हृद्य सोहळ्यात राजाभाऊ शेंबेकरांचा ‘स्वराधिराज’ पदवीने सन्मान; तालयोगी पं. तळवलकर यांच्या हस्ते गौरव

रत्नागिरी : ‘राजाभाऊंचा सत्कार करताना मला धन्य झाल्यासारखं वाटतंय आणि माझाच सत्कार झाल्याचं समाधान मिळतंय. राजाभाऊंसारखं निर्मळ, पारदर्शी व्यक्तिमत्त्व आता पाहायला मिळत नाही. त्यांनी रसिकांच्या रूपाने उदंड संपत्ती मिळवली आहे,’ अशा शब्दांत तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांनी कोकणगंधर्व राजाभाऊ शेंबेकर यांचा गौरव केला. कोकणाची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील लोकप्रिय गायक राजाभाऊ शेंबेकर यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल चाहत्यांकडून ‘स्वराधिराज’ ही पदवी देऊन हृद्य सन्मान करण्यात आला. बुधवारी (पाच मार्च २०२५) संध्याकाळी रत्नागिरीच्या मराठा मंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला असलेली रसिकांची तुडुंब गर्दी त्यांना मिळालेल्या लोकाश्रयाची साक्ष देत होती. पं. तळवलकर यांच्या हस्ते शेंबेकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच, त्यांच्या पत्नी सौ. वनिता यांचाही सत्कार करण्यात आला. (व्हिडिओ बातमीच्या शेवटी दिले आहेत.)

या वेळी तालयोगी पं. तळवलकर यांच्यासह पं. मुकुंद मराठे, कीर्तनसूर्य ह. भ. प. श्रीपादबुवा ढोल्ये, संध्या सुर्वे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसंच, प्रसिद्ध हार्मोनियमवादक पं. अजय जोगळेकर, गायक प्रसाद गुळवणी आदींसह संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते स्वराधिराज ही पदवी राजाभाऊंना प्रदान करण्यात आली. राजाभाऊंच्या कारकिर्दीचा पट उलगडणारे अनिल दांडेकर यांनी लिहिलेले मानपत्र त्यांना देण्यात आले. त्या मानपत्राचे वाचनही करण्यात आले. चाहत्यांनी गोळा केलेल्या एक लाख ५१ हजार १११ रुपयांची थैलीही राजाभाऊंकडे सुपूर्द करण्यात आली. या वेळी राजाभाऊंच्या पत्नी सौ. वनिता यांचाही साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला. राजाभाऊंच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी एक छोटी चित्रफीतही या वेळी दाखवण्यात आली. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली.)

राजाभाऊंनी ज्यांना गुरू मानले, त्या पं. राम मराठे यांचे सुपुत्र पं. मुकुंद मराठे यांनी राजाभाऊंची एसटीतील नोकरी आणि गायनकला यांच्यातील साम्यस्थळे दर्शवली. ‘एसटीत असताना ते नोकरीसाठी जागरण करायचे. आता गाण्यासाठी जागरण करतात. इथे आपणहून आलेल्या रसिकांची गर्दी त्यांना मिळालेला लोकाश्रय दर्शवते. राजाभाऊंनी आपलं संगीत बागेप्रमाणे फुलवलं, चतुरस्र गायकी केली, ऑर्गनची आणि तबल्याची साथ केली. त्यांचं संगीत पॅलेस ऑन व्हील्स म्हणजे लाल परीच्या चाकांवर फुललेलं आहे. कलाकारच सांगीतिक आणि अन्य कोणतीही सेवा चांगली करू शकतो,’ अशा शब्दांत पं. मराठे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘गावेत शरदः शतम्’ अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते राजाभाऊंचा सन्मान होणे ही भाग्याची गोष्ट असल्याची भावना कीर्तनसूर्य ह. भ. प. श्रीपादबुवा ढोल्ये यांनी व्यक्त केली. पं. तळवलकर यांच्या काही आठवणीही त्यांनी सांगितल्या. ढोल्येबुवा म्हणाले, ‘राजाभाऊ म्हणजे जीव ओवाळून टाकावा असा माणूस आहे. त्यांनी पोटासाठी नोकरी केली; पण जीवन वाहिलं गाण्यासाठी. २४ तासांत फक्त एखाद-दुसरा तास झोप ते घ्यायचे. त्यांचा आवाज कधी बसलेला मी पाहिलेला नाही. तेच आवाजावर बसतात. रात्रभर ड्रायव्हिंग आणि दिवसा गाणं… इतक्या ताकदीचा माणूस आता भेटणार नाही.’

तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचा ह. भ. प. ढोल्येबुवांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

राजाभाऊंची आदित्य ओक यांनी घेतलेली मुलाखत पाहून भारावून गेल्याची भावना तालयोगी पं. तळवलकर यांनी व्यक्त केली. त्यांचं गाणं त्यांच्या इच्छेप्रमाणे व्यक्त व्हावं, अशा सदिच्छा पं. तळवलकर यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘संगीत ही विद्या आहे; पण ती कला आहे. विद्या खूप मोठी असते. विद्येतली तपकिरीसारखी उचलली जाते ती कला. विद्या बाहेरून आत जाते आणि कला आतून बाहेर पडते. राजाभाऊंनी ही कला तपकिरीसारखी उचलली. त्यांना जे भावलं, आवडलं, त्याचं त्यांनी अनुकरण केलं. अनुकरण जेव्हा मनापासून केलं जातं, तेव्हा ती नक्कल राहत नाही. त्यांना जे भावलं त्यांना त्यांनी केव्हाच गुरू केलं. कष्ट वाटेनासे होण्याच्या अवस्थेला ते पोहोचले होते. त्यामुळे त्यांना हे सारं लवकर अवगत झालं. छंदाने मनुष्य एखाद्या विषयात शिरतो. त्याचा पुढचा प्रवास मात्र तो छंद ठरवतो. स्वरांनी कलाकाराची एकाग्रता सिद्ध होते. लय-ताल हा आत्मविश्वास सांगतो. या दोन्ही गोष्टी एकत्र होण्याच्या स्थितीपर्यंत पोहोचणारा मनुष्य एका ध्येयाने पोहोचतो. हे ध्येय बुद्धीने ठरवलेलं नसतं. एखादी गोष्ट आवडण्याचा संबंध मनाशी आहे आणि ते करण्याचा संबंध बुद्धीशी आहे. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा सहवास त्यांना लाभला. त्यांचा सत्कार माझ्या हातून होणं हा माझा सन्मान आहे. गाणं वगैरे हे हुशारीचं काम नाही, तर श्रद्धेचं काम आहे. एखादा हुशार मनुष्य शिकायला आला, तर मला आता धडकी भरते. कारण त्याची हुशारी त्याला यापासून दूर नेईल की काय अशी भीती वाटते. एखादी गोष्ट शिकण्यााठी श्रद्धा आणि निष्ठा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. संगीत ही सातत्य ठेवण्याची गोष्ट आहे. रियाझाचं तेज कलाकाराच्या बुद्धीवर परिणाम करतं. आता माझ्यासारखी कला कोणाकडेच नाही, असं वाटायला लागतं. हे पचवणंसुद्धा राजाभाऊंना शक्य झालं. त्यांनी कीर्तनांना साथ केली. त्यातून आलेली आध्यात्मिकता त्यांच्यामध्ये दिसते. कलाकार कितीही मोठा असला, तरी तो स्वभावाने चांगला नसेल तर लोक प्रेमाने येत नाहीत. राजाभाऊंच्या बाबतीत तसं नाही. एवढे लोक इथे प्रेमाने आले आहेत. त्यांनी एवढी मोठी संपत्ती मिळवली आहे. त्यांच्यासारखं निर्मळ, पारदर्शी व्यक्तिमत्त्व आता पाहायला मिळत नाही.’

सन्मान स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना राजाभाऊ शेंबेकर यांनी हा आपल्या जीवनातला अपूर्व योग असल्याचे सांगून, सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतानाच सर्वांच्या ऋणात राहण्याची इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ही पदवी स्वीकारण्याच्या योग्यतेचा मी आहे की नाही असा प्रश्न माझ्या मनात आला. शेंबेकर आणि चितळे या दोन्ही घराण्यांतून विद्यार्थीवृत्तीचा वारसा मिळालेला मी अतृप्त विद्यार्थी आहे. पं. राम मराठे यांचा प्रभाव माझ्यावर आहे. चिपळूणच्या अक्कलकोट स्वामी मठात होणाऱ्या भजनांचे संस्कार माझ्यावर लहानपणापासून झाले. आईमुळे ऐकण्याची सवय लागली. वडील, काका यांचे गाणे सतत कानावर पडत होते. आजोळच्या म्हणजे चितळे कुटुंबीयांकडून उत्तेजन मिळत होते. १९७८ साली मी पेरूगेटला बाबूजींचं गीतरामायण ऐकलं. त्यानंतर आईने गीतरामायणाचं पुस्तक घेऊन दिलं. आजीने म्हणजे आईच्या आईने त्यातली एकेक गाणी मला म्हणायला लावली. ह. भ. प. दत्तदास घागबुवांना कीर्तनात साथ करताना खूप गोष्टी शिकलो. पं. जितेंद्र अभिषेकी, पं. राम मराठे, पं. छोटा गंधर्व यांच्या गायकीचे एकलव्याप्रमाणे अध्ययन करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर येथील नूतनगंधर्व कै. अप्पासाहेब देशपांडे यांच्याकडे गंडाबंधन करून गायनविद्येची उपासना केली. नोकरीमुळे गुरूंचा सहवास जास्त लाभला नाही; मात्र नोकरीने माझ्यातला कलाकार जगवला. म्हणून एसटी महामंडळाचेही आभार मानतो. सतत ऐकत राहणं, ऐकलं त्यावर विचार करणं आणि आपल्या गाण्यामध्ये त्याची योजना करणं, चिजा, पदं यांचा अर्थ समजून घेऊन त्यांच्या उच्चारावर लक्ष केंद्रित करणं हेच माझं पाथेय आहे. एकदा शिकवणं म्हणजे किमान तीन वेळा शिकणं. या न्यायाने माझ्याकडून लोकांना काय मिळालं मला माहिती नाही; पण मी मात्र खूप शिकलो. ज्ञान देताना मी हातचं काही राखून ठेवले नाही आणि काही मिळावं अशी अपेक्षा केली नाही. एसटीचे चालक-वाहक कष्टांनी नव्हे, तर मानसिक तणावाने संपतात; पण माझ्याकडे कला असल्याने मी त्यातून बाहेर पडू शकलो.’

आपल्या या वाटचालीत पत्नीसह सर्व कुटुंबीयांची साथ मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. सर्व प्रकारचे सहकार्य ज्यांच्याकडून मिळाले, त्या सर्वांबद्दलच राजाभाऊंनी कृतज्ञता व्यक्त केली.

महेंद्र पाटणकर आणि निबंध कानिटकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात राजाभाऊंचे शिष्य वरद केळकर यांनी सादर केलेल्या मधुवंती रागातील गायनाने झाली. त्यांना श्रीरंग जोगळेकर (हार्मोनियम) आणि प्रथमेश देवधर (तबला) यांनी साथसंगत केली. संध्या सुर्वे यांनी आटोपशीर प्रास्ताविकातून या कार्यक्रमाची नेमकी संकल्पना स्पष्ट केली. राजाभाऊंच्या गायकीची आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये सांगतानाच त्यांनी राजाभाऊंचे वेगळेपण सांगितले. अमित ओक आणि हर्षल काटदरे या शिष्यांनीही राजाभाऊंबद्दल मनोगत व्यक्त केले. आनंद पाटणकर यांनी आभारप्रदर्शन केले. स्वराधिराज राजाभाऊंच्या गायनाने या कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली. संध्या सुर्वे यांच्यासह प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासह राजाभाऊ शेंबेकर सत्कार समितीने या कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वितेसाठी कष्ट घेतले होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply