बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ घरात जिल्हा परिषदेची पहिली बैठक

रत्नागिरी : आंबडवे (ता. मंडणगड) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद भेट देणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र आज (६ डिसेंबर) होणारा त्यांचा दौरा रद्द झाला. आंबेडकरांच्या गावाला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रपती ठरले असते. मात्र त्यानिमित्ताने भारत स्वतंत्र झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक सर्वप्रथम आंबेडकरांच्या मूळ घरात झाली होती, अशी आठवण रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी दिली.

श्री. लिमये म्हणाले, अखंड रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन १९८१ साली झाले. त्यानंतर बारा वर्षे जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवट होती. १९९२ मध्ये निवडणूक झाली. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून मी प्रत्येक तालुक्याचा दौरा करायचे ठरविले. मंडणगडपासून सुरुवात केली. त्या महिन्यात मंडणगडला गेलो होतो. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी असलेले त्यांचे घर सध्या बंद आहे, अशी माहिती मला मिळाली. त्यामुळे मी लगेच तेथे गेलो. भारतीय घटनेच्या शिल्पकाराची ती वास्तू पाहून मी नतमस्तक झालो. ही वास्तू आपल्या जिल्ह्यात असल्यामुळे ती जितीजागती राहिली पाहिजे, या उद्देशाने जिल्हा परिषदेची एक मासिक बैठक त्याच ठिकाणी घेण्याचे मी ठरविले. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यासाठी पाहणी करायला सांगितले. जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह सुमारे शंभर जणांच्या बैठकीची व्यवस्था तेथे होण्याची शक्यता नसल्याचा अहवाल अधिकाऱ्यांनी मला दिला. त्यामुळे तात्पुरता तो विचार सोडून दिला.

श्री. लिमये म्हणाले, जिल्हा परिषदेची बैठक होणार नसली तरी त्या स्मारकामध्ये जिल्ह्याचा कोणता तरी कारभार चालविला जावा, अशी माझी इच्छा होती. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होणार नसली तरी स्थायी समितीची बैठक तेथे घ्यावी, असा विचार माझ्या मनात आला. त्यानुसार जुळवाजुळव केली आणि पावसाळ्यानंतर १९९२ मधल्या ऑक्टोबरमध्ये स्थायी समितीची बैठक तेथे घेतली. त्यानिमित्ताने बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा मिळाला आणि विभाजित झालेल्या रत्नागिरी जिल्हा परिषदेने सर्वप्रथम बाबासाहेबांना तेथे अभिवादन केले. त्यावेळचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून तो मान मला मिळाला याचा अभिमान वाटतो.

जिल्हा परिषदेने बाबासाहेबांच्या मूळ गावी विविध उपक्रम राबवावेत आणि जिल्हा परिषदेचे म्हणून तेथे काही काम करावे, बैठका घ्याव्यात आणि बाबासाहेबांच्या साक्षीने कारभार केल्याचा आनंद अनुभवावा, अशी सूचनाही श्री. लिमये यांनी केली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply