वन्दे मातरम् या राष्ट्रगीताच्या सार्धशती अर्थात् १५०व्या वर्षानिमित्त संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांनी वन्दे मातरम् हे गीत भारताचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून दिलेल्या सांगीतिक लढ्याबद्दल गुढीपाडव्याची ही विशेष आठवण. (मा. फुलंब्रीकर यांच्या आवाजातल्या वन्दे मातरम् गीताचा ऑडिओ शेवटी दिला आहे.)
………..
‘संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर ऊर्फ मास्तर कृष्णराव यांच्या कारकीर्दीत २३ मार्च १९४७ हा गुढीपाडव्याचा दिवस ऐतिहासिक ठरला.
संगीतकलानिधी मास्तर कृष्णराव यांच्या जीवनातील एक तेजस्वी पर्व म्हणजे त्यांनी वन्दे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजे सन १९३४ पासून १९५० पर्यंत अविरत व निर्भीडपणे सांगीतिक लढा दिला. मास्तरांच्या गौरवपर जाहीर ध्वनिमुद्रित भाषणात पु. ल. देशपांडे म्हणाले होते, ‘वन्दे मातरम्’साठी मास्तरांनी घेतलेले परिश्रम पाहून त्यांनाच ‘वन्दे मास्तरम्’ म्हणावेसे वाटते.’
मास्तरांनी वन्दे मातरम् हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होण्यासाठी १९३५ साली संपूर्ण कडव्यांसहित वन्दे मातरम् गीतास चाल दिली आणि प्रभात फिल्म कंपनीचे एक भागीदार असलेले व्ही. शांताराम यांच्या संमतीने प्रभातच्या स्टुडिओमध्ये त्या गीताचे ध्वनिमुद्रण केले. त्यांनी मिश्र झिंझोटी या रागात सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष समूहाला सांघिकरीत्या सहजपणे म्हणता येईल अशा पद्धतीने त्या गीताची स्वररचना केली. झिंझोटी हा राग मुख्यत्वे मंद्र व मध्य सप्तकात गायला जातो. म्हणून सामान्य जनता डोळ्यांसमोर ठेवून सामूहिक गायनास समर्पक असा झिंझोटी राग विद्वान गायक व संगीतकार असलेल्या मास्तरांनी निवडला. झिंझोटी या रागाला मास्तर ‘राष्ट्रीय राग’ असे संबोधत. पुढे त्यांनी या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली. त्याकाळी मास्तरांची ही रचना अत्यंत लोकप्रिय झाली. अनेक गायक व संगीतकारांनी या गीतास चाली लावून गायन केले आहे; परंतु एकमेव मास्तरांची वन्दे मातरम् रचना सामान्य स्त्री-पुरुषांच्या समूहास सामूहिकरित्या सुलभपणे म्हणता येईल अशी आहे. सध्या प्रचलित असलेली वन्दे मातरम् गीताची चालदेखील मूळ मास्तरांच्या चालीवर आधारित आहे.
स्वातंत्र्यपूर्व भारताचे राष्ट्रगीत म्हणून मास्तरांची ही रचना १९३६ साली बर्लिन ऑलिंपिकमध्ये वाजवण्यात आली. प्रभात फिल्म कंपनीच्या सर्व चित्रपटांच्या अखेरीस थिएटरमध्ये मास्तरांची ही रचना १९३७ सालापासून वाजवली जात असे. तसेच मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांच्या शेवटी नटवर्गातर्फे मास्तरांच्या याच चालीतील वन्दे मातरम् म्हणण्याची प्रथा सुरू झाली. म्हणजे वन्दे मातरम् हेच संगीत नाटकांचे भरत वाक्य बनले.
मास्तरांना ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली असलेल्या रेडिओवरील त्यांच्या गायन मैफलीत ७ ऑगस्ट १९३७ रोजी वन्दे मातरम् गाऊ दिले नाही, म्हणून कट्टर देशभक्त असलेल्या मास्तरांनी बाणेदारपणे रेडिओवर गायला बहिष्कार टाकला. त्याकाळी कलावंतांच्या दृष्टिकोनातून विचार करता रेडिओ हे कला सादर करून लोकांपर्यंत पोहोचायचे आणि पैसे मिळवण्याचे एकमेव प्रभावी साधन होते. परंतु यापेक्षा मास्तरांना त्यांचा देशाभिमान मोठा होता. त्यांनी रेडिओतून मिळणारी प्रसिद्धी व पैसा यावर पाणी सोडले. मास्तर हे अखिल भारतभर अतिशय प्रसिद्ध असे कलावंत असल्याने मास्तरांना रेडिओवर वन्दे मातरम् गाऊ दिले नाही, या घटनेचा निषेध त्या काळातील आघाडीच्या सर्व वर्तमानपत्रांतून करण्यात आला. दैनिक केसरीने तर त्या घटनेविषयी पानभर अग्रलेख लिहिला. हा बहिष्कार अखंडपणे दहा वर्षे मास्तरांनी पाळला. अखेरीस १९४७ साली स्वातंत्र्य दृष्टिपथात आल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी रेडिओस दूरध्वनी करून सांगितले की मास्तरांना रेडिओवर वन्दे मातरम् गाण्यास आमंत्रण द्यावे. त्याप्रमाणे रेडिओने मास्तरांना सन्मानाने गाण्याचे आमंत्रण दिले. सरदार पटेलांनी मध्यस्थी केल्यामुळे मास्तरांनी २३ मार्च १९४७ या गुढी पाडव्याच्या दिवशी रेडिओवर जाऊन वन्दे मातरम् गाऊन आपला बहिष्कार मागे घेतला आणि रेडिओवर गाण्यास पुन्हा प्रारंभ केला. अशा प्रकारे योद्धा कलावंत असलेल्या मास्तरांनी गुढी पाडवा या हिंदू नववर्षाच्या शुभ दिनी हे गीत रेडिओवर गाऊन परकीयांविरुद्धचा सांगीतिक लढा जिंकला.
भारतास १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यावर आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे मास्तरांना अधिकृतरीत्या रेडिओवर संगीतकार म्हणून जबाबदारी देण्यात आली. शिवाय आकाशवाणीच्या कार्यकारिणी मंडळावर मास्तरांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली.
वन्दे मातरम् गीताचे जनक बंकिंमचन्द्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीत हे तेजस्वी गीत लिहिले. बंकिंमचंद्रांनी शस्त्र वगैरे हातात घेऊन क्रांतिकारकांबरोबर कधीही लढा दिला नाही. पण ते सिद्धहस्त लेखक असल्याने त्यांनी लेखनातून मोठी क्रांती केली. तद्वत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचे मास्तर कृष्णराव शपथबद्ध सदस्य असले तरीही ते संगीतावर मास्टरी अर्थात् हुकुमत असलेले संगीतकलानिधी असल्याने त्यांनी संगीताच्या माध्यमातूनच सर्व क्रांती केली.
अभिनव भारताचे सदस्य असले तरी मास्तर जिथे आमंत्रण मिळेल तिथे संपूर्ण वन्दे मातरम् स्वकृत चालीत गायला जायचे. अगदी ‘चले जाव’ या भारत छोडो आंदोलनातदेखील मुंबईत गोवालिया टॅंक मैदानावर अटकेची पर्वा न करता मास्तरांनी स्वकृत चालीत संपूर्ण वन्दे मातरम् म्हटले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अभिनव भारत संघटनेचा सांगता समारंभ पुण्यात मे १९५२ मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा झाला. तेव्हा स्वातंत्र्ययुद्धातील सर्व हुतात्म्यांच्या स्मरणार्थ एक क्रांतीस्तंभ उभारून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांच्या रूपाने हा समारंभ झाला. तीन दिवसीय सांगता सोहळ्याच्या १० मे १९५२ या अखेरच्या दिवशी मास्तर कृष्णराव यांनी व्यासपीठावरून स्वकृत चालीतील संपूर्ण वन्दे मातरम् म्हटले. हे गीत गाण्यासाठी त्यांना स्वतः स्वा. सावरकरांनी आमंत्रित केले होते. तेव्हा व्यासपीठावर स्वातंत्र्यवीरांखेरीज सेनापती बापट आणि गोळवलकर गुरुजी उपस्थित होते.
मास्तरांनी एकदा गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची भेट घेऊन त्यांना गाणी ऐकवली; तेव्हा रवींद्रनाथांनी मास्तरांना “You are a musical genius!” म्हणून त्यांच्या संगीतकलेची प्रशंसा केली आणि त्यांना अमेरिकेस कला सादर करावी, असे सुचवून शिफारपत्र देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु ही भेट घडल्यावर काही दिवसांतच रवींद्रनाथांचे निधन झाल्याने तो योग काही जुळून आला नाही. या घटनेचा उल्लेख मास्तरांच्या जन्मशताब्दीनिमित्त १९९७ साली प्रसिद्ध केलेल्या संगीतकलाविहार मासिकाच्या विशेषांकात आहे. संस्कृतच्या निवृत्त प्राध्यापिका आणि गायनाचार्य डॉक्टर सुलभा ठकार यांनी संगीतकलाविहार मासिकातील ‘संगीतकलानिधीचे स्मरणचित्र’ या लेखाच्या शेवटी यथोचित लिहिले आहे – मास्तर हे मास्तरच! असा कलावंत पुन्हा होणे नाही.
थोडक्यात, यावर्षी वन्दे मातरम् गीताचे सार्धशती वर्ष सुरू आहे. या वर्षाच्या ३० मार्च २०२५ या गुढीपाडव्याच्या दिवशी २३ मार्च १९४७ या गुढीपाडव्याच्या दिनी मास्तरांनी रेडिओवर टाकलेला बहिष्कार वन्दे मातरम् गाऊन मागे घेतल्याच्या ऐतिहासिक घटनेस ७८ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून येथे त्या घटनेचे केलेले हे हृद्य स्मरण!
वन्दे मास्तरम्! वन्दे मातरम्! भारत माता की जय!!
- प्रिया फुलंब्रीकर
(संपर्क – 97666 23409)
मास्टर कृष्णराव यांच्या आवाजातील वन्दे मातरम् –
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


७८ वर्षांपूर्वी संगीत कलानिधी आदरणीय कै.मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी त्या आधी १० वर्षे अन्यायी इंग्रज शासना विरुद्ध लढा देत आकाशवाणीवर घातलेला बहिष्कार २३ मार्च १९४७, गुढी पाडव्याला मागे घेऊन स्वतंत्र भारतात उभारलेली ही विजयाची निस्सीम गुढी अत्यन्त स्फूर्तीदायक आहे. हाती प्रत्यक्ष शस्त्र न घेताही संगीता सारख्या कोमल माध्यमातून जहाल क्रांती करून दाखवणारा हा अवलिया संगीतकार केवळ अद्वितीय! असं उदाहरणं संगीत क्षेत्रात तत्पूर्वी कधीही झाले नाही. भारतमातेच्या मुकुटातला हा खरा शिरोमणी! अनेक त्रिवार वंदनही अपुरे पडतील असा!! 🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🪷🙏🏻🪷🙏🏻