मुंबई : ग्लोबल कोकण संस्थेतर्फे सह्याद्री महोत्सवांतर्गत पहिला कार्यक्रम म्हणून भात लावणी महोत्सव सहल आयोजित करण्यात आली आहे. येत्या १२ आणि १३ जुलै रोजी ही सहल लहुळसे (ता. पोलादपूर, जि. रायगड) येथे होणार आहे
मुंबई किंवा पुण्यातून स्वतःच्या गाडीने किंवा सहलीच्या गाडीने त्यामध्ये सहभागी होता येईल. दोन आणि एका दिवसाची सहल आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही दिवशी सकाळी सहा वाजता मुंबई आणि पुणे येथून सहलीची गाडी निघेल. ग्लोबल कोकण आर्ट व्हिलेज (हॉटेल आजीची आठवण) येथे चहा-अल्पोपाहार आणि स्वागत होईल. सकाळी ११ वाजता लहुळसे येथे आगमन होईल. ग्रामस्थांच्या वतीने पर्यटकांचे स्वागत होईल. त्यानंतर हेरिटेज वॉक, गाव पाहणे, झुणकाभाकरीचे भोजन, गावातील वैशिष्ट्यपूर्ण अल्पोपाहार, त्यानंतर नदीत पोहणे, नंतर सह्याद्री ट्रेकिंग, जंगल भ्रमंती, सह्याद्रीतील जैववैविधता माहिती, ग्रामदैवत भेट, तामखडा वॉटर फॉल, सह्याद्रीमध्ये वनभोजन, सोबत ग्रामजीवन, कोकणातील ग्रामसंस्कृती, परिसराचा इतिहास, छत्रपती शिवरायांचा आणि पोलादपूर परिसराचा ऐतिहासिक वारसा याविषयी माहितीपूर्ण व्याख्यान, तलावामध्ये गळ वापरून मासे पकडणे असे अनेक उपक्रम केले जातातील. संध्याकाळी सहा वाजता परतीचा प्रवास सुरू होईल.
जे या सहलीसाठी दोन दिवस येतील, त्यांना तानाजी मालुसरे यांचे उमरठ हे गाव, नरवीर तानाजी मालुसरे स्मारक दर्शन, कुडपण हे शेलार मामा यांचे गाव, मोरझोत धबधबा, आणखी तीन-चार धबधबे पाहता येतील. दोन दिवसांची सहल १२ आणि १३ जुलै आणि एक दिवसाची १३ जुलै रोजी आयोजित केली आहे. दोन दिवसांच्या वास्तव्यात शेतकऱ्यांच्या घरामध्ये निवास व्यवस्था व गावात राहून ग्रामजीवन अनुभवणे असा कार्यक्रम आहे.
गावातील पर्यटनाचा पहिला कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि जल्लोषात गावकऱ्यांच्या मदतीने ग्लोबल कोकणने आयोजित केला आहे. निसर्गप्रेमींनी व जास्तीत जास्त पर्यटकांनी सहपरिवार सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या सशुल्क सहलीतील सहभागासाठी मानसी (८८५०४३८४०९) किंवा अविनाश (8898259526) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

