रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये यांचा २१ जुलै रोजी वाढदिवस. नव्वदाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाने व्यक्त केलेले मनोगत.
माझा जन्म २१ जुलै १९३६ रोजी झाला. ज्युनिअर बी.ए.पर्यंतचे शिक्षण रत्नागिरीतच घेतले. त्यानंतर लगेचच मी राजकारणात सक्रिय झालो. सुरुवातीपासून काँग्रेसच्या विचारांशी मी जोडला गेलो. १९५६ -१९५७ मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी कॉंग्रेसच्या सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोठी चळवळ सुरू केले. अशा स्थितीत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते या चळवळीत सहभागी झाले. त्यामुळे काँग्रेस कार्यालयात बसण्यासाठी मला कै. सावंत, शामराव पेजे तसेच माझे वडील बाळासाहेब लिमये यांनी आग्रहाने तेथे पाठवले. तेव्हापासून मी काँग्रेसच्या कार्यात सहभागी झालो. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर १९६०-१९६२ मध्ये शहर काँग्रेस सचिव तदनंतर सात ते आठ वर्षे तालुका काँग्रेसचा सचिव, तर १९८२-१९९२ पर्यंत जिल्हा काँग्रेसचा सचिव म्हणून कार्यरत होतो.
मार्च १९९२ मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर पाच वर्षांच्या कारकिर्दीत जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात ग्रामीण जनतेचे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न प्रामाणिकपणे केले. या पाच वर्षांत विरोधी पक्षच काय, तर प्रशासनाच्या कार्यालयातील कुठल्याही संघटनेकडून केव्हाही एखाद्या आंदोलनाची नोटीस कोणीही दिली नाही. प्रशासनातील सर्वांना शक्य तेवढे आपापले कार्य वेळच्या वेळी करण्यास प्रवृत्त केले. पहिलीपासून इंग्रजी विषय शिकवण्यास प्रारंभ केला. तसेच दरवर्षी कर्मचाऱ्यांचे दोन-तीन दिवसांचे स्नेहसंमेलन सुरू केले. त्यासाठी जिल्हा परिषद फंडातून निधी देण्याचा निर्णय घेतला. या स्नेहसंमेलनात फक्त कर्मचाऱ्यांनीच भाग घ्यावा, म्हणून प्रवृत्त केले. बाहेरील कोणालाही संधी देऊ नये, अशी अट घातली. या पाच वर्षाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेचे जे निर्णय झाले ते एकमुखी झाले. त्या काळात रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कारभार एकदिलाने चालला, हे इथे अभिमानाने सांगावेसे वाटते. (उर्वरित लेख जाहिरातीच्या खाली)
१९९५-१९९७ या काळात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संघटनेचा अध्यक्ष म्हणूनही मला कार्य करण्याची संधी शरद पवार साहेब यांनी दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील आठ ते दहा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निमंत्रणावरून तेथेही जाऊन कार्य करण्याची संधी लाभली.
महाराष्ट्रात १९६२ पासून पंचायत राज सुरू झाले. तेव्हापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती या संस्थांचा कार्यभार कसा चालतो याचा भरपूर अनुभव असल्याने रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर उत्तम कार्य करून दाखवण्याची संधी मला मिळाली. रत्नागिरी रोटरी क्लब, रिमांड होम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा महिला पतसंस्था, रत्नागिरी जिल्हा ऑटो-रिक्षा चालक-मालक संघटना अशा अनेक संस्थांचा अध्यक्ष व संस्थापक सदस्य म्हणूनही अनेक वर्षे कार्यरत होतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून नऊ वर्षे कार्यरत होतो. दापोलीच्या आर. व्ही. बेलोसे शिक्षण संस्थेचा अध्यक्ष म्हणून चार ते पाच वर्षे कार्यरत होतो. ऑक्टोबर २००४ ते २०१६ पर्यंत केंद्रीय नारळ बोर्डाचा सदस्य व दोन टर्म उपाध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. याशिवाय चव्हाण प्रतिष्टानचा विभागीय अध्यक्ष म्हणून काम करीत असताना खेड, सातारा जिल्ह्यास जोडणारा रघुवीर घाट हा मार्ग बांधकाम खात्याचे मंत्री अधिकारी यांना भेटून सुरू करण्याचे प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्य ग्रंथाच्या शताब्दीचा कार्यक्रम करावा, म्हणून देवरूखचे प्राचार्य सुरेश जोशी यांनी आग्रह केला आणि त्यांच्या विचाराने हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात रत्नागिरीतच झाला. या कार्यक्रमामुळे सर्वत्र आमच्या विभागीय कार्याची स्तुतीही झाली.
बाळशास्त्री जांभेकर ट्रस्टतर्फे दरवर्षी दर्पण वृत्तपत्राचा वाढदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पोंभुर्ले येथे होणाऱ्या त्या कार्यक्रमाच्या वेळी पालखीत बाळशास्त्री जांभेकर यांची मूर्ती त्याचप्रमाणे दर्पण वृत्तपत्राची तसबीर ठेवली जावी, अशी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती केली. त्यानुसार दर्पणचे पहिल्या अंकाचे छायाचित्र घेऊन ती तसबीर बनवून पालखीत ठेवण्याची कामगिरी मी पार पाडलेली आहे.
गोळप, रनपार येथे छाब्रिया यांची फिनोलेक्स इंडस्ट्रीज व जयगड येथे जिंदल कंपनी आणण्यात मोठी कामगिरी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा १९८९-९० साली फोन आला. एका उद्योजकाला तुमच्या मतदारसंघात उद्योग उभारायचा आहे. त्यासाठी त्यांना मदत करावी अशी सूचना पवार साहेबांनी केली होती. त्यानुसार प्रल्हाद छाब्रिया रत्नागिरीत भेटीसाठी आले. मी त्यांच्याविषयीची माहिती घेतली. छाब्रिया साहेब कराचीमध्ये नोकरीला होते. तेथून ते मुंबईत आले आणि त्यांनी नंतर फिनोलेक्स इंडस्ट्रीजची स्थापना केली. बंगळुरू आणि बडोदा येथे त्यांनी फिनोलेक्स कंपनीचे कारखाने उभारले. त्यांना कोकणात उद्योगाची उभारणी करायची होती. त्यासाठी त्यांनी शरदराव पवार यांच्या सूचनेवरून माझ्याशी संपर्क साधला. मी रनपार आणि गोळप परिसरातील माळरानाची जागा त्यांना दाखविली. सुरुवातीला फिनोलेक्सच्या कारखान्याला विरोध झाला. कारखाना उभारला जाऊ नये, यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात आले. पण मी त्या परिसरातील पाच गावांमधील ग्रामस्थांशी चर्चा केली. . सोबत येऊ शकणार असलेल्या ५२ शेतकऱ्यांना घेऊन बडोदा येथील फिनोलेक्सचा कारखाना आणि परिसर यांची पाहणी केली. पाहणी दौऱ्यावरून आल्यानंतर पाच गावांमधील शेतकऱ्यांनी सुमारे ८० एकर जागा फिनोलेक्ससाठी उपलब्ध करून दिली. त्या जागेवर १९९२ साली फिनोलेक्सचा कारखाना सुरू झाला. परिसरातील पाच गावांना मूलभूत सुविधांची व्यवस्था फिनोलेक्स कंपनीने केली. कंपनीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याकरिताही जवळच्याच गावातील एका ग्रामस्थाने आपली जागा योग्य मोबदल्याने देऊ केली. तिचाही उपयोग झाला. परिसरातील अनेक तरुणांना त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला. जयगड परिसरात जिंदाल उद्योग समूहाची उभारणीही अशीच झाली. तेव्हाही शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. ग्रामस्थांनी जागा दिली. तेथे कालांतराने जेएसडब्ल्यू कारखाना सुरू झाला. निःस्वार्थी भावनेने आणि स्थानिकांना रोजगार मिळण्याकरिता उद्योग यावेत, यामुळे कोणाचेही नुकसान होऊ नये, त्यात स्वतःला काही मिळावे, अशी अपेक्षाही न करता प्रयत्न केले. यामुळेच आज या दोन कंपन्यांकडून हजारो स्थानिकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे.
१ जून १९६१ पासून सत्यशोधक साप्ताहिकाचा संपादक म्हणून २०१२ पर्यंत कार्य केले. १ जून १९६१ ते १९७६ पर्यंत पी.टी.आय. संस्थेचा राज्य प्रतिनिधी, इंडियन एक्स्प्रेस व लोकसत्ता या दैनिकांचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य केले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासून मी राष्ट्रवादी कॉग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कार्य केले. या काळात मी अनेक लघु व मोठमोठ्या उद्योजकांनाही चालना देण्याचे काम केले. २०२१-२०२२ पासून मी सामाजिक सेवेतून निवृत्ती घेतली आहे.
(संपर्क – ९४२३०५१९७४)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




