रत्नागिरीत पावसाचे थैमान; १२२ मिलिमीटर पाऊस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस पाऊस सुरू असून, काल (२९ ऑक्टोबर २०२५) रात्री पावसाने अक्षरशः थैमान घातलं. सलग तीन-चार तास प्रचंड पाऊस कोसळत होता. हवामान विभागाने दिलेल्या आज सकाळपर्यंतच्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार, रत्नागिरीत तब्बल १२२ मिलिमीटर, तर दापोली तालुक्यातल्या हर्णै इथे ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ‘महारेन’च्या आकडेवारीनुसार, गुहागरमध्ये ६३, संगमेश्वरमध्ये ४५ मिलिमीटर पाऊस पडला. अन्य तालुक्यांमध्येही किमान २५ मिलिमीटर ते कमाल ४० मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी कापण्यायोग्य भातपीक आडवं होऊन त्याला कोंब येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नाचणीचंही नुकसान झालं आहे. काही ठिकाणी कापणी करताच आलेली नाही, तर काही ठिकाणी कापून ठेवलेलं भात भिजल्यामुळे नुकसान झालं आहे. पावसामुळे सर्वत्र ओल असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कापून ठेवलेलं भात सुरक्षित ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाऊस थांबलाच नाही तर झोडणी करणार कशी, असा प्रश्न आहे. काही शेतकरी झोडणीसाठी यंत्राचा वापर करत आहेत; मात्र अशा शेतकऱ्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. कारण मुळात शेतकरी अल्पभूधारक असल्याने यांत्रिकीकरण आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. शिवाय, पावसामुळे वीजपुरवठाही सातत्याने खंडित होत असल्यामुळे यंत्राच्या वापरालाही मर्यादा आहेत. एरव्ही या हंगामात भातकापणी पूर्ण होऊन भाजीपाला पीक, वायंगणी भातशेती किंवा कुळीथ यांसारख्या पिकांच्या पेरणीची तयारी सुरू होत असते. यंदा मात्र लांबलेल्या पावसामुळे हे सगळंच नियोजन कोलमडलं आहे. शिवाय, यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने उन्हाळी कामांचंही नियोजन कोलमडलं होतं. कोकणी मेव्याच्या उत्पादनावर आणि साठवणुकीच्या पदार्थांच्या निर्मितीवर मोठा परिणाम झाला होता.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply