रत्नागिरीचे आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उद्योगमंत्री वीस वर्षांहून अधिक काळ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सुरुवातीची दहा वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि काही काळ राज्यमंत्री होते, तर गेली अकरा वर्षे एका स्थित्यंतरासह शिवसेनेचे आमदार आहेत. समयसूचकता, तत्परता, गतिशीलता अशा विविध विशेषणांनी त्यांच्या अत्यंत आदराने उल्लेख केला जातो. मतदारसंघ आणि जिल्ह्यातच काय, पण राज्यभरात त्यांची प्रतिमा अत्यंत उत्तम आहे. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत तर ते सातत्याने प्रकाशात असतात. त्यांच्या कल्पकतेमुळे नवनवीन योजना असावेत असतात. शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी प्रचार त्यांच्याकडून होत असतो. त्यांना चांगली दूरदृष्टीही लाभली आहे. त्यांच्या दोन्ही पक्षांतराच्या वेळी ते स्पष्ट झाले आहे.
अशाच दूरदृष्टीचा प्रत्यय अलीकडेच पुन्हा एकदा आला. मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप त्यांच्यामार्फत करण्यात आले. छत्रीवर त्यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चित्रे आणि पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आहे. अनेक वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिपथात आहेत. पावसाळा संपण्यापूर्वी किंवा त्याच्या आसपास त्या निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली की प्रचारावर बंधने येतात. पण त्याच्या आधीपासूनच उघडपणे प्रचार केला, तर उपयोग होतो, हे लक्षात घेऊन छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. दिवस पावसाचे असल्यामुळे छत्रीचा वापर नक्कीच होणार आणि या छत्रीवरून त्यांच्यासह त्यांचे नेते आणि पक्षाचे चिन्ह दररोज घरोघरी पोहोचणार, त्यानिमित्ताने निवडणुकीचा प्रचार होणार आहे. वास्तविक एखाद्या पक्षाचे नेते किंवा त्या पक्षाचे चिन्ह यांचा प्रचार शाळांमधून करावा का, ते योग्य आहे का, याचाही विचार व्हायला हवा. मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये एखाद्या पक्षाची आणि पक्षाच्या काही नेत्यांची प्रतिमा ठसविण्यापेक्षा देशाबद्दल, राज्याबद्दल, संविधानाबद्दल जागृती करणारी चिन्हे आणि प्रतिमा यांचा प्रचार करणे योग्य ठरले असते. पण त्यातून प्रचाराचे ईप्सित साध्य झाले नसते. त्यामुळे छत्री भरून पक्षाचा, पक्षचिन्हाचा आणि नेत्यांचा प्रचार करण्याची नामी युक्ती योजण्यात आली आहे. मात्र सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू नसल्यामुळे अशा तऱ्हेच्या प्रचाराला प्रतिबंध असण्याची शक्यता नाही. निवडणूक होईपर्यंत वातावरणनिर्मिती आणि निवडणुकीत प्रत्यक्ष प्रचार अशी ही रणनीती आहे.
अशा प्रचारात कल्पकता नक्कीच आहे. पण ज्या मुलांना या छत्र्यांचे वाटप झाले, त्यांना या छत्र्यांपेक्षा शिक्षकांची गरज अधिक आहे. अनेक कारणांमुळे शिक्षकांची संख्या कमी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक पुरेसे ठरत नाहीत. याशिवाय शिक्षकांना शिकविण्याशिवाय अन्य अनेक कामे करावी लागतात. शिक्षक संघटना सातत्याने त्या विरोधात आंदोलने करत असतात. आपल्याला अशैक्षणिक असलेली २३ कामे नाइलाजाने करावी लागतात. ती आपल्यावर लादू नयेत, अशा आशयाचे निवेदन अलीकडेच शिक्षक संघटनांकडून प्रशासनाला देण्यात आले. त्यात त्यांचा स्वार्थ असतोच, पण शिकविण्यासाठी पुरेसा वेळ शिक्षकांना मिळत नाही ही वस्तुस्थितीसुद्धा नाकारता येत नाही. पुढे जाऊन इस्रो आणि नासाला भेट देण्याची संधी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा खूपच चांगला उपक्रम आहे. पण पुरेशा शिक्षकांच्या अभावी त्यांची पहिलीपासूनच शैक्षणिक हेळसांड होत आहे. मुलांना छत्र्या देण्यापेक्षा पुरेसे शिक्षक दिले, तर शिक्षणाचा दर्जा सुधारायला मदत होणार आहे. त्याची गरज आहे. एक मात्र नक्की की शिक्षकांची संख्या पुरेशी करायचे ठरविले, तरी त्यातून प्रचाराची बेगमी मात्र होणार नाही. हीच ती कल्पकता.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १ ऑगस्ट २०२५)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड






