दापोली : आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने दापोली येथे रविवारी (दि. १० सप्टेंबर) सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे.
आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल मोकळेपणाने बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते. आत्महत्येचा विचार करणाऱ्या लोकांची काही लक्षणे ओळखून त्यांचे जीवन वाचवले जाऊ शकते. याबद्दल जनजागृती करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब आणि दापोली जेसीआयतर्फे रविवारी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही सायकल फेरी दापोलीच्या आझाद मैदानातून सकाळी साडेसात वाजता सुरू होईल. ती उपजिल्हा रुग्णालय, एसटी आगार, पोलीस ठाणे, बाजारपेठ, फॅमिली माळ, बुरोंडी नाका, केळस्कर नाका, आझाद मैदान अशा ६ किमी मार्गावर असेल. समारोप आझाद मैदानात सकाळी साडेनऊ वाजता होईल. या सायकल फेरी दरम्यान आत्महत्येबद्दल जागरूकता आणि ती रोखण्यासाठीचे प्रयत्न याविषयी तज्ज्ञ जाणकारांची माहितीपूर्ण सत्रे होतील.
या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकलप्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी ९६३७९२०९२० किंवा ८७६७२१९६१० या क्रमांकावर संपर्क साधावा. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्य सायकलविषयक अनेक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून रविवारच्या फेरीमध्ये सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

