रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या पुढाकाराने सुरू असलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या चमूतर्फे सामूहिकरीत्या २५० किलोमीटर धावून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.
फिटनेस टुरिझम हा विषय हाती घेऊन गेल्या ४ वर्षांत कोकणात विविध उपक्रम सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केले जात आहेत. कोकण कोस्टल मॅरेथॉन हा त्यातील एक अभिनव उपक्रम आहे. कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या बरोबरीने रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉन हाही या उपक्रमांचा एक भाग आहे. त्यामध्ये कोकणातील जास्तीत जास्त लोक सहभागी व्हावेत, यासाठी प्रॅक्टिस रन तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून ग्रुप राइडदेखील आयोजित केल्या जात आहेत. आज भाट्ये येथील झरीविनायक मंदिरापासून सामूहिक प्रॅक्टिस रन आयोजित करून ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय संघाला शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री झरीविनायक गणेशाचे दर्शन व आशीर्वाद घेऊन सकाळी साडेसहा वाजता ही ऑलिम्पिक शुभेच्छा रन सुरू झाली. त्यामध्ये ८ ते ७३ या वयोगटातील ५३ जण सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून जवळपास २५० हून अधिक किलोमीटर अंतर धावून पार केले आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमूला शुभेच्छा दिल्या. सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून टीम कोकण कोस्टल मॅरेथॉनने आयोजित केलेल्या या उपक्रमाला लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे मोलाचे सहकार्य लाभले. ऑलिम्पिक शुभेच्छा रनमध्ये सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना लायन्स क्लब तर्फे चहा आणि अल्पोपाहाराची सुविधा देण्यात आली.
ही ऑलिम्पिक शुभेच्छा रन यशस्वी करण्यासाठी ॲड. सचिन नाचणकर, डॉ. राज कवडे, एसआर सौ. आरती दामले, एसआर डॉक्टर नितीन सनगर, एसआर महेश (बॉबी) सावंत, एसआर विनायक पावसकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, पराग पानवलकर, एसआर ओंकार फडके, प्रसाद हातखंबकर, जोशी फूड्सच्या सौ. कांचन चांदोरकर, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई, लोहपुरुष समीर धातकर, गजानन भातडे, अविनाश फडके, सौ. राधा बसणकर, सौ. मानसी सचिन मराठे, विक्रांत प्रसादे, प्रफुल्ल शिर्के, नारायण पाटोळे, सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या संचालिका सौ. तेजा देवस्थळी यांनी विशेष मेहनत घेतली.
पावसाळ्यातील, हिवाळ्यातील, उन्हाळ्यातील कोकण एक चांगले ब्रॅण्डिंग करून जागतिक पटलावर पोहोचावे आणि कोट्यावधी लोक टुरिस्ट म्हणून कोकणात यावेत हा सुहेतू या सर्व उपक्रमांमागे आहे. यावर्षीपासून या सर्व उपक्रमांना कोकण कनेक्टिव्हिटी मुव्हमेंट (केसीएम) असे संबोधले जाणार आहे आणि त्याच्या अंतर्गत सायक्लोथॉन, मॅरेथॉन तसेच लांब पल्ल्याची अल्ट्रा मॅरेथॉन हे प्रमुख उपक्रम आयोजित केले जाणार आहेत, असे यावेळी सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

