आपण प्रकाशित केलेल्या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार आपल्याच हस्ते प्रदान करण्याचा अपूर्व योग जुळून आला आणि एक वेगळाच आनंद मिळाला.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विविध पुरस्कारांचे वितरण कवी केशवसुत यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारकात ७ नोव्हेंबरला पार पडले. या समारंभाला मी एक प्रेक्षक म्हणून उपस्थित होतो. अलीकडेच परिचय झालेले श्रीरंग नारायण रानबरे यांनी आपल्या वडिलांच्या कविता आणि गीतांचे संकलन केले आहे. नारायणप्रभा नावाच्या या पुस्तकाचे प्रकाशन त्या दिवशी झाले. पुस्तकाच्या निर्मितीसाठी त्यांना मी अत्यल्प मदत केली होती. त्याची जाण ठेवून त्यांनी मला समारंभाला उपस्थित राहण्याचा आग्रह केला, इतकेच नव्हे तर जाण्याची आणि येण्याची व्यवस्था ही त्यांनी स्वतःच केली. त्यानिमित्ताने मी तेथे उपस्थित होतो.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या झपूर्झा या त्रेमासिकाच्या निर्मितीसाठी मी गेले काही महिने करत आहे. यावर्षीच्या दिवाळी अंकाचे कामही मी केले होते. त्या अंकाचे प्रकाशन या समारंभात झाले. अंकाच्या निर्मितीसाठी मी केलेल्या मदतीमुळे माझा परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आणि मला व्यासपीठावरच थांबण्याची सूचना करण्यात आली.
समारंभ पुढे सरकत होता. मान्यवरांचे विचार प्रकटीकरण झाल्यानंतर पुरस्कारांची वितरण सुरू झाले. या पुरस्कारांमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांना ‘बीज अंकुरे अंकुरे’ या पुस्तकाच्या संपादनासाठी दिलेल्या पुरस्काराचा समावेश होता. पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी ते स्वतः उपस्थित राहू शकले नव्हते, पण मालवण येथील प्रसिद्ध कवी आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य रुजारिओ पिंटो यांना तो पुरस्कार माझ्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा सूत्रसंचालक माधव अंकलगे यांनी केली आणि तो अपूर्व योग जुळून आला. याचे कारण ‘बीज अंकुरे अंकुरे’ या पुस्तकाचे प्रकाशन आमच्या कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनातर्फे मी केले आहे. आपणच प्रकाशित केलेल्या पुस्तकाला लाभलेल्या पुरस्काराचे वितरण आपल्या हस्ते झाले. आपणच आपले कौतुक करण्याचाच हा अपूर्व योग होता. आणखी एक विशेष म्हणजे सत्त्वश्री प्रकाशनाच्या पुस्तकाला प्रथमच कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.

बाकी पुरस्कार वितरण. सोहळा उत्साहात पार पडला. परिषदेचे विश्वस्त आमदार संजय केळकर समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोकणात शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण होत आहे. परिणामी त्यांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणात साहित्य चळवळ प्रवाही बनली आहे. ही चळवळ दृढ होण्यामागे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची मोलाची भूमिका असून, त्यांनी स्थापन केलेल्या या परिषदेने या साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याने परिषदेचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. ते पुढे म्हणाले की, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेसारखी संस्था उभारून माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना साहित्य क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. साहित्याचा विचार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी संस्थेच्या माध्यमातून रुजवला. परिणामी हाच साहित्यिक विचार सर्वदूर पसरला. एवढेच नव्हे तर साहित्यिकांना त्यांच्या साहित्यकृतीसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार दिले जात आहेत, ही या साहित्यिकांच्या पाठीवर दिलेली थाप त्यांना कायमस्वरूपी प्रेरणादायी ठरणार आहे. कवी केशवसुत स्मारक अजूनही अत्याधुनिक स्वरूपामध्ये व्हावे यासाठी व्यवस्थापनाने आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव शासन दरबारी सादर करावा. त्यासाठी राज्य शासनाकडे योग्य प्रयत्न करून कवी केशवसुतांचे स्मारक हे जागतिक दर्जाचे होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही श्री. केळकर यांनी दिली.
केशवसुत स्मारक समितीचे प्रमुख गजानन पाटील यांनी प्रास्ताविकात वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्याचे महत्त्व सांगून कविता राजधानी हा पुरस्कार कवितेच्या राजधानीत म्हणजे मालगुंड येथेच झाला पाहिजे, अशी विनंती मधुभाईंनी स्मारक उभारल्याच्या नंतरची वाटचाल, साहित्यिक पुरस्काराची वाटचाल त्यांनी विशद केली.
केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ म्हणाले, महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून मराठी भाषेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्य संमेलन मॉरिशसमध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने साजरे झाले, याचा साहित्यिक म्हणून, सभासद म्हणून मला अभिमान आहे. भविष्यातही अनेक देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्य संमेलन घेण्याचे प्रस्ताव कोकण मराठी साहित्य परिषदेकडे आले असून, त्यावर लवकरच सकारात्मक विचार करून, त्या – त्या ठिकाणी अशी साहित्य संमेलने भरविण्याचा मनोदय व्यक्त केला.
केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर म्हणाल्या, कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाढते कार्य पाहून अनेक साहित्यिक, लेखक, कवी कोकण परिषदेच्या माध्यमातून पुढे येत आहेत. अध्यक्ष या नात्याने ही बाब संस्मरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.
