कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कारभाराविषयी या सदरात यापूर्वी अनेक वेळा लिहिले गेले आहे. काय होऊ नये याबद्दल त्यात सातत्याने मुद्दे मांडले गेले. कोकणात रुजलेली साहित्यिक चळवळ वृद्धिंगत व्हावी, हाच त्यातला प्रामाणिक हेतू आहे. याच उद्देशाला अनुसरून नेमके काय घडले पाहिजे, याचे उदाहरण कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने यापूर्वीच घातले आहे. साहित्याचे ते बीज आता रुजले असून चांगलेच मूळ धरू लागले आहे. अशीच घटना अलीकडेच मालवण येथे घडली.
कोकण मराठी साहित्य परिषदेची मालवण शाखा सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जोमाने काम करत आहे. सातत्याने साहित्यिक कार्यक्रम हे या शाखेचे वैशिष्ट्य ठरले आहे. करोनाच्या पूर्वकाळात सिंधुसाहित्यसरिता नावाचे एक पुस्तक या शाखेने प्रसिद्ध केले होते. कोकणातील विविध २२ साहित्यिकांचा नवसाहित्यिकांनी घेतलेला आढावा असे त्या पुस्तकाचे स्वरूप होते. नव्या पिढीला जुन्या लेखकांची माहिती व्हावी, हा तर त्यातील उद्देश होताच, पण या मुलांपर्यंत असे साहित्य पोहोचविणारे शिक्षकही या विषयाबाबत किती गंभीर आहेत, याचाही पडताळा त्यातून आला. नव्याने लिहू इच्छिणाऱ्या, लिहिणाऱ्या साहित्यिकांना प्रोत्साहन देऊन कोकणातील जुन्या साहित्यिकांविषयीची माहिती संकलित करण्यात आली. त्यासाठी शिक्षकांना जुने ग्रंथ धुंडाळावे लागले. संदर्भ घ्यावे लागले. त्यातून त्यांची शोधक वृत्ती वाढीला लागावी, असा उद्देश होता. तो बराचसा सफल झाल्याचे सिंधुसाहित्यसरिता पुस्तकातून सिद्ध झाले. आता त्यापुढचे पाऊल कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने उचलले आहे.
बीज अंकुरे अंकुरे नावाचे पुस्तक या शाखेच्या पुढाकाराने नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा समारंभ मालवण येथे झाला. त्यामध्ये कोमसापचे संस्थापक अध्यक्ष मधुभाई कर्णिक आभासी पद्धतीने उपस्थित होते. त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेचा उद्देश यावेळी स्पष्ट केला. कोकणात मुळात साहित्यिक वातावरण आहे. चळवळही आहे, पण ती एक प्रकारे निद्रिस्त झाली होती. तिला खतपाणी घालावे, तिला धुमारे फुटावेत, या उद्देशाने कोमसापची स्थापना झाली. साहित्यिक चळवळीचा हा मूळ उद्देश मालवण शाखेने तंतोतंत अमलात आणला आहे. वेगवेगळ्या सोळा लिहित्या हातांना लेखनासाठी प्रवृत्त करण्यात आले. अर्थातच त्यात हाडाचे शिक्षक असलेल्या खरोखरीच्या मुख्याध्यापकाची भूमिका सुरेश ठाकूर यांनी निभावल्याचे पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात आणि पुस्तकातही ठायी ठायी जाणवते. पण अर्थातच अशा तऱ्हेचे खमके नेतृत्व असल्याशिवाय कोणतीही चळवळ वाढीला लागत नाही. तिला दिशा मिळत नाही. मधुभाईंनी म्हटल्याप्रमाणे कोकणात साहित्याची बीजे ठिकठिकाणी आहेतच. तिला पूर्ण दिशा दाखविण्याचे काम कोणीतरी करायला हवे आहे. हे काम श्री. ठाकूर यांनी चांगल्या पद्धतीने निभावले आहे. सोळा जणांच्या हातांना त्यांनी ती दिशा दाखविली आहे. त्यातून केवळ साहित्यिक मूल्ये जपली जातील असे नाही, तर कोकणातील समस्या, व्यथावेदनांनाही एक उद्गार मिळणार आहे. कोकण आता मागसलेले राहिलेले नाही. विकासाची कास कोकणाने धरली आहे. नवनवे प्रकल्प आले आहेत. त्यातून झालेला विकास म्हणजे विकास म्हणायचा की कोकणाचे सौंदर्य नष्ट करण्याचा तो टप्पा मानावा, याबाबत बरीच चर्चा करता येऊ शकेल. पण घटना, घडामोडी घडत आहेत. स्थलांतराला काही प्रमाणात आळा बसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे. या बदलांचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. त्या दिशेने सुरू झालेल्या वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ८ सप्टेंबर २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – ८ सप्टेंबर २०२३ रोजीचा अंक
मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia8sep
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : अंकुरलेले साहित्यबीज
https://kokanmedia.in/2023/09/08/skmeditorial8sep/
मुखपृष्ठकथा : निराश तरुणांसाठी प्रेरणादायी : महारथी कर्ण : डोंबिवलीतील कोतकर विद्यालयातील प्रा. प्रशांत शिरुडे यांचा लेख
पृथ्वीचा तोल ढासळतो आहे : डहाणूचे शशिकांत काळे यांचा लेख…
चालत्या-बोलत्या देवराईच्या सहवासात : सुभाष लाड यांचा लेख…
सणावारांचा श्रावणमास : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख…
मालवण-कोमसापचा उपक्रम राज्यात अद्वितीय : मधु मंगेश कर्णिक : पुस्तक प्रकाशन सोहळा वृत्तांत

