रत्नागिरी : कोकणातील पारंपरिक लोककलांचे अस्सल संगमेश्वरी बोलीत विनोदी ढंगाने सादरीकरण करून अवघ्या महाराष्ट्रभर गाजत असलेल्या ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या समर्थकृपा प्रॉडक्शन निर्मित लोकनाट्याने ५०० प्रयोगांचा टप्पा पार केला. गुहागर तालुक्यातील अडूर भाटलेवाडी येथे सार्वजनिक उत्सवानिमित्त २३ मार्चला रात्री पार पडलेल्या या ५००व्या प्रयोगावेळी अनेक संस्था आणि नाट्यप्रेमींनी या लोकनाट्यातील कलाकारांचा सन्मान केला.
दहा वर्षांपूर्वी अवघ्या पाच-सहा कलाकारांनी एकत्र येऊन सुरू केलेले हे लोकनाट्याचे रोपटे आता सुमारे २२ जणांच्या संचामध्ये बहरले आहे. गिरीश बोंद्रे आणि आनंद बोंद्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या लोकनाट्यातून भजन, जाखडी, नमन आदी लोककलांचे सादरीकरण केले जाते. एक मुंबईकर कोकणातील विविध लोककलांची ‘डॉक्युमेंटरी’ करण्यासाठी कोकणात येतो आणि त्याला कोकणातील विविध इरसाल व्यक्तिमत्त्वे भेटत जातात. त्यातून कोकणातील लोकसंस्कृतीचे दर्शन घडत जाते, अशी मध्यवर्ती कल्पना घेऊन हे लोकनाट्य पुढे सरकत जाते. नोकरी-उद्योगानिमित्ताने शहराची वाट धरलेल्या कोकणवासीयांमुळे गावातील घरे ओस पडत चालली असून, कोकणातील उर्वरित मंडळी आपल्या या व्यथा या लोकनाट्यातून मांडतात. व्यवसाय, उद्योगाच्या दृष्टीने कोकण कसे समृद्ध आहे याची आठवण करून देतात. तसेच विकासाच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या कोकणातील जमिनी पाहता भविष्यात स्थानिकांना स्वतःसाठी जागा उरणार नसून, परकीयांकडे चाकरी करण्याची पाळी येऊ शकेल हे भयाण वास्तव यातून मांडण्याचा प्रयत्न केला जातो. पात्रांचे अस्सल संगमेश्वरी बोलीतील विनोदी संवाद लोककलांची उंची अधिक वाढवतात. ९८व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात सादर झालेल्या या लोकनाट्याला सुप्रसिद्ध सिने-नाट्य कलाकारांनी भरभरून दाद देऊन गौरव केला होता.
या लोकनाट्याचे रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, मुंबई आदी ठिकाणी प्रयोग झाले असून, सर्वत्र रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. रविवारी (२३ मार्च) या लोकनाट्याचा ५००वा प्रयोग अडूर (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) येथील भाटलवाडीच्या रंगमंचावर सादर झाला. या निमित्ताने मे. खातू मसाले उद्योग समूह, तसेच अमरदीप परचुरे, आमोद गोळे, निखिल ओक, भाजपा गुहागर तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे, पुरळ (देवगड) येथील श्री. गोडसे, नाटक कंपनी चिपळूण, भाटलेवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ अडूर भाटलेवाडी आदींनी सर्व कलाकारांचा यथोचित सत्कार केला. या वेळी सचिन ओक, उमेश पांचाळ, मुन्ना देसाई, संतोष सनगरे, गणेश राऊत, किरण राठोड, रोहन शेलार, कांता कानिटकर, तसेच गुहागर, रत्नागिरी, चिपळूणमधील नाट्यकलावंत उपस्थित होते.
- कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
- टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

