होळी, गुढीपाडवा, नवरात्र, दसरा, दिवाळी अशा सर्व सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. आजकाल सर्व तऱ्हेची ऑनलाइन खरेदी सोपी झाली आहे. स्थानिक ठिकाणी कोणतीही खरेदी करण्यापेक्षा ग्राहकांचा घरपोच माल पोहोचविणाऱ्या ऑनलाइन खरेदीवर भर असतो. का केली जाते ऑनलाइन खरेदी? स्थानिक आणि ऑनलाइन खरेदीचे फायदे-तोटे काय, याविषयी लांज्यातील सुखानंद कुलकर्णी यांनी लिहिलेला हा लेख…
एकसारख्या दिसणाऱ्या/एकसारख्या असणाऱ्या वस्तूंच्या दरात गावातील व्यावसायिक व ऑनलाइन व्यावसायिक यांच्यात फरक का, हे ग्राहकवर्गाने जाणून घ्यावे. काही ठरावीक वस्तूंचा ऑनलाइन दर स्थानिक दरापेक्षा अधिक असतो. मूळ किमतीच्या मानाने ऑनलाइन रेफरल, क्लोजिंग, शिपिंग, अदर फी जास्त होत असते या केसेसमध्ये. उर्वरित वस्तूंचा ऑनलाइन दर स्थानिक दरापेक्षा थोडा कमी असतो. याचे कारण व्यवसायाची रनिंग कॉस्ट व खरेदी स्कीम यात तफावत होत असते या केसेसमध्ये. म्हणजे ऑनलाइन असो वा स्थानिक, कार्यपद्धती ज्या त्या प्रकाराची वेगळी असते. खरेदी कुठे करायची हा ग्राहकाचा वैयक्तिक प्रश्न असला तरी निदान गावातील तुलनेने छोट्या व्यावसायिकाचे गणित समजून घेऊन त्याची तुलना ऑनलाइन मोठ्या व्यावसायिकाशी करून अवहेलना वा खच्चीकरण तरी करू नये यासाठी हा लेख. शक्यतो गावातील व्यावसायिकाकडेच खरेदी करा हे आवाहन आहेच, पण ज्यांना ऑनलाइनच खरेदी करायची आहे, त्यांचा “गावातील व्यावसायिक नफेखोरी करतो” हा गैरसमज दूर करण्याचा हा प्रयत्न. गावातील व्यावसायिक का टिकले पाहिजेत, यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा. (उर्वरित लेख जाहिरातीच्या खाली)
आपल्या गावातील व्यावसायिक एकाच ठिकाणी व्यवसाय करतो स्वतःच्या गावात. त्या ठिकाणचा खर्च उदाहरणार्थ – चालू खाते व्याज, भाडे, वीज बिल, मदतनीस पगार इत्यादी व अन्य काही. या खर्चाचा भार एकाच ठिकाणच्या विक्रीवर पडतो. याउलट ऑनलाइन व्यावसायिक पूर्ण देशभरात व्यवसाय करतो. विशिष्ट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. त्यालाही एका ठिकाणचा खर्च येत आहेच. पण या खर्चाचा भार विशिष्ट एकाच ठिकाणच्या विक्रीवर न पडता असंख्य ठिकाणच्या विक्रीवर पडतो. (एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावात व्यवसाय करताना मुख्य मार्केटच्या नजीकच करावा लागतो, जिथे खर्च अधिक येतो, तर ऑनलाइन व्यवसाय करताना कुठल्याही कोपऱ्यात करता येतो, जिथे खर्च कमी येतो.)
आपल्या गावातील व्यावसायिक होलसेल खरेदी करताना गावात सरासरी किती विक्री तो करू शकतो, त्याला अनुसरून करतो, तुलनेने खरेदी विक्री कमी असते व त्याला संख्येने मोठ्या स्कीमचा लाभ घेता येत नाही. याउलट ऑनलाइन व्यावसायिक होलसेल खरेदी करताना देशात सरासरी किती विक्री तो करू शकतो, त्याला अनुसरून करतो, तुलनेने खरेदी विक्री जास्त असते व त्याला संख्येने मोठ्या स्कीमचा लाभ घेता येतो. (आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल दहाला एक, शंभरला वीस, हजारला तीनशे अशा मोठ्या स्कीम असू शकतात, टर्न ओव्हरचा अंदाज घेता याचा लाभ गावातील व्यावसायिक घेऊ शकत नाही व ऑनलाइन व्यावसायिक घेऊ शकतो.)
गावातील बहुसंख्य व्यावसायिकांना चांगल्यात चांगला माल विक्री करणे भाग आहे, कारण ग्राहक संख्या मर्यादित असल्याने ती कायम टिकवणे गरजेचे आहे, तसेच ग्राहक प्रत्यक्ष पाहून, थोडीफार हाताळणी करून खरेदी करणार असतो. नंतर दर्जा व सेवेबद्दल उत्तर द्यायला स्वत: प्रत्यक्ष हजर असतो. प्रत्येक ऑनलाइन व्यावसायिक दरवेळी खराब माल विक्री करतात, असे अजिबात नाही, नाहीच मुळी. पण उल्लेखानुसार मनासारखी वस्तू न मिळायची थोडीतरी शक्यता असते. ग्राहक संख्या अमर्यादित असल्याने एखाद्दुसरा ग्राहक कमी झाला तरी विशेष फरक पडत नाही. ग्राहकाला प्रत्यक्ष वस्तू पाहता व थोडीही हाताळणी करता येत नाही. दर्जा व सेवा याबद्दल उत्तर द्यायला कोणीही प्रत्यक्ष उपस्थित नसते.
एकूण खरेदी-विक्रीवर होणाऱ्या खर्चाचा अधिभार यामुळे पडणारा फरक व एकूण खरेदी-विक्री अनुसार मिळणाऱ्या स्कीम यामुळे पडणारा फरक (लहानमोठे आणखी असंख्य मुद्दे आहेत ज्याची सामान्य मांडणी अवघड आहे, तरीही फक्त दोन मुद्दे लक्षात घेतले तर एकत्रित पडणारा फरक) एकत्रितपणे वेगवेगळ्या व्यवसायात पाच ते पंचवीस टक्के असू शकतो. या फरकाचा अर्थ कोणी नफेखोरी करतो असा अजिबात काढू नये. सध्या स्थानिक पातळीवरच स्पर्धा इतकी प्रचंड होत जात आहे की व्यवसाय करताना खूप परिश्रम घ्यावे लागत आहेत.
तुलना करू नयेच, तरीही मोठ्या खरेदीसाठी करायची झालीच तर गावातल्या गावात एक दोन ठिकाणी दराचा अंदाज घेणे रास्त ठरू शकेल. एकाच गावात व्यवसाय करतात म्हणून, जवळपास सारखाच खर्च आहे व अंदाजे तितकीच संधी आहे म्हणून. गावातल्या गावात देखील दर्जा व सेवेनुसार किंवा लहान-मोठा व्यापारी यानुसार दरात किरकोळ फरक आढळला तरी ठरावीक प्रमाणात ठरावीक धर्तीवर स्वीकारार्ह असायला हरकत नाही. पण गावातील व्यावसायिक व ऑनलाइन व्यावसायिक हे खूप वेगळे विषय आहेत.
👉 गावातील व्यावसायिक का टिकला पाहिजे? पाहा आता .समजा रात्री-अपरात्री एखादे औषध कोणाला तत्काळ हवे असेल तर ऑनलाइन व्यावसायिक देऊ शकतो की गावातील?
👉 कधीतरी अचानक संध्याकाळी उशिरा वर्षानुवर्षांची जुनी शेगडी बिघडली, दुरुस्त होण्यासारखी नाही,ती बदलून लगेच तत्काळ नवीन घ्यायची वेळ आली तर ऑनलाइन व्यावसायिक देईल की गावातील?
👉 परीक्षेला जाता जाता पेन हरवले तर ऑनलाइन मागवणार की गावात घेणार?
👉 कार्यक्रमात आयत्या वेळी पाहुणे वाढल्याने तत्काळ रिटर्न गिफ्ट कमी पडली, म्हणून शर्टपॅन्ट पीस किंवा साडी घ्यायची वेळ आली तर गावातला व्यावसायिक उपयोगी पडणार की ऑनलाइन?
👉 याशिवाय तुमच्या घर बांधणीच्या वेळी व नंतर दर महिन्याचा किराणा घेताना तुमच्या नेहमीच्या गावातील व्यावसायिकाने जे सहकार्य केले असेल ते ऑनलाइन होऊ शकते का? खरोखरच गरज असेल तर वेळेला स्थानिक मेकॅनिक, वायरमन, प्लंबरच धावून येतात ना? की ऑनलाइन येते कोणी?
आणि
👉 स्थानिक स्वराज्य संस्थांना, सरकारी यंत्रणांना करवसुलीतून उत्पन्न कोणामुळे सहज प्राप्त होते : गावातून की ऑनलाइन?
आज प्रत्येक व्यापारी गाळ्यावर व्यावसायिक घरपट्टी आहे, प्रत्येक व्यापारी कमर्शियल इलेक्ट्रिक मीटर भाडे भरतो, हे त्या त्या संस्थांना उत्पन्नच आहे की.
👉 गावातल्या शैक्षणिक संस्थांना, प्रार्थनास्थळांना कुवतीनुसार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे लहान असो वा मोठी मदत कोण करतात : गावातील व्यापारी की ऑनलाइन व्यापारी?
बघा जुने तपशील तपासून.
👉 आपल्या गावातील जी मंडळी सरकारी कर्मचारी होऊ शकली नाहीत, ज्यांना प्रायव्हेट जॉब मोठ्या शहरात मिळाला नाही (कारण कोणतेही असो) ती मंडळी आज गावातल्याच दुकानात मदतनीस म्हणून रुजू आहेत, तिथे पगार म्हणून चार पैसे मिळवत आहेत,ऑनलाइन दुकानात नाही.
👉 ऑनलाइन व्यावसायिक जर प्रबळ होत गेले तर स्थानिक व्यावसायिक नाममात्र उरेल, त्याच्यावर अवलंबून असणारे बेरोजगार होतील. आर्थिक विषमता प्रचंड वाढलीच तर देशवासी गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत.
👉 सध्याच्या थोडक्या फायद्यासाठी भविष्यात मोठा तोटा सरसकट गावातील सगळ्यांनाच (व्यापारी व ग्राहक) व्हायला नको असेल तर गावातील व्यावसायिक टिकला पाहिजे असे म्हणणे योग्य ठरेल.
👉 यावर सरकार काय करू शकते, यावर सरकारने विचार करावा (ऑनलाइन व्यवसायाला काही मर्यादा व बंधने घालणे तर स्थानिक व्यवसायाला काही सूट व सोयी देणे यावर विचार करायला हरकत नाही.)
👉 यावर कारखानदार काय करू शकतात, यावर कारखानदारांनी विचार करावा ( ऑनलाइन व्यावसायिक एका वेळी भरमसाट माल घेतो म्हणून त्याला नको तितक्या / तशा स्कीम देणे बंद करणे, स्थानिक व्यावसायिक टप्प्याटप्प्याने माल घेत असला तरी त्याला काही स्कीम देणे यावर विचार करायला हरकत नाही. ओरिजिनलची फर्स्ट कॉपी / सेकंड कॉपी कशी येणार नाही यावरदेखील.)
👉 यावर स्थानिक व्यावसायिक काय करू शकतात यावर त्यांनी स्वतः एकत्रित विचार करावा (एखाद्या ब्रॅन्डची वस्तू तुम्हाला मिळणाऱ्या होलसेल खरेदी दरापेक्षा कमीमध्ये ग्राहकाला ऑनलाइन रिटेल विक्री दरात मिळत असेल, तर त्या ब्रॅन्डच्या वस्तूंची विक्री स्थानिक बाजारपेठेतून कमी करणे यावर विचार व्हायला हरकत नाही ,तसेच आपण योग्य नफा कायम ठेवून कोणत्या मार्गाने थोडाफार अधिक डिस्काउंट ग्राहकाला देऊ शकतो यावरदेखील.)
👉 ग्राहक काय करू शकतात यावर त्यांनी स्वतः विचार करावा , पण काही उपाय सुचवत आहे
- शक्य आहे त्यांनी स्थानिक व्यावसायिकांकडेच खरेदी करावी, काहीही असो.
- ऑनलाइन खरेदी केल्यामुळे आपल्या एकूण उत्पन्नाला अनुसरून विशेष भली मोठी बचत होत नसेल तर प्रत्येकाने ऑनलाइन खरेदी टाळावीच, स्थानिक खरेदीच करावी.
- एवढे लक्षात आणून देऊनही ज्यांचा ऑनलाइनच खरेदी करायचा हट्ट आहे त्यांनी निदान प्रत्येक वस्तू, प्रत्येक वेळी स्थानिक ठिकाणी समोरासमोर तुलना करून खच्चीकरण करणे तरी टाळावे. (ऑनलाइनच्या दरात द्या,नाहीतर नको, असे म्हणू नये..तुम्हाला नाही पटले तर तुम्हाला पर्याय निवडायला कोण रोखणार? पण अवहेलना करू नये. चांगल्या हेतूने चर्चा करून सुवर्णमध्य निघतो का, हे पाहणार असाल तर हरकत नाही.
- शंभरला पाच ते पंचवीस रुपये फरक पडला तरी तो निव्वळ वाढीव नफा नसून फरक विविध मुद्द्यांमुळे आहे, जे वर नमूद केले आहेत, हे लक्षात घ्यावे. बाकी जो तो सुज्ञ आहे.
शेवटी ठाम विश्वासाने सांगतो, सर्व स्थानिक व्यावसायिक विक्री व सेवा दोन्ही क्षेत्रातले (अगदी तुरळक अपवाद वगळता, अपवादाचे प्रमाण हजारात एक इतकेही नसेल व हा अपवाद सगळ्या क्षेत्रात असू शकतो) हे योग्य नफा ठेवून , सद्असद्विवेकबुद्धी ताळ्यावर ठेवूनच व्यवसाय करतात, ग्राहक हित जोपासतात. वर्षभर शक्यतो जादा सुट्टी वा विशेष रजा न घेता दररोज दहा बारा तास आपल्या शॉपमध्ये व्यवसायातील चढउतार दुर्लक्षित करून हसतमुखाने आपल्या ग्राहकांच्या स्वागतासाठी हजर असतात.
… आणि हे लक्षात घेऊन शक्यतो नेहमी स्थानिक व्यावसायिकांकडेच वस्तू खरेदी करणाऱ्या असंख्य ग्राहकांचे आभार मानतो.
- एस. व्ही. कुलकर्णी
प्रोप्रायटर : मनीष सोल्युशन्स, लांजा (गृहोपयोगी वस्तू) (99705 93910)
(हा लेख ऑनलाइन आणि स्थानिक व्यवसाय यांच्या व्यवस्थेतील फरक ग्राहकांना लक्षात यावा या हेतूने लिहिला आहे. दोन्हीकडील दरांमधील फरक म्हणजे फक्त वाढीव नफा नसून इतर अनेक मुद्दे, जे ग्राहक म्हणून सहजासहजी लक्षात येत नाहीत, त्यावर प्रकाश टाकण्यासाठी लिहिला आहे.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

