सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रमाचा प्रारंभ; ‘सुनीताबाई-पु. ल. सेवाव्रती’ पुरस्कार चिपळूणच्या सांजसोबत संस्थेला जाहीर

रत्नागिरी : सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विशेष उपक्रमाला आज (सात नोव्हेंबर) सुरुवात झाली. पु. ल. देशपांडे यांची जयंती (८ नोव्हेंबर) आणि सुनीताबाईंचा स्मृतिदिन (७ नोव्हेंबर) याचं औचित्य साधून आजपासून नऊ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत आर्ट सर्कलने हा कार्यक्रम आयोजित केला असून, राज्य मराठी विकास संस्थेच्या अर्थसाह्याने हा कार्यक्रम होत आहे. सुनीताबाई ज्या पटवर्धन हायस्कूलमध्ये शिकल्या, त्या शाळेत आज अभिवाचन स्पर्धेचं उद्घाटन झालं. स्पर्धेनंतर अभिनेत्री शुभांगी दामले यांनी ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकातल्या काही भागाचं अभिवाचन केलं. ‘आहे मनोहर तरी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ साकारणारे चित्रकार बाळ ठाकूर यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास तीनशे पुस्तकांच्या मुखपृष्ठांची चित्रं आपल्या कुंचल्यातून साकारली. त्या सर्व पुस्तकांचं आणि रेखाचित्रांचं प्रदर्शन या निमित्ताने आयोजित करण्यात आलं आहे. त्याचंही उद्घाटन आज झालं.

अभिवाचन करताना शुभांगी दामले

सुनीताबाई आणि पु. ल. देशपांडे यांच्या दातृत्वामुळे अनेक सामाजिक संस्था उभ्या राहिल्या आणि वाढल्या. त्यांच्या दातृत्वाला सलाम करण्यासाठी ‘सुनीताबाई-पु. ल. सेवाव्रती’ पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली. चिपळूणमधल्या सांजसोबत या संस्थेला हा पुरस्कार जाहीर झाला असून, रविवारी मुख्य कार्यक्रमात पुरस्काराचं वितरण होणार आहे. २५ हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. समाजमाध्यमावरून वेगवेगळ्या विचारसरणीच्या व्यक्तींनी एकत्र येऊन ही संघटना सुरू झाली. कोकणातल्या आडगावातल्या वृद्ध, निराधारांना मूलभूत गरजांसाठी ही संस्था मदतीचा हात देते. आजवर सांजसोबत संस्थेने ८० वृद्धांना दत्तक घेतलं आहे. सध्या संस्थेचे २५० सभासद दर महिन्याला अगदी १०० रुपयांपासून जमेल तेवढी रक्कम जमा करतात. त्यातून आवश्यक किराणा सामान गरजू वृद्धांना घरपोच केलं जातं. पूरग्रस्त मराठवाड्यातही संस्थेने मदत केली आहे.

पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply