नागपूर मडगाव प्रतीक्षा एक्स्प्रेसला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई : नागपूर-विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणाऱ्या नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) दरम्यान कोकण रेल्वेमार्गाने धावणाऱ्या विशेष रेल्वे गाडीला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून आता ही गाडी ३१ डिसेंबरपर्यंत धावणार आहे.

विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. खान्देश, विदर्भातून थेट कोकण रेल्वेमार्गावर येण्यासाठी गाडी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती. त्यानुसार नवरात्र, दिवाळी आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर चालविली जाणारी ०११३९/०११४० क्रमांकाची नागपूर ते मडगाव ही आठवड्यातून दोनदा चालविली जाते. सध्या हंगामी स्वरूपात असलेली ही गाडी आता येत्या ३१डिसेंबरपर्यंत धावणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपूर येथून दर बुधवार आणि शनिवारी दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी सुटून गुरुवार आणि रविवारी मडगाव येथे सायंकाळी पावणेसहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून ही गाडी गुरुवार आणि रविवारी सायंकाळी सात वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता नागपूरला पोहोचेल. ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव ,खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी स्थानकांवर थांबणार आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत या विशेष रेल्वेच्या दोन्ही बाजूच्या मिळून ५२ फेऱ्या होणार आहेत. या गाडीचे संगणकीय आरक्षण सुरू झाले आहे.

या गाडीचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर नागपाल, कल्याण-सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीचे संस्थापक अध्यक्ष सुनील उत्तेकर, पुणे-कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत परब, राष्ट्रीय रेल्वे सल्लागार समितीचे सल्लागार ॲड. पुरुषोत्तम डांगरा, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार व्यास, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. सौ. शबनम शेख, राष्ट्रीय सरचिटणीस वैभव बहुतुले इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply