रत्नागिरी : रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या पुनस गावात महिन्याभरापूर्वी बिबट्याचे एक महिन्याचे पिल्लू आढळले. त्याची आईशी भेट घडवून आणण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले; मात्र वनविभागाने त्याची उत्तम काळजी घेऊन त्याला घर मिळवून दिले. वन्यप्राणी-मानव संघर्षाच्या बातम्या वारंवार कानी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर ही घटना नक्कीच सुखावणारी आहे. (व्हिडिओ आणि फोटो बातमीच्या शेवटी)
आठ जून रोजी पुनस गावात संसारे तिठ्यानजीक डांबरी रस्त्यावर बिबट्याचे पिल्लू असल्याबाबतची माहिती मिळताच लांज्याचे वनपाल आणि लांजा व कोर्ल्याचे वनरक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ते एक महिन्याचे पिल्लू अशक्त असल्याचे आढळून आले. वनाधिकाऱ्यांनी पिल्लाला ताब्यात घेतले. त्यानंतर विभागीय वनाधिकारी (रत्नागिरी चिपळूण) गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक रत्नागिरी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनानुसार त्या पिल्लाची आईशी पुनर्भेट होण्यासाठी अनुकूल जागा निवडून कॅमेराद्वारे नजर ठेवून तीन दिवस केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. थर्मल ड्रोनद्वारे घेतलेल्या शोधातही त्याची आई दिसली नाही. दरम्यानच्या काळात सातारा वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांना पाचारण करून त्यांच्या देखरेखीखाली पिल्लाला लांज्याच्या शासकीय विश्रामगृहात ठेवण्यात आले. वनरक्षकांकडून पिल्लाची अहोरात्र काळजी घेण्यात आली. आईवेगळ्या झालेल्या या पिल्लाला दिवसातून चार वेळा खाऊ-पिऊ घातले जात होते. त्याच्यासाठी लागणारी खाद्य पावडर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार कोल्हापूर-मिरजेतून उपलब्ध करून देत होते. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
कोर्ल्याच्या वनरक्षक श्रीमती श्रावणी पवार, लांज्याच्या वनरक्षक श्रीमती नमिता कांबळे, लांज्याचे वनपाल सारिक फकीर असे सर्व जण पिल्लाची देखरेख करत होते. २५ दिवसांनी म्हणजे दोन जुलैला सारिक फकीर आणि डॉक्टर निखिल बनगर यांनी शासकीय वाहनाने बिबट्याच्या पिल्लाला पुढच्या संगोपनासाठी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनाधिकारी डॉक्टर विनया जंगले यांच्याकडे सुपूर्द केले. त्या वेळी पिल्लू सुस्थितीत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. बिडकर यांनी लांज्याच्या शासकीय विश्रामगृहातील खोलीची सोय केली. खानसामा श्री. फोंडेकर, श्री. राप यांनी वेळोवेळी आवश्यक मदत केली. आईच्या मायेची सर दुसऱ्या कशालाही येत नाही हे खरे असले, तरी वनविभागासह सर्व संबंधित यंत्रणांनी त्या पिल्लाला आईची उणीव भासू न देण्याचा पुरेपूर प्रयत्न करून त्याला काळजी घेणारे घर मिळवून दिले.
वन्यजीव कोठे अडचणीत सापडल्यास किंवा अशा प्रकारची घटना घडल्यास १९२६ हा वन विभागाचा टोल फ्री क्रमांक किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड



