सत्त्वश्री प्रकाशनाच्या `बीज अंकुरे अंकुरे`ला कोमसापचा पुरस्कार

रत्नागिरी : येथील कोकण मीडिया कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या “बीज अंकुरे अंकुरे” या सुरेश ठाकूर संपादित पुस्तकाला कोकण मराठी साहित्य परिषदेचा वाङ्मयीन पुरस्कार जाहीर झाला आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे वार्षिक वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पुरस्कारांसाठी आलेल्या प्रस्तावांची मान्यवर आणि जाणकार परीक्षकाकडून छाननी केली जाते. त्यानंतर पुरस्कार जाहीर केले जातात. त्यानुसार २०२३ – २४ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

या पुरस्कारांचा तपशील असा – कादंबरी विभाग – र. वा. दिघे स्मृती पुरस्कार – उदय जोशी (अर्धकौरव), वि. वा. हडप स्मृती पुरस्कार – बाळासाहेब लबडे (चिंबोरे युद्ध), कथा विभाग – वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार – शशिकांत काळे (कालयंत्र), विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार – वीणा रारावीकर (गुजगोष्टी गत शब्दांच्या), कविता विभाग – आरती प्रभू स्मृती पुरस्कार – गीतेश शिंदे (सीसीटीव्हीच्या गर्द छायेत), तर वसंत सावंत स्मृती पुरस्कार – मानसी चाफेकर (हळुवार मनाची आई), आत्मचरित्र विभाग – धनंजय कीर स्मृति पुरस्कार – अरुण घाडीगावकर (भक्तिपंथेची जावे), चरित्र विभाग – श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार – डॉ. राजू शनवार (पोश्यांपार), समीक्षा विभाग – प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार – रोहिदास पोटे (गझल गंधाक्षरी), नाटक विभाग – भाई भगत पुरस्कार – प्रकाश चांदे (तराने अफसाने), ललित गद्य विभाग – अनंत काणेकर स्मृती पुरस्कार – वैशाली पंडित (मंत्रभूल), सौ. लक्ष्मीबाई व माजी न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे पुरस्कार – डॉ. अजित मगदूम (न घेतलेला रस्ता), बालवाङ्मय विभाग – प्र. श्री. नेरूरकर स्मृती पुरस्कार – सदानंद पुंडपाळ (हिरवी राने, गाती गाणे), संकीर्ण विभाग – वि. कृ. नेरूरकर स्मृती पुरस्कार – रिचर्ड नुनीस (वाडवळी शब्दकोश आणि व्युत्पत्ती शोध), अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार – जे. डी. पराडकर (अक्षरयात्रा), वैचारिक विभाग – फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार – ना. वा. रणशिंग (आदिवासी ते पांढरपेशी), नाटक – एकांकिका विभाग – रमेश कीर पुरस्कार – डॉ. सुभाष कटकधोंड (जगायचंय मला).

कोकण मराठी साहित्य परिषदेचे संपादन, कथासंग्रह, कादंबरी विभागातील विशेष पुरस्कार अनुक्रमे बीज अंकुरे अंकुरे (सुरेश ठाकूर), पटावरच्या सोंगट्या (विलास गावडे), वाळूचे किल्ले (अविनाश कोल्हे).

यासोबतच वाङ्मयेतर पुरस्कारांमध्ये कविता राजधानी पुरस्कार मालवणचे कोकणी कवी रुजारिओ पिंटो, कोकण साहित्यभूषण डहाणूचे प्रवीण नारायण दवणे, पालघर व ठाणे जिल्ह्यात साहित्य, पर्यावरण, शिक्षण, आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार माजी शिक्षणाधिकारी, साहित्यिक डॉ. जिवबा केळुस्कर यांना तर संपूर्ण कोकणात साहित्य, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात योगदान करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा श्री. बा. कारखानीस पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, डॉ. तानाजीराव चोरगे यांना, गुरुवर्य अ. आ. देसाई कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार मुंबईच्या बोरिवली शाखेचे जगदीश भोवड यांना, राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार ठाण्याच्या नितल वढावकर, ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार रत्नागिरीच्या उज्ज्वला प्रभाकर बापट यांना, वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार पालघर जिल्ह्यातील पालघर शाखेस, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना दिला जाणारा सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार लांज्याच्या तनुजा संतोष प्रभुदेसाई यांना, उमेदीच्या गुणवंत कवीस देण्यात येणारा कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार मालगुंडचे अरुण तुकाराम मोर्ये यांना, युवा विभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देण्यात येणारा कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार ठाण्याच्या दीपा ठाणेकर यांना जाहीर झाला आहे.

पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, केंद्रीय कार्यवाह दीपा ठाणेकर, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषद परिवारातर्फे पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.

पुरस्कारांचे वितरण ८ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरी येथील कवितेची राजधानी मालगुंड येथे सन्मानपूर्वक होणार आहे.

अठरा लेखकांचा सहभाग
पुरस्कार मिळालेल्या बीज अंकुरे अंकुरे पुस्तकात कोमसाप मालवणच्या रश्मी रामचंद्र आंगणे, वर्षाराणी बलवंत अभ्यंकर, पूर्वा मनोज खाडिलकर, तेजल गुरुनाथ ताम्हणकर, ऋतुजा राजेंद्र केळकर, आदिती धोंडी मसूरकर, शिवराज विठ्ठल सावंत, मधुरा महेश माणगावकर, रसिका राजेंद्र तेंडोलकर, दिव्या दीपक परब, वंदना नारायण राणे, देवयानी त्रिंबक आजगावकर, विठ्ठल लक्ष्मण लाकम, वैजयंती विद्याधर करंदीकर, नारायण यशवंत धुरी, सदानंद मनोहर कांबळी, अशोक कांबळी, गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर या १८ लेखकांनी आपले १४६ ललित लेख साकारले आहेत. पुस्तकाला ज्येष्ठ लेखक रवींद्र वराडकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेली असून प्रस्तावनेत पुस्तकाचा गौरव करताना ते म्हणतात, “१८ लेखकांच्या प्रतिभेचे नवोन्मेष साकारलेले हे १४६ ललित लेखांचे महाराष्ट्रातले पहिले पुस्तक आहे.” सदर पुस्तकाला आशीर्वाद देताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक म्हणतात, “सुरेश ठाकूर यांनी संपादित केलेला हा ग्रंथ म्हणजे केवळ कोकणातच नव्हे तर महाराष्ट्राला अनुकरणीय ठरावा असाच आहे. मालवण कोमसाप शाखेच्या या उपक्रमाचे मी मनापासून कौतुक करतो.”

या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुरेश ठाकूर म्हणाले, “गेली सहा वर्षे अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी सिंधुसाहित्यसरिता (चरित्र ग्रंथ), बीज अंकुरे अंकुरे (ललित लेख संग्रह), ये ग ये ग सरी (कवितासंग्रह) या तीन पुस्तकांच्या माध्यमातून कोमसापच्या जवळजवळ १०० लेखकांना मी लिहिते केले. यातच मला आनंद आहे. आज बीज अंकुरे अंकुरेचे जे कौतुक झाले, ते माझे स्वतःचे नसून कोमसाप मालवणच्या लेखक सदस्यांचे आहे. मी मात्र संपादक म्हणून निमित्त मात्र आहे.

पुरस्कार जाहीर झाल्यामुळे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या सर्व सदस्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.

“बीज अंकुरे अंकुरे” या पुस्तकाचे प्रकाशन करताना रुजारिओ पिंटो. डावीकडून रामचंद्र आंगणे, श्रुती गोगटे, सुरेश ठाकूर, लक्ष्मीकांत, विनायक करंदीकर, रविंद्र वराडकर, अशोक कांबळी, अनिकेत कोनकर, गुरुनाथ ताम्हणकर


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply