मॉर्फोसिस नाटकाचे उत्तम सादरीकरण

रत्नागिरी : कलाकार भूमिका जगला, तरच ती चांगली वठते मात्र अशी भूमिका साकारताना त्यामध्ये तो स्वत्व विसरला, तर आफत ओढवते, असा संदेश रत्नागिरीत सुरू असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेतील मॉर्फोसिस नाटकात देण्यात आला आहे.

रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात त्रेसष्टाव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू आहे. स्पर्धेत दुसऱ्या दिवशी रत्नागिरीच्या श्रीरंग संस्थेने मॉर्फोसिस हे नाटक सादर केले. हषिकेश वैद्य यांच्या मूळ हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद अमोल दामले यांनी केला आहे. नाटकाचे दिग्दर्शन भाग्येश खरे यांनी केले.

प्रेक्षागृहात टाळ्यांचा आवाज घुमतो आहे. अशावेळी चमचमाटामधला स्टार चेहरा आपला असावा अशी आकांक्षा अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकालाच असते. अभिनय आणि प्रत्यक्षात जगणे यात फरक असतो का, मुखवटे आणि चेहरे यांच्यामध्ये नेमके किती अंतर असते, रंगमंचाच्या चौकटीत अंगावर चढणारी झूल खऱ्या अर्थाने अभिनेत्याचा कायापालट करते की तो निव्वळ परकाया प्रवेश असतो, अशा अनेक प्रश्नांचा कल्लोळ या नाटकात होतो. आपल्या व्यक्तिरेखेचा आलेख जोपर्यंत ती व्यक्ती समजून घेत नाही, तोपर्यंत कलाकार म्हणून त्या अभिनेत्याची अवस्था संभ्रमाची असते. अभिनेता लोकप्रिय होतो तेव्हा तो स्वतःच्या प्रेमात पडतो आणि त्यातून अहंकाराचा जन्म होतो. अहंकाराची कवचकुंडले गळून पडत नाहीत, तोपर्यंत खरा कलाकार जिवंत होऊ शकत नाही. पण कलाकाराने ती भूमिका जगताना आत्मभान विसरूनही चालणार नसते. हेच या नाटकात सांगण्यात आले आहे.

नाटकात प्रसाद ही मुख्य भूमिका गोपाळकृष्ण जोशी यांनी उत्तम निभावली आहे. दादा काका झालेले किशोरकुमार साठे यांनी नाट्यप्रशिक्षक चांगला वठवला आहे. मॉर्फोसिस या नाटकात सुमारे ३० वर्षांपूर्वी दादा काकांनी नाटकातील मानस ही प्रमुख भूमिका साकारली होती. त्यावेळी त्यांना त्यांच्या गुरूंचे आशीर्वाद होते. काही प्रयोगांनंतर ते नाटक होऊ शकले नाही. हेच नाटक पुन्हा नव्या कलाकाराचा शोध घेऊन रंगभूमीवर आणायचे दादा काकांनी ठरविलेले असते. पण प्रसाद हा झगमगत्या दुनियेत चमकणारा नट मानसची भूमिका साकारू शकणार नसल्याचे त्यांचे ठाम मत असते. ते त्याचा अनेकदा अपमानही करतात. तो मुळात अभिनेताच नसल्याचे त्यांचे ठाम मत असते. मात्र भौमिक या प्रसादच्या मित्राने त्याला मानसची भूमिका करण्यासाठी आव्हान दिले. ते प्रसादने स्वीकारले. भूमिका करताना त्या भूमिकेच्या अंतरंगात आपण सामावून गेले पाहिजे, ती भूमिका आपण प्रत्यक्षातही जगत आहोत असे वाटले पाहिजे, इतकेच त्याचे मतपरिवर्तन होते, पण या सगळ्या प्रयत्नात तो आत्मभान विसरून जातो आणि नाटकाचा शेवट होतो.

प्रमुख कलाकारांना मयूरा जोशी (दिशा), पल्लवी गोडसे (दुर्वा), चिन्मय दामले (भौमिक), तेजस खरे (मोहित), अथर्व करमरकर (कुमार), सोनाली शेवडे, श्रद्धा मुळे, शिवानी केळकर (सहकारी शिष्य) यांनी चांगली साथ दिली आहे. काहीसे संथ वाटणारे नाटक ओघवतेपणाने पुढे सरकत राहते.

या नाटकाचा आस्वाद ४७८ प्रेक्षकांनी घेतला. त्यातून ६ हजार ६७० रुपयांची तिकीट विक्री झाली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply