चिपळूण : लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीने चिपळूणच्या बांदल हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चिपळूणच्या ओंकार सावर्डेकरने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. इतर गटांमध्ये रायकर, टिपुगडे, मांगले विजयी झाले.
लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीमार्फत एमजेएफ अनिल देसाई पीएमसीसी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या विजेतेपदासाठी ओंकार सावर्डेकर, चिपळूणचाच प्रवीण सावर्डेकर आणि रत्नागिरीच्या अवधूत पटवर्धन यांच्यामध्ये समान गुण झाल्याने टाय ब्रेकर आधारे निकाल जाहीर करण्यात आला. सरस बुकोलझ गुणांच्या आधारे ओंकार प्रथम, तर प्रवीण द्वितीय आला. अवधूतला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचे उद्घाटन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पटावर चाल करून करण्यात आले. श्री. निकम यांनी खेळाडूंशी संवाद साधताना बुद्धिबळ खेळाचा आपल्या दैनंदिन जीवनात होणारा उपयोग सांगून मार्गदर्शन केले. यावेळी स्पर्धाप्रमुख डॉ. शमीना परकार, अक्षदा रेळेकर, डॉ. सविता दाभाडे, स्वाती देवळेकर, पद्मा ओली आणि चेतना होमकर उपस्थित होत्या.
स्पर्धा खुला गट, महिला गट, पहिली ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा चार गटांमध्ये झाली. साखळी पद्धतीने खेळविल्या गेलेल्या या स्पर्धेत सर्व गटांमध्ये सहा फेऱ्या घेण्यात आल्या. अवघ्या दहा वर्षांच्या विहंग सावंतने तसेच बारा वर्षांच्या आयुष रायकरने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पहिली ते सातवीच्या गटात विजेतेपद-उपविजेतेपद पटकावले. सई प्रभुदेसाई, निधी मुळ्ये, रमा कानविंदे आणि सानवी दामले यांनी महिला गट सोडून तुलनेने अधिक कठीण असलेल्या खुल्या गटात खेळत आपला कस पणाला लावून उत्कृष्ट कामगिरी केली.
शेवटच्या फेरीअखेर आलेला गटनिहाय गुणानुक्रमे निकाल असा :
खुला गट – ओंकार सावर्डेकर, प्रवीण सावर्डेकर, अवधूत पटवर्धन, तनिश शिरगावकर, साहस नारकर, विशाल आंबेकर, किरण ओली, श्रीहास नारकर, मिलिंद नरवणकर, वेद कडू.
महिला गट – सुमेधा मांगले, पद्मश्री वैद्य, अर्णवी सावंत, धर्मी पटेल, निधी मालू, तनुष्का दांडेकर, खुशबू विश्वकर्म, आर्या गांधी, अस्मी गांधी, अनुष्का विश्वकर्मा.
पहिली ते सातवी गट – आयुष रायकर, विहंग सावं, राघव पाध्ये, सनवी दामले, सारंग दांडेकर, विपुल फडके, सोहम अभ्यंकर, झायान चौगले, श्री कांबळे, रमा कानविंदे.
आठवी ते दहावी – चिन्मय टिपुगडे, आर्यन धुळ, अर्णव चव्हाण, सर्वेश दामल, सुतेज बेर्ड, विपिन सावंत, ओम कुलकर्णी, हर्षवर्धन भिंगे, साकेत पाटणकर, लवेश पावसकर.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे, आकर्षक चषक आणि मेडल्स देऊन गौरविण्यात आले. तसेच बिलाल इलेक्ट्रॉनिक्सतर्फे गिफ्ट व्हाउचर आणि रिमझ हॉटेलतर्फे गिफ्ट व्हाउचर खुल्या आणि महिला गटातील विजेत्यांना देण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चिपळूणचे आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक प्रवीण सावर्डेकर, प्रशिक्षिका सौ. रश्मी सावर्डेकर, कु. ओंकार सावर्डेकर यांनी परिश्रम घेतले व शालेय गटात सहाय्यक पंच म्हणूनही काम पाहीले. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच व राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक विवेक सोहोनी, रत्नागिरी यांनी काम पाहिले.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

