रत्नागिरीत कीर्तनसंध्या उपक्रम गेली १३ वर्षे सुरू असून, राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे यांच्या अमोघ वाणीतून भारतीय इतिहासाची सुवर्णपाने उलगडण्यात आली. चौदावा कीर्तनसंध्या महोत्सव ८ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार असून, त्यात ‘महाभारत’ हा विषय मांडण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांनी लिहिलेली महाभारताची थोडक्यात ओळख करून देणारी आणि अपरिचित गोष्टी सांगणारी १८ भागांची लेखमाला आजपासून प्रसिद्ध करत आहोत. त्या लेखमालेचा हा पहिला भाग…
………….
महाभारत हा भारतातील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये अनेक रोचक संवाद, रोमांचक युद्धप्रसंग, विविध पौराणिक कथा आणि व्रते यांची माहिती सविस्तरपणे वाचायला मिळते. महर्षी व्यासांनी महाभारत लेखनाचे केलेले अद्भुत कार्य म्हणजे एक मोठा चमत्कारच आहे. त्यांच्या कथनाचा वेग इतका होता, की त्यांना ते लिहून घेणारा योग्य लेखनिक मिळत नव्हता. अखेर त्यांनी भगवान श्री गणरायांना प्रार्थना केली. श्री गणरायांनी ती प्रार्थना स्वीकारली; पण त्यांनी एक अट घातली. ते म्हणाले, ‘मी एक क्षणही थांबणार नाही, तुम्ही अखंड सांगत राहिले पाहिजे.’ महर्षी व्यासांनी ती अट मान्य केली आणि गणरायांना एक प्रतिअट घातली. महर्षी व्यास म्हणाले, ‘मी जे सांगेन ते समजल्याशिवाय तुम्ही लिहायचे नाही.’ श्री मंगलमूर्ती गणेशांनी ही अट मान्य केली आणि मग महर्षी व्यास हे वक्ता आणि मंगलमूर्ती गणपती हे लेखनिक महाभारत लेखनासाठी सिद्ध झाले. आपल्या लेखनामध्ये जेव्हा काही थोडे चिंतन करायचे आहे असे महर्षी व्यासांना वाटले तेव्हा त्यांनी कूट श्लोकांची रचना केली. त्या श्लोकांचा अर्थ नीट समजण्यासाठी मंगलमूर्ती गणेशांनाही किंचित थांबावे लागले. त्या विराम काळात महर्षी व्यासांनी पुढच्या लेखनाचा विचार केला. म्हणूनच महाभारताचे अभ्यासक असे सांगतात, की या ग्रंथातील काही श्लोकांचा उलगडा होत नाही! बुद्धिदात्या श्री गणेशांना आपल्या अफाट बुद्धिसामर्थ्याने थोडा वेळ का होईना, विचार करायला लावणे हे ज्या महर्षी व्यासांनी करून दाखवले, त्या महर्षी व्यासांच्याच कृपेने महाभारताची थोडीशी ओळख आपल्याला व्हावी यासाठी त्यांना मनापासून साष्टांग नमस्कार करू या. महर्षी व्यासांप्रमाणेच बुद्धिदाता श्री गणराया आणि अभिनव वाग्विलासिनी, चातुर्यार्थ कलाकामिनी असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या देवी सरस्वतींना शरण जाऊन आपण आपल्या महाभारत चिंतनाला प्रारंभ करू या.
या लेखमालेतून आपण नित्यपरिचित कथा वगळून महाभारतातील काही अपरिचित सौंदर्यस्थळे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाभारत या ग्रंथालाच जय असेही नाव आहे. या ग्रंथाला इतिहास असेही म्हटले जाते. ज्याप्रमाणे रामायणामध्ये बालकांड, अयोध्याकांड, सुंदरकांड असे विविध विभाग आहेत, त्याप्रमाणे महाभारतात जे विभाग आहेत त्यांना पर्व असे संबोधले आहे. उदाहरणार्थ, सभापर्व, अनुशासन पर्व, वनपर्व इत्यादी. या ग्रंथातून आपल्याला कुरुकुळाच्या इतिहासाबरोबरच तत्कालीन भारतातील इतर वंशांच्या इतिहासाची माहिती मिळते. महाभारताबरोबरच हरिवंश हा ग्रंथही अभ्यासावा असा संकेत आहे. त्याला महाभारताचे ‘खिल पर्व’ असे म्हणतात. या ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचा भाग सविस्तरपणाने आला आहे. विशेष म्हणजे श्रीदेवी विंध्यवासिनी हिची महती आणि उपासना याबद्दलही हरिवंशामध्ये चांगली माहिती मिळते. सत्यवान सावित्रीची कथा, त्यातील यम-सावित्री संवाद हाही भाग महाभारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आला आहे. यक्षप्रश्न, तसेच भीष्मपितामह आणि युधिष्ठिर यांच्यातील संवादही आपल्याला चिंतनासाठी मोठे खाद्य देतो. महाभारत वाचताना भीष्म, द्रोण, कृप यांच्या स्वभावाची विविध वैशिष्ट्ये आपल्याला कळतात. श्रीमद्भगवद्गीता, तसेच या गीतेवर स्वतः भगवान श्रीकृष्णांनी केलेले भाष्य, जे अनुगीता या नावाने ओळखले जाते, त्याचप्रमाणे श्री विष्णुसहस्रनाम या तर महाभारताने दिलेल्या महत्त्वाच्या देणग्या आहेत. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर माऊलींनी महाभारताला परमार्थाची जन्मभूमी म्हटले आहे.
– धनंजय चितळे, ज्येष्ठ प्रवचनकार
(क्रमशः)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

