सुरुवात करा, सातत्य राखा आणि सफल व्हा : आशीष कासोदेकर

रत्नागिरी : फेसबुक, इन्स्टाग्राम, रील्स आणि शॉर्ट्सच्या जमान्यात प्रेरणादायी गोष्टींची कमतरता नाही. कमतरता आहे ती सुरुवात करण्याची आणि सुरुवात झाल्यावर सातत्य राखण्याची. ते राखावे आणि यशस्वी व्हावे, असा कानमंत्र विश्वविक्रमी मॅरेथॉन रनर आशीष कासोदेकर यांनी रत्नागिरीकरांना दिला.

रत्नागिरीकरांनी संपूर्ण जगासाठी येत्या ७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या प्रसारासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विश्वविक्रमी धावपटू आशीष कासोदेकर रत्नागिरीत आले होते. त्यानिमित्ताने टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी रनटेल्स या शीर्षकाखाली श्री. कासोदेकर यांची मुलाखत घेतली. यावेळी श्री. कासोदेकर म्हणाले की, आपल्या अवतीभोवती असलेल्या सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहणे हाच सुरुवात आणि सातत्य दैनंदिन जीवनात आणण्याचा फॉर्म्युला आहे.

मैत्री ग्रुप ऑफ बिझनेसचे कौस्तुभ सावंत यांनी प्रास्ताविक केले. नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या इवेंट अँबॅसॅडर सौ. विभावरी सप्रे यावेळी उपस्थित होत्या. यावेळी श्री. कासोदेकर यांच्या सिंपल स्टेप फाउंडेशनतर्फे दामले प्रशाला आणि नाचणे प्राथमिक शाळेला क्रीडा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय लोध, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे ओंकार फडके, पर्यटनप्रेमी राजू भाटलेकर, शिर्के प्रशालेचे आयरे सर, रत्नागिरी रनिंग क्लबचे आशीष पावसकर, रत्नागिरी वॉकर्स क्लबचे विनय जांगळे व मित्र परिवार, नवलाई ग्रुपचे फिटनेसप्रेमी सावंत कुटुंबीय आणि कोकण कोस्टल मॅरेथॉनसाठी नोंदणी केलेले १०० हून अधिक धावपटू यावेळी उपस्थित होते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, धीरज पाटकर, योगेश मोरे, सचिन नाचणकर, डॉ. नितीन सनगर, विनायक पावसकर, आरती दामले, अमित पोटफोडे, शुभम शिवलकर, श्रद्धा रहाटे, हर्षदा निमकर, मृणाल वाडेकर, अजिंक्य प्रभुदेसाई आणि कोकण कोस्टल मॅरेथॉनचे समन्वयक सुहास ठाकूरदेसाई यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमापासून प्रेरणा घेऊन १४ जणांनी कार्यक्रमातच मॅरेथॉनसाठी नोंदणी केली.

कोकण कोस्टल मॅरेथॉन रत्नागिरीत होत आहे. धावनगरी रत्नागिरी हे या मॅरेथॉनचे घोषवाक्य आहे. दरवर्षीच्या पहिल्या रविवारी आंतरराष्ट्रीय दर्जाचे धावपटू रत्नागिरीत येऊन धावावेत आणि रत्नागिरी धावनगरी व्हावी, या सुहेतूने सुवर्णसूर्य फाउंडेशनने या मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. दर रविवारी मॅरॅथॉनच्या प्रॅक्टिस रनदेखील रत्नागिरीत होत आहेत. मॅरेथॉनमध्ये अधिकाधिक रत्नागिरीकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply