कोकणातील खाद्यसंस्कृती : लेख स्पर्धा, व्हिडीओ स्पर्धा

रत्नागिरी : कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने कोकणातील खाद्यसंस्कृती या विषयावर लेख स्पर्धा आणि व्हिडीओ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पालघरपासून सिंधुदुर्ग-गोव्यापर्यंत पसरलेल्या कोकणाची ‘देवभूमी’ अशी असलेली ओळखच या प्रदेशाचे महत्त्व स्पष्ट करते. या कोकणातील वैविध्यपूर्ण विषयांचे दस्तावेजीकरण करण्याच्या मुख्य उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या साप्ताहिक कोकण मीडियाचा दहावा दिवाळी विशेषांक यंदा (२०२५) प्रसिद्ध होणार आहे. यंदाचा हा अंक कोकणातील खाद्यसंस्कृतीला वाहिलेला असेल. दर वर्षीप्रमाणे यंदाही विशेषांकाच्या विषयाच्या अनुषंगाने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, यंदा लेख आणि व्हिडीओ स्पर्धा घेतली जाणार आहे.
कोकण मीडियाने गेल्या नऊ वर्षांमध्ये कोकणातील वास्तुसौंदर्य, जलवैभव, उत्सव, बोलीभाषा, ग्रामदैवते, आठवणीतील कोकण अशा विविध विषयांना वाहिलेले दिवाळी विशेषांक प्रसिद्ध केले आहेत. त्यांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच, पारितोषिकेही मिळाली. यंदा दहावा दिवाळी अंक प्रसिद्ध होणार असून, त्यासाठी कोकणातील खाद्यसंस्कृती हा विषय निवडण्यात आला आहे. कोकणी माणूस मुळातच रसिक. त्यामुळेच तो काव्यातील (कला-साहित्य) नवरसांमध्येही रमतो आणि आहारातील सहा रसांमध्येही रस घेतो. इथल्या जैवविविधतेमुळे हा प्रदेश निसर्गसंपन्न तर आहेच; पण त्या जैवविविधतेमुळेच इथल्या खाद्यसंस्कृतीतही प्रचंड विविधता आहे. शाकाहार, मत्स्याहार आणि मांसाहार या तिन्ही प्रकारांच्या इथे केल्या जाणाऱ्या पाककृतींमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसते. हे पदार्थ तयार करण्यासाठी विशिष्ट साहित्य गोळा करण्यापासून त्याची पाककृती सिद्ध करण्यापर्यंत आणि प्रत्यक्ष खाण्यापर्यंतचे सर्व टप्पे केवळ उदरभरणाचा नव्हे, तर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आणि अनुभूती देणारे असतात. त्यांच्याशी निगडित असलेल्या अनेक आठवणीही असतात. अनेक पदार्थांचे आणि इथल्या सणवारांचे घट्ट नाते आहे. सध्याच्या ‘ग्लोबल व्हिलेज’च्या काळात पंजाबी पदार्थांपासून चायनीज, काँटिनेंटलपर्यंत सगळे पदार्थ आपल्याला कोणत्याही हॉटेलात सहज खायला मिळतात. जुने कोकणी पदार्थ मात्र सहज उपलब्ध होत नाहीत. हॉटेलमध्ये उपलब्ध होणे दूर, पण अनेक जुने कोकणी पदार्थ घरी केले जाण्याचे प्रमाणही आता खूप कमी झाले आहे. त्याची कारणे अनेक आहेत आणि त्या कारणांमध्ये आपल्याला सध्या जायचे नाही; मात्र या जुन्या कोकणी खाद्यसंस्कृतीच्या जतनासाठी थोडा हातभार लागावा, या उद्देशाने यंदाचा दिवाळी अंक कोकणातील खाद्यसंस्कृती या विषयावर काढायचे ठरवले आहे. कोकणातील जुनी घरे हळूहळू लुप्त होत आहेत, जुन्या पिढीतील माणसेही कमी होत चालली आहेत, साहजिकच खाद्यसंस्कृतीही बदलत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर, खासकरून खाद्यसंस्कृतीविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देणे हा या अंकाचा उद्देश आहे. या विशेषांकात कोकणी खाद्यसंस्कृतीतील पाककृती तर असतीलच; पण त्या पाककृतींशी निगडित आठवणींचा खजिनाही उघड व्हावा, असा हेतू आहे. म्हणूनच त्या विषयावरील साहित्य मागवण्यात येत आहे. पाककृतींविषयीच्या व्हिडीओ स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. कोकणातील खाद्यसंस्कृतीच्या अनुषंगाने कोणतेही साहित्य – म्हणजे पाककृती, कथा, कविता, चित्र, व्यंगचित्र, लेख, इत्यादी – यांपैकी काहीही या अंकासाठी पाठवता येईल; मात्र स्पर्धेसाठी लेख किंवा व्हिडीओ पाठवण्यापूर्वी खालील नियम वाचावेत.

लेख स्पर्धेचे नियम :
कोकणातील कोणत्याही पारंपरिक खाद्यपदार्थांशी निगडित आठवणी असलेला म्हणजेच स्मरणरंजनपर ललित लेख किंवा कोकणातील पारंपरिक पदार्थांची माहिती देणारा, वेगळेपण आणि वैशिष्ट्ये सांगणारा, तसेच येथील खाद्यसंस्कृतीविषयी अन्य माहिती देणारा लेख स्पर्धेसाठी पाठवणे अपेक्षित आहे. यात साहजिकच खाद्यपदार्थ तयार करण्यापासून खाण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांमधील आठवणी असू शकतात. सण-उत्सवांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांविषयी लिहिताना त्या वेळच्या आठवणीही लिहिता येतील. या आठवणी लिहितानाच पदार्थांची पाककृतीही ओघाने येईलच. लेख जास्तीत जास्त एक हजार शब्दांपर्यंतचाच असावा. पदार्थ आणि आठवणी कोकणातील ज्या भागातील आहेत तेथील बोलीभाषेत लेख लिहिल्यास अधिकच उत्तम होईल; मात्र ते बंधनकारक नाही. कोकणातील खाद्यसंस्कृतीच्या आठवणी सांगणाऱ्या लेखांबरोबरच त्या संदर्भातील प्रथा-परंपरा, चालीरीती, पद्धती, त्यांचे वेगळेपण, महत्त्व, वैशिष्ट्ये यांविषयी माहिती देणारे लेखही स्पर्धेसाठी पात्र ठरतील. जुन्या काळच्या पाककृतीही (रेसिपी) आवर्जून पाठवाव्यात. वैशिष्ट्यपूर्ण पाककृती अंकात प्रसिद्धही केल्या जातील; मात्र निव्वळ पाककृती लेखन (म्हणजे साहित्य, कृती इत्यादी) स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
पाककृती व्हिडीओ स्पर्धेचे नियम :
व्हिडीओ स्पर्धेसाठीही कोकणातील खाद्यसंस्कृती हाच विषय आहे. कोकणात पूर्वीच्या काळी केल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा पदार्थांच्या पाककृती तयार करण्याची सगळी प्रक्रिया, त्यातली लगबग, विविध टप्पे व्हिडीओमध्ये असावेत. मोबाइल आडवा (हॉरिझाँटल) धरून व्हिडीओ चित्रित करावा. व्हिडिओ जास्तीत जास्त दहा मिनिटांचा असावा. व्हिडीओमध्ये निवेदन असले तरी चालेल; मात्र कोणतेही पार्श्वसंगीत (Background Music) वापरू नये. पूर्वी अन्य ठिकाणी (यू-ट्यूब किंवा अन्य कुठेही) प्रसिद्ध झालेले व्हिडीओ पाठवू नयेत. व्हिडीओ ज्या पाककृतीचा असेल, ती कृती सोबत लेखी स्वरूपातही पाठवावी.
स्पर्धेतील विजेत्या लेखांसह अन्य निवडक साहित्य अंकात प्रसिद्ध केले जाईल. व्हिडीओ कोकण मीडियाच्या यू-ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केले जातील.
साहित्य पाठवण्यासाठी अंतिम मुदत : १४ सप्टेंबर २०२५
ई-मेल : kokanmedia2@gmail.com
व्हॉट्सअ‍ॅप नंबर : 9822255621
पत्ता : संपादक, कोकण मीडिया,
कुसुमसुधा, ६९७, रामचंद्रनगर (श्रीनगर),
मु. पो. खेडशी, ता. जि. रत्नागिरी ४१५६३९
(दिवाळी अंकासाठी आणि स्पर्धेसाठी साहित्य पाठवताना आपले नाव, पत्ता, वय, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती सोबत द्यावी.)
कोकण मीडियाचे आतापर्यंतचे विशेषांक :
२०१६ – मागोवा : शतकाचा, शतकापूर्वीचा
२०१७ – वास्तुसौंदर्य विशेष
२०१८ – जलवैभव विशेष
२०१९ – कोकणातील बोलीभाषा – कथा विशेषांक
२०२० – कोरोनाच्या अनुषंगाने साहित्य असलेला विशेषांक
२०२१ – इम्युनिटी विशेषांक
२०२२ – कोकणातील उत्सव विशेषांक
२०२३ – आठवणीतले कोकण (दोन भाग)
२०२४ – कोकणातील ग्रामदैवते (दोन भाग)

On sale products

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply