चिपळूण : वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांचे १७ मे २०२५ रोजी निधन झाले. गेली अनेक वर्षे ते चिपळूणमध्ये पौरोहित्य क्षेत्रात कार्यरत होते आणि वेदशास्त्रांचे शिक्षण देऊन त्यांनी अनेक विद्यार्थीही घडवले. दिवंगत फडकेशास्त्रींना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी, सात जून २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता चिपळूणमध्ये श्रद्धांजली सभा होणार आहे. वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके विद्यार्थी मंडळ आणि चिपळूणचा ब्राह्मण सहायक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण मध्यवर्ती एसटी स्टँडच्या मागे असलेल्या ब्राह्मण सहायक संघातच ही सभा होणार आहे. सभेत मोजक्या शब्दांमध्ये मनोगत व्यक्त करता येईल, असे आयोजकांनी कळवले असून, या सभेला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांचा अल्प परिचय
वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांचा जन्म १९ जुलै १९४४ रोजी रत्नागिरी तालुक्यातील पावसजवळच्या कुर्धे या गावी झाला. प्रसिद्ध वेदमूर्ती जनार्दन नारायण फडके यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र. लहानपणापासूनच त्यांनी वडिलांकडून वेदशास्त्रांचे शिक्षण घेतले आणि त्यात पारंगत झाले. घरी काही काळ त्यांनी रेशन दुकानही चालवले. पुढे साधारण वयाच्या तिशीत ते काही उद्योग-व्यवसाय करण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडले. मग ते चिपळूणमध्ये स्थायिक झाले. तिथे सुरुवातीला त्यांनी कंत्राटे घेऊन रस्त्यांची, तसेच अन्य कामे करण्याचा व्यवसाय केला. त्यानंतर अनेक वर्षे हॉटेल व्यवसायही केला. वेदशास्त्रांचे धडे लहानपणीच गिरवलेले असल्याने नंतर ते पुन्हा पौरोहित्याकडे वळले. करारी स्वभाव, तसेच शिस्तबद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने सारी कामे करणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये. त्यामुळे या क्षेत्रात त्यांचे मोठे नाव झाले. आपले उद्योग-व्यवसाय सांभाळतानाच त्यांनी काही ज्येष्ठ व्यक्तींना पौरोहित्याचे धडे द्यायला सुरुवात केली होती. नंतर गेली काही वर्षे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना वेदशास्त्रांचे धडे दिले. अशा रीतीने त्यांनी आपल्या वडिलांचा केवळ पौरोहित्याचाच नव्हे, तर वेदशास्त्रसंपन्न विद्यार्थी घडवण्याचा वारसाही समर्थपणे चालवला. अगदी अखेरपर्यंत ते कार्यरत होते. आपल्या कुर्धे या गावाशी आणि मूळ घराशी त्यांचे ऋणानुबंध अगदी दृढ होते. स्वभाव काहीसा कडक असला, तरी त्यांच्या मनात कुर्ध्याबद्दल एक हळवा कोपरा होता. या वयातही त्यांचे कुर्ध्यात कायम येणे-जाणे असे. गावातील सर्वांशी त्यांचे स्नेहबंध होते.
आपल्याला अगदी चालताबोलता मरण यावे, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. अगदी तशाच पद्धतीने त्यांना मृत्यू आला. १७ मे २०२५ रोजी सकाळी त्यांना थोडा त्रास झाला. त्यामुळे चिपळूणमध्येच काही तपासण्या करून त्यांना अधिक उपचारांसाठी रत्नागिरीत आणण्यात आले; मात्र हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रात्री १० वाजून ४० मिनिटांनी त्यांचे चिरायु हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या-जावई, नातवंडे, भाऊ, बहिणींसह खूप मोठा परिवार आणि विद्यार्थीवर्ग आहे. अमेरिकेत वास्तव्याला असलेली त्यांची कन्या भारतात परतल्यावर १९ मे २०२५ रोजी त्यांच्या पार्थिवावर कुर्धे या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेदशास्त्रांवर निष्ठा असलेल्या या ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या निधनामुळे आधारवडच हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

