घोणे काष्ठशिल्प म्युझियम, हॉटेल ‘आजीची आठवण’चा प्रारंभ

कोलाड (रायगड) : कोकणातील कला, संस्कृती आणि पर्यटनाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेल्या ‘ग्लोबल कोकण आर्ट व्हिलेज’च्या उपक्रमाची आणि ‘घोणे काष्ठशिल्प म्युझियम’ व ‘हॉटेल आजीची आठवण’ या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांची सुरुवात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोलाड (जि. रायगड) येथे पार पडली.


शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात आलेले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या नव्या केंद्राला पहिल्याच दिवशी भेट देऊन या उपक्रमांमधील कला आणि प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.

कोकणातील सुप्रसिद्ध काष्ठशिल्पकार स्वर्गीय रमेश घोणे यांच्या आयुष्यभराच्या कलायात्रेचे संचित असलेले घोणे काष्ठशिल्प म्युझियम आज अधिकृतपणे सुरू झाले. कोणतेही जिवंत झाड न तोडता, नैसर्गिकरीत्या सुकलेल्या लाकडातून घडवलेल्या शिल्पांचे हे म्युझियम जागतिक दर्जाच्या कलाकृतींनी सजलेले आहे. या शिल्पांमध्ये झाशीची राणी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वासुदेव बळवंत फडके आणि सरखेल कानोजी आंग्रे यांच्यासारख्या असंख्य राष्ट्रपुरुषांचे प्रभावी दर्शन घडते.

पर्यटकांना कोकणातील पारंपरिक चवींचा अनुभव देता यावा, यासाठी राजश्री यादवराव यांच्या संकल्पनेतून ‘हॉटेल आजीची आठवण’ या स्थानिक भोजनगृहाची सुरुवात करण्यात आली. येथे कोकणातील पारंपरिक खाद्यपदार्थ आणि लोप पावत चाललेल्या चवींचा समावेश असून, जुन्या आठवणी जागवणाऱ्या स्वादांचा अनोखा संगम पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

दरम्यान, कोकणातील असंख्य राष्ट्रपुरुषांच्या योगदानाचा गौरव म्हणून मुंबई-गोवा महामार्गाला ‘स्वराज्य भूमी कोकण महामार्ग’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी या कार्यक्रमात ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

नव्या कलाकेंद्रात ‘कोकण रत्न प्रदर्शन’देखील कायमस्वरूपी उभारण्यात आले आहे. त्यामध्ये कोकणाच्या मातीतून जन्मलेल्या जगविख्यात व्यक्तिमत्त्वांविषयी माहिती आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

या प्रसंगी ग्लोबल कोकणच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणचे नगरसेवक प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे, अंबरनाथचे नगरसेवक सुभाष साळुंखे आदींनी कोकणातील उद्योजकता विकास, पर्यटन संधी, आणि रोजगार निर्मितीबाबत चर्चा केली. ‘रायगड पर्यटन शिवतीर्थाटन’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमास शासनाची साथ मिळावी, यासाठी विनंती करण्यात आली असून, याला उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, कोकणात घराघरातून कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन व होमस्टेच्या माध्यमातून हजारो स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. या संकल्पनेवर आधारित प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करून याच पावसाळ्यापासून रायगड व पोलादपूर परिसरात याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणातील तरुणांचे स्थलांतर थांबवण्यासाठी स्थानिक रोजगारनिर्मिती ही काळाची गरज असल्याचे सांगितले. उद्योग, पर्यटन आणि उद्योजकतेला बळ दिल्यास कोकणातच भरपूर संधी निर्माण होतील, असेही ते म्हणाले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply