‘वस्त्रहरण’कार कालवश! गंगाराम गवाणकर यांचे निधन

मुंबई : ज्यांच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकामुळे मालवणी भाषा जगभर प्रसिद्धीचे भरजरी वस्त्र ल्याली, ते ख्यातनाम नाटककार गंगाराम गवाणकर यांचे २७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. मुंबईतल्या दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर गेले १५ दिवस उपचार सुरू होते; मात्र काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज (२८ ऑक्टोबर) बोरिवलीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गवाणकर यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील माडबन हे गवाणकर यांचे मूळ गाव. ‘वस्त्रहरण’ या मालवणी बोलीत त्यांनी लिहिलेल्या नाटकाने अनेक विक्रम केले. गवाणकर या नाटकासाठी ओळखले जात असले, तरी त्यांनी आणखीही अनेक नाटके लिहिली होती. वात्रट मेले, वन रूम किचन, दोघी, वर भेटू नका, मेलो डोळा मारून गेलो अशी वीसहून अधिक नाटके त्यांच्या लेखणीतून उतरली. ‘व्हाया वस्त्रहरण’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तकही गाजले. त्यांना ‘मानाचि संघटने’कडून लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कारदेखील मिळाला होता.
‘वस्त्रहरण’ नाटकाचे जगभरात हजारो प्रयोग झाले. या नाटकाने मालवणी बोलीचा डंका जगभर पिटला गेला आणि मच्छिंद्र कांबळींसारखा एक सशक्त अभिनेताही रंगभूमीला मिळाला. आज बोलीभाषांच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त करणारे सूर निघत असताना, बोलीभाषेत बोलणे हे कमीपणाचे नव्हे, तर अभिमानाचे आहे, असा विश्वास ‘वस्त्रहरण’ने दिला. हे नाटक मालवणी बोलीची वैशिष्ट्ये आणि स्थानिक संस्कृती यांचे दर्शन घडवते.
‘वस्त्रहरणाच्या रूपाने तुम्ही मराठी रंगभूमीला देशी फार्सचे भरजरी वस्त्र निर्माण केले आहे. याला म्हणायचे १०० टक्के देशी फार्स. मालवणच्या सिंधुदुर्गाइतकेच तुमच्या मालवणी फार्साला दीर्घायुष्य लाभो आणि लक्षावधी लोकांना खळखळून हसायला लावण्यचे पुण्य तुमच्या पदरात पडत राहो, ही शुभेच्छा,’ अशा शब्दांत पु. ल. देशपांडे यांनी या ‘वस्त्रहरण’ नाटकाचा गौरव केला होता.
मालवणी मुलखातला प्रतिभावंत कलावंत हरपला, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गवाणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply