चिपळूण : ऑस्ट्रेलियामधील बसलटन या ठिकाणी पार पडलेल्या जागतिक आयर्नमॅन स्पर्धेमध्ये चिपळूणचे डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी सुयश मिळवले. ते दुसऱ्यांदा आयर्नमॅन झाले आहेत.
आयर्नमॅन होण्याकरिता पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तिन्ही कृती एकापाठोपाठ करावयाच्या असतात. ऑस्ट्रेलियातील स्पर्धेसाठी १७ तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. या वेळेमध्ये सर्व नियमांच्या अधीन राहून हे अंतर पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना आयर्नमॅन हा किताब मेडल तसेच फिनिशर टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेमध्ये हिंदी महासागरामधील जिओग्रफी बे हा समुद्राचा भाग निवडण्यात आला होता. ३.८ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी धावणे हे तिन्ही क्रीडा प्रकार सलगपणे करणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते.
स्पर्धेदरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उंच लाटा उठत होत्या. त्यांचे आव्हान पेलत डॉ. गणपत्ये यांनी हे अंतर १ तास ४३ मिनिटांमध्ये पूर्ण केले. सायकलिंगचा रस्ता निसर्गरम्य अशा समुद्रकिनाऱ्यावरून तसेच दाट जंगलातून आणि शेतामधून जाणार होता. सायकलिंग दरम्यान काही वेळ पाऊस पडल्यामुळे समोरून येणाऱ्या गार बोचऱ्या वाऱ्यांचा त्यांना सामना करावा लागला. हे अंतर त्यांनी ६ तास ४५ मिनिटांमध्ये कापले.
त्यानंतर सर्वांत अवघड अशा ४२ किलोमीटर धावणे या प्रकारामध्ये थंड हवामान आणि शेजारील समुद्राची गाज अशा आल्हाददायक वातावरणामध्ये हे अंतर डॉ. गणपत्ये यांनी ५ तासात पार केले. मागील वर्षी कझाकिस्तान येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये नोंदवलेल्या वेळेपेक्षा १ तास २५ मिनिटे कमी वेळ नोंदवत डॉ. गणपत्ये यांनी एकूण १३ तास ५२ मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली.
या यशाचे श्रेय त्यांनी आपले कुटुंबीय तसेच कोच पंकज रावळू व आशीष रावळू यांना दिले. या स्पर्धेमध्ये एकूण १३५२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ११११ स्पर्धकांनी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. भारतामधून सहभागी झालेल्या ३८ स्पर्धकांपैकी २९ स्पर्धक यशस्वी ठरले. सलग दुसऱ्या वर्षी फुल आयर्नमॅन हा किताब मिळवणाऱ्या डॉ. गणपत्ये यांचे चिपळूणमध्ये जोरदार स्वागत झाले. या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.
यासंदर्भात डॉ. गणपत्ये म्हणाले की, गेल्या वर्षी कझाकस्तानमध्ये आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली होती. अनेक जण मला विचारतात की एवढा त्रास घेऊन पुन्हा दुसऱ्या ठिकाणी कशासाठी? माझे उत्तर असते फिटनेस ही एक लाइफस्टाइल आहे. आपल्याला निरंतर प्रॅक्टिसमध्ये राहायचे असेल तर समोर काहीतरी गोल असणे आवश्यक आहे. नाहीतर एक प्रकारची मरगळ येते आणि आपण तेवढ्या सातत्याने वर्कआउट करत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा हे आव्हान स्वीकारून स्वतःला सिद्ध करण्याचे मी ठरवले.
कझाकस्तानमधील कामगिरी
डॉ. तेजानंद यांनी गेल्या वर्षी २ जुलै रोजी कझाकस्तानमध्ये खालीलप्रमाणे वेळ नोंदवली होती. पोहणे – ३.८ किलोमीटर (१ तास ४५ मिनिटे), सायकलिंग – १८० किलोमीटर (७ तास ४४ मिनिटे), धावणे – ४२.२ किलोमीटर (५ तास २९ मिनिटे). हे तिन्ही क्रीडा प्रकार १६ तास ३० मिनिटांमध्ये पूर्ण करायचे असतात. डॉ. तेजानंद यांनी १५ तास १७ मिनिटे या वेळेत एकंदर २२६.७ किमी अंतर पार केले. कझाकिस्तान येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये जगभरातील ६० देशांमधून २३६ स्पर्धक सहभागी झाले होते. नदीचे अतिशय थंड पाणी, सायकलिंग करताना समोरून येणारा जोरदार वारा, तसेच दुपारच्या कडक उन्हात धावणे या आव्हानांचा सामना डॉ. गणपत्ये यांना स्पर्धेदरम्यान करावा लागला.
डॉ. गणपत्ये यांनी कर्करोगावर मात करून दोन वर्षे कठोर प्रयत्न केले. त्यांच्या घशात २०१९ मध्ये गाठ आढळली आणि कर्करोगाचे निदान झाले. मुंबईत जाऊन केमोथेरपी, सर्व उपचार पूर्ण केले. पत्नी डॉ. अश्विनी अतिशय खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. कुटुंबीय आणि मित्रमंडळींनी पाठबळ दिले. आजारमुक्त झाल्यावर वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली. आणि मित्रांसोबत सायकलिंग सुरू केले. पोहणे, सायकलिंगचा नियमित सराव पुन्हा सुरू केला. चिपळूण सायकलिंग क्लबने मोठा पाठिंबा दिला. केमोनंतर वर्षभरात अशक्यप्राय वाटणारी बीआरएम त्यांनी पूर्ण केली. धावणे, कोल्हापूरचे आयर्नमॅन पंकज रावळू यांच्याकडे मार्गदर्शन घेऊन प्रशिक्षण सुरू केले. रोज एक ते दीड तास सराव, शनिवार-रविवार २ ते ३ तास सराव असा त्यांचा दिनक्रम होता. कागल येथे ऑलिंपिक डिस्टन्स, नगर येथे २१ किलोमीटर रनिंग हाफ मॅरेथॉन, ऑलिंपिक डिस्टन्स ट्रायथलोन (बेळगाव) आणि पुणे, कोल्हापूर, सातारा येथे ३ हाफ मॅरेथॉन, कोल्हापूर येथे हाफ आयर्नमॅन डिस्टन्स ट्रायथलॉन स्पर्धा त्यांनी पूर्ण केल्या. त्यानंतर कझाकिस्तान येथे यश मिळवून आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला होता. आता ऑस्ट्रेलियातील यशानंतर ते सलग दोन वेळा कोकणातील पहिले आयर्नमॅन ठरले आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

