉट क्षमतेच्या सोलर रूफ टॉप यंत्रणेचे वजन जवळपास १५० किलो असते. एक किलोवॉट क्षमतेच्या सोलर रूफ टॉपमधून वार्षिक सरासरीनुसार महिन्याला १२० युनिट वीजनिर्मिती होते. सौरपॅनलची कार्यक्षमता आणि सौर किरणांची उपलब्धता, भौगोलिक स्थान या घटकांचा प्रभाव एकंदरीत वीजनिर्मितीवर पडतो. स्थानिक बाजार मूल्यानुसार १ किलोवॉट क्षमतेच्या सोलर रूफ टॉप यंत्रणेसाठी ५० ते ५५ हजार रुपये यादरम्यान खर्च येतो. सोलर पॅनलचा दर्जा, उपलब्ध जागा इत्यादी घटकांचा दरावर परिणाम होतो. किलोवॉट क्षमता वाढल्यास खर्च कमी होत जातो. मासिक वीज बिलात बचत होऊन साधारणपणे सोलर रूफ टॉपसाठी गुंतविलेल्या रकमेची ४ ते ५ वर्षात परतफेड होते. पॅनलची स्वच्छता राखणे, नियमित देखभाल दुरुस्ती यामुळे सौरपॅनलची कार्यक्षमता व आयुर्मान वाढते.
या योजनेची संपूर्ण माहिती आणि ऑनलाइन अर्जाची सोय, मार्गदर्शक तत्त्वे, एजन्सी, निवडसूची, शंका-समाधान इत्यादी माहिती महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील https://www.mahadiscom.in/ismart/ या लिंकवर उपलब्ध आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

