रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंडमधील नवींद्रनगरमध्ये राहणाऱ्या सुप्रिया श्रीपाद कुंटे यांचे १० सप्टेंबरला निधन झाले. त्या ऐंशी वर्षांच्या होत्या. त्यांचे देहदान करण्याचा निर्णय त्यांचे पुत्र सुबोध कुंटे यांनी घेतला. त्यानंतर आज सकाळी (११ सप्टेंबर) रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
सुप्रिया श्रीपाद कुंटे यांचे रत्नागिरीतील परकार हॉस्पिटलमध्ये १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास निधन झाले. आपल्या आईच्या देहाचा उपयोग वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावा. त्यातून चांगले डॉक्टर तयार होतील आणि ही समाजाची सेवा होईल, या सद्भावनेने कै. सुप्रिया यांचे पुत्र सुबोध कुंटे यांनी आईचे देहदान करण्याचा निर्णय घेतला. शासकीय वैद्यकीय महविद्यालयात आज त्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हे ११वे देहदान ठरले. सागर भिंगारे, रोहित पवार, अमित पाटील, ओमकार खेऊर यांनी सुबोध कुंटे यांना या प्रक्रियेत मोलाची साथ दिली. या प्रक्रियेमध्ये रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव, तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील कर्मचारी पूर्वा तोडणकर, मिथिलेश मुरकर, मिहिर लोंढे, वाहनचालक विनोद मोहिते, सौरभ जाधव, वृंदारक पेजे यांनी काम पाहिले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

