महाराष्ट्र सरकारने लंडनमधील लिलावात जिंकली शूर मराठा सरदार रघूजी भोसले यांची तलवार

मुंबई : नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघूजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार लंडनमध्ये जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. १८ ऑगस्टला ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे.

ही ऐतिहासिक तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त २८ एप्रिल २०२५ रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांना कळले. त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ही तलवार शासनाला मिळावी या दृष्टीने नियोजन करण्यात आले. दूतावासाशी संपर्क साधून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अ‍ॅड. आशिष शेलार यांनी त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत याबाबतचे नियोजन आणि संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे अ‍ॅड. आशिष शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा केला. त्याच्या माध्यमातून या लिलावात शासनाने सहभाग घेतला आणि लिलाव जिंकला.
महाराष्ट्र शासनातर्फे ज्या मध्यस्थाने हा लिलाव जिंकला होता, त्यांना लंडन येथे प्रत्यक्ष भेटून, कायदेशीर बाबी पूर्ण करून अ‍ॅड. आशिष शेलार यांनी ही तलवार ११ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतली. ‘अशा प्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ असून, अनेक पराक्रमांची साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक तलवार आपल्या ताब्यात घेण्याचे भाग्य मला लाभले. तमाम महाराष्ट्राचा हा एक ऐतिहासिक विजय आहे,’ अशी भावना आशिष शेलार यांनी व्यक्त केली. ‘ही तलवार ताब्यात घेतली, तेव्हा लंडनमध्ये तेथील मराठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही जल्लोष करून आनंद साजरा केला,’ असे शेलार यांनी सांगितले. या दौऱ्यात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवीही सहभागी झाले आहेत. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून ही तलवार सोमवारी, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर दाखल होईल. सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बाइक रॅली काढून वाजतगाजत ही तलवार दादरच्या पु. ल. देशपांडे कला अकदमीमध्ये आणण्यात येणार आहे. त्याच दिवशी मान्यवरांच्या उपस्थितीत ‘गड गर्जना’ हा कार्यक्रम होणार आहे. लवकरच ही तलवार महाराष्ट्रातील जनतेला पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारला मिळालेल्या या यशाबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले आहेत. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या नावाने एक इतिहास नोंद होईल, असा हा आनंदाचा क्षण आहे,’ अशी भावना या वेळी अ‍ॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व
रघूजी भोसले प्रथम (१६९५ ते १४ फेब्रुवारी १७५५) हे नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. रघूजी भोसले यांचे शौर्य आणि युद्धनीती यांवर प्रसन्न होऊन छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही पदवी दिली होती. रघूजी भोसले प्रथम यांनी १७४५ आणि १७५५ मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला. याचबरोबर रघूजींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांदा, छत्तीसगड, संबळपूर याही प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचाही पराभव करून दक्षिण भारतात आपला लष्करी आणि राजकीय दबदबा रघूजींनी निर्माण केला. अठराव्या शतकातील एक अत्यंत धाडसी मराठा सेनानी म्हणून रघूजी भोसलेंकडे बघितले जाते. नागपूर भोसलेंच्या भौगोलिक सीमांमध्ये लोखंड, तांबे या खनिजांच्या खाणी मुबलक प्रमाणात होत्या. यांचा वापर वस्तूंसोबतच शस्त्रे बनवण्यासाठीही केला जात असे. नागपूरकर भोसले घराण्यातील राजशस्त्रे म्हणजे निर्मिती आणि सौंदर्य यांचा अजोड मिलाफ आहेत.

लंडनमध्ये लिलावात निघालेली रघूजी भोसले यांची तलवार ही मराठा शैलीच्या ‘फिरंग’ पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही तलवारीची वैशिष्ट्ये आहेत. तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून, पात्याच्या खजान्याजवळ पाते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे. युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातील उच्च वर्गांमध्ये प्रसिद्ध होती. पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग’ हा देवनागरी लेख सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे. ही तलवार रघूजी भोसले यांच्यासाठी बनवली गेली होती किंवा त्यांच्या वापरातील होती याकडे पात्यावरील लेख निर्देश करतो. तलवारीच्या मुल्हेरी मुठीवर सोन्याच्या पाण्याने कोफ्तगरी नक्षी काढलेली आहे. तलवारीच्या उभट मुसुमेला हिरव्या रंगाचे कापड गुंडाळलेले आहे.

रघूजी भोसले प्रथम यांची ही फिरंग तलवार अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण आहे. कमी अथवा अजिबात नसलेले नक्षीकाम आणि शस्त्रांवरील निर्माणकर्त्याच्या किंवा वापरकर्त्याच्या नावाचा अभाव ही बहुतांश मध्ययुगीन मराठा शस्त्रांची ठळक वैशिष्ट्ये होती. या दोन्हींसही ही तलवार अपवाद असून, रघूजी भोसले यांच्या तलवारीवर नावाचा लेख, तसेच नक्षीकाम केलेले आहे. तलवारीचे युरोपीय बनावटीचे पाते अठराव्या शतकातील भारतातील आंतरराष्ट्रीय शस्त्रव्यापाराकडे निर्देश करते.

नागपूरकर भोसलेंची १८१७मध्ये सीताबर्डी येथे इस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढाई झाली. या लढाईमध्ये इस्ट इंडिया कंपनीचा विजय झाल्यावर कंपनीने नागपूरकर भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली. यामध्ये अनेक मौल्यवान वस्तू, दागिने, तसेच शस्त्रांचाही समावेश होता. नागपूरचे संस्थान खालसा झाल्यावर इस्ट इंडिया कंपनीला वेळोवेळी नजराणे आणि भेटीही मिळाल्या होत्या. रघूजी भोसलेंची तलवार युद्धानंतरच्या लुटीमध्ये अथवा ब्रिटिशांना दिलेल्या भेटींमध्ये देशाबाहेर गेली असण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply