रत्नागिरी : कोकणवासीयांनी कोकणवासीयांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन असे संबोधले गेलेल्या दुसऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन दर वर्षीप्रमाणे नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी ५ किमी, १० किमी आणि २१ किमी अंतर असलेली कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन सालाबादप्रमाणे सुवर्णसूर्य फाउंडेशनने आयोजित केली आहे. रत्नागिरी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने होत असणारी ही मॅरेथॉन आहे. मागील वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा होणार असून स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. स्पर्धेत विजेत्यांना ४ लाख ५० हजार रुपयांच्या रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
रन फॉर बायोडायव्हर्सिटी अशी संकल्पना घेऊन दुसऱ्या वर्षीची ही स्पर्धा होणार आहे. ५ किमीसाठी ७० मिनिटे, १० किमी १२० मिनिटे आणि २१ किमी अंतर २१० मिनिटांत पूर्ण करायचे आहे. स्पर्धेची सुरवात थिबा पॅलेस रोडवरील हॉटेल मथुरा येथून होईल. २१ किलोमीटरसाठी नाचणे, काजरघाटी, सोमेश्वर, वेसुर्ले, कोळंबे, फणसोपमार्गे भाट्ये समुद्रकिनारा असा मार्ग आहे. १० किमीसाठी नाचणे, शांतीनगर व वळसा मारून मारुती मंदिर मार्गे भाट्ये आणि ५ किमीसाठी मारुती मंदिर, नाचणे पॉवर हाऊस येथून वळून पुन्हा त्याच मार्गाने भाट्यापर्यंत स्पर्धक येतील.
स्पर्धेकरिता राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन हॉस्पिटॅलिटी पार्टनर असून रत्नागिरी सायकलिस्ट क्लब रूट पार्टनर आहे. रत्नागिरी पालिका स्वच्छता पार्टनर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. अनबॉक्स हे या उपक्रमाचे एचटूओ म्हणजे वॉटर पार्टनर आहेत. कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्याकडूनही या उपक्रमाला भरीव प्रोत्साहन मिळाले आहे. बॅंक ऑफ इंडिया, पितांबरी प्रॉडक्टस, आर्यक सोल्यूशन्स हेसुद्धा या मॅरेथॉनचे प्रायोजक आहेत.
स्पर्धेची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होणार असून तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन नोंदणी करता आली नाही, तर ऑफलाइन रजिस्ट्रेशन रत्नागिरी शहरात उपलब्ध आहे. ती ठिकाणे अशी – जोशी फूड्स (हॉटेल मिथिलाशेजारी), हॉटेल फ्लेवर्स (के सी जैन नगर), उत्कर्ष स्टेशनरी (हॉटेल कार्निवलशेजारी), हॉटेल कार्निवल इन, आनंदकल्प हॉस्पिटल (शांतीनगर). तेथे ऑफलाइन अर्ज भरून त्यावर असलेला क्यूआर स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करावे.
स्पर्धेपूर्वी अनेक दिवस थिबा पॅलेस रोड येथे दर रविवारी वॉर्म अप, प्रॅक्टिस रन आयोजित केली जात होती. रत्नागिरीकर धावू लागले आहेत, फिटनेसकरिता त्यांनी लक्ष दिल्याचे दिसून येऊ लागले असून धावनगरी रत्नागिरी होण्याची ही आता एक चळवळ झाली आहे, असे म्हटले जात आहे.
स्पर्धेच्या नोंदणीसाठी शेवटचे ७ दिवस शिल्लक असून इच्छुक स्पर्धकांकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी लिंक – https://events.fitasf.com/konkan-coastal-2025.html
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

