रत्नागिरी-पावस पदयात्रा ७ जानेवारीला

रत्नागिरी : पावस येथील स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवाप्रीत्यर्थ दरवर्षीप्रमाणे रत्नागिरी ते पावस पदयात्रा येत्या रविवारी, दि. ७ सात जानेवारी रोजी पहाटे साडेचार वाजता निघणार आहे.

चालण्याने आरोग्याची चाचणी करता येते. आपला धीर, संयम किती आहे हे तपासून बघता येते. ही चालण्याची स्पर्धा नाही. पण आपले आरोग्य किती मजबूत आहे, श्‍वास किती खोलवर घेता येतो, हे अजमावल्यामुळे आपल्या जगण्याला एक नवी उभारी येते. नाम घ्या. तेच अखेरच्या श्‍वासापर्यंत तुम्हाला साथ देईल, असे स्वामी सांगतात. सकाळचे धुके, राजिवड्याच्या समुद्राची गाज, गुलाबी थंडी, पहाटेचे प्रसन्न वातावरण, समधुर संगीताच्या तालावरचा हरिपाठ गाणारी सर्व वारकरी मंडळी क्षणभरचा दोनदा विसावा असे या छोट्या वारीचे स्वरूप असते.

स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवानिमित्ताने रत्नागिरीतील भक्तांतर्फे गेली २१ वर्षे रत्नागिरी ते पावस या मार्गावर पदयात्रा काढली जाते. यावर्षीची पदयात्रा ७ जानेवारी रोजी पहाटे साडेचार वाजता सुरू होणार आहे. रत्नागिरीत जयस्तंभ येथील नगर वाचनालयापासून दिंडीला प्रारंभ होईल. सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष या दिंडीमध्ये सहभागी होऊ शकतील.

पावस येथे सकाळी ९ वाजेपर्यंत पोहोचता येईल. त्यानंतर मंदिरासमोर फेर धरून नाचणे, अभंग सांगणे, नंतर शीण घालवण्यासाठी अल्पोपाहार, नंतर कोणत्याही वाहनाने रत्नागिरी येथे परत, अशी ही वारी असते. सर्वांनी शक्यतो पांढरा वेष परिधान करावा. पुरुषांसाठी पांढरी टोपी आवश्यक आहे. तसेच आवश्यक असल्यास पाणी बाटली आणावी. शक्यतो सर्वांनी नेहमीच्या वापरातले साधे चालण्यासाठीचे बूट, चप्पल यांचा वापर करावा. येताना आपले नाव, पत्ता व फोन नंबर एका छोट्या कागदावर लिहून ते संयोजकांकडे द्यावे.

अधिकाधिक भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दिंडीविषयीच्या अधिक माहितीसाठी राजन पटवर्धन (९८६०३६६९९१) किंवा अनंत आगाशे (७०८३१६२९७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply