रत्नागिरी : विविध मराठा मंडळे आणि मराठा संस्था यांच्या अखिल मराठा फेडरेशनने येत्या १८ व १९ जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरीत मराठा समाजाचे महासंमेलन आयोजन केले आहे. रत्नागिरीत प्रथमच असे संमेलन होत आहे.
फेडरेशनमध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या ५५ विविध संस्था सभासद असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थांचाही यात समावेश आहे. कार्यक्रमाचे सहआयोजक मराठा मंडळ, रत्नागिरी आणि क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी आहेत.
मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हितवर्धन करणे आणि त्याचबरोबर आपले क्षात्रतेज व संस्कृती जपत समाजातील तरूणाईला उच्च विद्यार्जनाकडे तसेच व्यवसाय, उद्योगाकडे वळवून आर्थिकदृष्ट्या आपली भावी पिढी सक्षम बनविणे यासाठी फेडरेशन सातत्याने प्रयत्न करीत असते. मराठा समाजानेही एकजुटीने व मनापासून या प्रयत्नांना साथ देण्याची गरज आहे. हा विचार मराठा समाजात रुजविण्यासाठी आणि मराठा समाजात ऐक्य घडवून आणण्यासाठी फेडरेशन प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांची महासंमेलने भरविणार आहे. यावेळी त्याचा मान रत्नागिरी जिल्ह्याला मिळाला आहे.
हॉटेल विवेक येथे पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजता उद्घाटन, पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन, मान्यवरांचे मार्गदर्शन व चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता उच्च विद्यार्जन आणि उद्योग-व्यवसायासंबंधी आणि महिलांसाठी उपयोगी चर्चासत्रे आणि मार्गदर्शन व पुरस्कार वितरण होईल.
महाराष्ट्र आणि देशभरातून हजारो मराठा बंधू-भगिनी या संमेलनासाठी येणार आहेत. गावागावांतील मराठा मंडळांना सहभागी करून घेण्यात येत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने अखिल मराठा फेडरेशनची ओळख व्हावी आणि संपूर्ण मराठा समाज जोडला जावा हा मुख्य हेतू आहे. अखिल मराठा फेडरेशनची स्थापना २०१५ मध्ये स्व. आप्पासाहेब पवार यांनी केली. मराठा समाजासाठी विविध भागात काम करणाऱ्या आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी समाजकार्य करणाऱ्या मराठा संस्थांना त्यांनी एकत्र करून फेडरेशन तयार केले. शासन दरबारी मराठा समाजाच्या मागण्या मांडता येतील आणि त्यातून मराठा समाजाच्या हिताचे निर्णय आपणाला मंजूर करून घेता येऊ शकतील, ही त्यामागची मूळ संकल्पना आहे.
सध्या मराठा समाजाची तुलनात्मकदृष्ट्या वेगाने पिछेहाट होत आहे. मराठा समाजाची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे, असा दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण व्हावा तसेच समाजामध्ये स्वाभिमान जागृत करून समाजाला स्वावलंबी बनवून आपल्या भारत देशाला जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता म्हणून पुढे आणण्यासाठी आपल्या मराठा समाजाचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. ही प्रेरणा घेऊन समाजाला परिवर्तनवादी दिशा दाखवताना आपला धर्म, संस्कृती, रूढी, परंपरा यांचा वारसा जपत डोळसपणे समाजाने पुढे वाटचाल केली पाहिजे.
‘मराठा तितुका मेळवावा’ या उक्तीने ‘मराठा जोडो’ हे अभियान राबविताना विविध रचनात्मक उपक्रम व चळवळीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील व तळागाळातील मराठा समाज संघटित करण्यासाठी क्षत्रिय मराठा मंडळ आणि मराठा मंडळ यांच्या पुढाकाराने अखिल मराठा फेडरेशनच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित केले आहे.
संमेलनाच्या निमित्ताने जोडले जाण्यासाठी ९८२२७०६९२३ किंवा ८८०५५२०३०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

