डोंबिवली : येत्या १ ऑक्टोबर रोजी जागतिक संगीत दिनी तसेच संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या स्मृतिदिनी दोन वादकांचा सन्मान डोंबिवलीत मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत होणार आहे. तेच निमित्त साधून नाट्यभक्ती संगीत संध्याही रंगणार आहे.
येत्या १ ऑक्टोबर रोजी जागतिक संगीत दिन, ज्येष्ठ नागरिक दिन असून संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या चौतिसाव्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे. (पं. मराठे यांचे निधन ४ ऑक्टोबर १९८९ झाले होते. विविध औचित्याने नादब्रह्म संस्थेने डोंबिवलीतील वातानुकूलित सर्वेश सभागृहात ज्येष्ठ नाट्यसंगीत आणि सर्व गायन प्रकारांना साथसंगत करणारे कलाकार तबलावादक पं. धनंजय पुराणिक यांचा त्यांच्या एकसष्टीनिमित्त आणि हार्मोनियम, संवादिनी, ऑर्गनवादक पं.मकरंद कुंडले यांचा विशेष गौरवपर स्वरमैत्र सन्मान केला जाणार आहे. याप्रसंगी नाट्यभक्ती संगीत संध्या हा विशेष संगीत कार्यक्रम होणार असून पितांबरी मार्केटिंग, जाई काजळ, संस्कारभारती, हेमंत सुगंधी भांडार यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे.

पं. मकरंद कुंडले
मराठी नाट्यसंगीताला आणि संगीत नाटकाला 180 वर्षांची परंपरा आहे. या काळात अनेक ज्येष्ठ ऑर्गनवादक, तबलावादक, व्हायोलिन वादक, सारंगी वादक या साथीदारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असे आहे. नटसम्राट बालगंधर्व, उस्ताद अहमदजान थिरकवाँ, हरिभाऊ देशपांडे ही गायक-वादक जोडी तसेच पंडित अनंतराव लिमये, गोविंदराव टेंबे, गोविंदराव पटवर्धन, तुलसीदास बोरकर, माधव कुंडले, विष्णुपंत वष्ट, संजय देशपांडे, विश्वनाथ कान्हेरे, वासुदेव चंद्रचूड, प्रकाश वगळ, राजू परांजपे, राया कोरगावकर, संजय गोगटे, केदार भागवत, आदित्य ओक, राहुल गोळे, निरंजन लेले अशा अनेक ऑर्गनवादकांच्या तसेच व्हायोलीनवादक मधुकर बर्वे, चिंतामणी हाटे, राजेंद्र भावे आणि पंडित दामूअण्णा पार्सेकर, नाना मुळ्ये, वसंतराव आचरेकर, भोजराज साळवी, विनायकराव थोरात, केशवराव नावेलकर, एस. व्हीं. पटवर्धन, माधव मोडक, रमेश मोडक, श्रीकांत गोडबोले, श्रीकांत देशपांडे, शेखर खांबेटे, साई बँकर, जगदीश मयेकर, दयेश कोसंबीकर, धनंजय बेडेकर, हेरंब जोगळेकर, रोहिदास परब अशा ऑर्गन आणि तबलावादकांच्या मांदियाळीत नंतरच्या आणि काहींच्या समकालीन पिढीमधील पं. मकरंद कुंडले आणि पं. धनंजय पुराणिक यांचे जुन्या आणि नवीन साठोत्तरी संगीत नाटकांना अत्यंत महत्त्वपूर्ण असे योगदान आहे. शेकडो संगीत नाट्यप्रयोगांना आणि हजारो नाट्यसंगीत कार्यक्रमांना, वाद्यवृंदांना त्यांची साथ संगत लाभल्याने कार्यक्रम यशस्वी होऊन गाणी, पदे, अभंग रंगतदार झाले आहेत.

त्यांची कारकीर्द लक्षात घेऊन या दोघांचा क सन्मान सोहळा १ ऑक्टोबर रोजी डोंबिवली आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ४ ते रात्री साडेनऊ या वेळेत कार्यक्रम होईल. ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळ्ये, पं.विश्वनाथ कान्हेरे, ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री रजनी जोशी, ज्येष्ठ गायक-नट अरविंद पिळगावकर, गायिका अर्चना कान्हेरे, सुधीर ठाकूर, पं. सुरेश बापट, अभिनेते दिग्दर्शक विजय गोखले इत्यादी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. नाट्य भक्ती संगीत संध्येमध्ये ज्येष्ठ आणि तरुण तडफदार नवोदित गायक वादक कलाकार सहभागी होणार आहेत. अर्चना कान्हेरे, सुरेश बापट, मुकुंद मराठे, पंडित चंद्रकांत लिमये, सुवर्णा घैसास, नयना आपटे, विनोदभूषण आलपे, नीलाक्षी पेंढारकर, राजेंद्र भावे, वर्षा भावे, श्रीरंग भावे, भानुदास देशपांडे, ओंकार प्रभुघाटे, स्वरांगी मराठे, केतकी भावे-जोशी, भाग्येश मराठे, वीणा वायकूळ, प्राजक्ता मराठे, आसावरी पुराणिक, स्वरा जोशी, भाग्यश्री कुंडले, महेश सारमंडळी, विनोद पुराणिक, अमृता दीक्षित, धवल भागवत, प्रकाश वगळ, केदार भागवत, आदित्य पानवळकर, सुहास चितळे, धनंजय बेडेकर, प्राजक्ता काकतकर, सत्कारमूर्ती मकरंद कुंडले, धनंजय पुराणिक, ज्येष्ठ गायक-नट पं. अरविंद पिळगावकर असे अनेक कलाकार त्यात सहभागी होणार आहेत.
हा सर्व रसिकांना विनामूल्य असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन नादब्रह्म संस्थेतर्फे गायक मुकुंद मराठे यांनी केले आहे. नादब्रह्मचे जागतिक संगीत दिनाचे ब्रीदवाक्य संगीताद्वारे विश्वाशी एकरूप व्हा (EMOTE UNIVERSALLY THROUGH MUSIC) असे असून त्याआधारे संगीत मैफल होणार आहे. अधिक माहितीसाठी श्री. मराठे (9892315731) यांच्याशी संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