विश्वस्त प्रा. एल. बी. पाटील यांनीही यावेळी आपले विचार मांडले. कोकण मराठी साहित्य परिषदेमध्ये कोणत्याही अपेक्षेशिवाय काम केल्यास आपल्याला हवे ते मिळत असते. साहित्य क्षेत्रातही प्रामाणिकपणे लेखन केल्यानंतर योग्य वेळी विविध संस्था, शासकीय स्तरावर, निमशासकीय स्तरावर त्याची दखल घेतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा पुरस्कार वितरण सोहळा असल्याचे मत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर यांनीही भविष्यात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उपक्रमासाठी सकारात्मक सहकार्य करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी झपूर्झा दिवाळी अंक, श्रीरंग रानबरे यांचा ‘नारायणप्रभा’ संग्रह, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीचे दक्षिण कोकण प्रमुख अरुण तुकाराम मोर्ये यांचा ‘अस्वस्थ मनाच्या कविता’ हा कवितासंग्रह आणि पालघर शाखेचे सभासद रमेश पाटील यांच्या ‘तोडू अंधाराचे जाळे’ या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या वार्षिक पुरस्कार वितरित करण्यात आले. या पुरस्कारांचा तपशील असा – कादंबरी विभाग – र. वा. दिघे स्मृती पुरस्कार – उदय जोशी (अर्धकौरव), वि. वा. हडप स्मृती पुरस्कार – बाळासाहेब लबडे (चिंबोरे युद्ध), कथा विभाग – वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार – शशिकांत काळे (कालयंत्र), विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार – वीणा रारावीकर (गुजगोष्टी गत शब्दांच्या), कविता विभाग – आरती प्रभू स्मृती पुरस्कार – गीतेश शिंदे (सीसीटीव्हीच्या गर्द छायेत), तर वसंत सावंत स्मृती पुरस्कार – मानसी चाफेकर (हळुवार मनाची आई), आत्मचरित्र विभाग – धनंजय कीर स्मृति पुरस्कार – अरुण घाडीगावकर (भक्तिपंथेची जावे), चरित्र विभाग – श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार – डॉ. राजू शनवार (पोश्यांपार), समीक्षा विभाग – प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार – रोहिदास पोटे (गझल गंधाक्षरी), नाटक विभाग – भाई भगत पुरस्कार – प्रकाश चांदे (तराने अफसाने), ललित गद्य विभाग – अनंत काणेकर स्मृती पुरस्कार – वैशाली पंडित (मंत्रभूल), सौ. लक्ष्मीबाई व माजी न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे पुरस्कार – डॉ. अजित मगदूम (न घेतलेला रस्ता), बालवाङ्मय विभाग – प्र. श्री. नेरूरकर स्मृती पुरस्कार – सदानंद पुंडपाळ (हिरवी राने, गाती गाणे), संकीर्ण विभाग – वि. कृ. नेरूरकर स्मृती पुरस्कार – रिचर्ड नुनीस (वाडवळी शब्दकोश आणि व्युत्पत्ती शोध), अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार – जे. डी. पराडकर (अक्षरयात्रा), वैचारिक विभाग – फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार – ना. वा. रणशिंग (आदिवासी ते पांढरपेशी), नाटक – एकांकिका विभाग – रमेश कीर पुरस्कार – डॉ. सुभाष कटकधोंड (जगायचंय मला). संपादन, कथासंग्रह, कादंबरी विभागातील विशेष पुरस्कार अनुक्रमे बीज अंकुरे अंकुरे (सुरेश ठाकूर), पटावरच्या सोंगट्या (विलास गावडे), वाळूचे किल्ले (अविनाश कोल्हे), कविता राजधानी पुरस्कार मालवणचे कोकणी कवी रुजारिओ पिंटो, कोकण साहित्यभूषण डहाणूचे प्रवीण नारायण दवणे, वाङ्मयेतर पुरस्कारांमध्ये पालघर व ठाणे जिल्ह्यात साहित्य, पर्यावरण, शिक्षण, आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार माजी शिक्षणाधिकारी, साहित्यिक डॉ. जिवबा केळुस्कर यांना तर संपूर्ण कोकणात साहित्य, पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात योगदान करणाऱ्या व्यक्तीला देण्यात येणारा श्री. बा. कारखानीस पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, डॉ. तानाजीराव चोरगे यांना, गुरुवर्य अ. आ. देसाई कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार मुंबईच्या बोरिवली शाखेचे जगदीश भोवड यांना, राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार ठाण्याच्या नितल वढावकर, ग्रामीण भागातील स्त्री लेखिकेसाठीचा सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार रत्नागिरीच्या उज्ज्वला प्रभाकर बापट यांना, वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार पालघर जिल्ह्यातील पालघर शाखेस, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना दिला जाणारा सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार लांज्याच्या तनुजा संतोष प्रभुदेसाई यांना, उमेदीच्या गुणवंत कवीस देण्यात येणारा कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार मालगुंडचे अरुण तुकाराम मोर्ये यांना, युवा विभागात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देण्यात येणारा कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार ठाण्याच्या दीपा ठाणेकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गीत, कार्यक्रमाच्या सांगतेला पसायदान गायन करण्यात आले. शेवटी सामूहिक वंदे मातरम म्हणण्यात आले. कार्यक्रमाला मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर, सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रतिनिधी, विविध समित्यांचे समिती प्रमुख, साहित्यप्रेमी, साहित्यिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
- प्रमोद कोनकर (९४२२३८२६२१)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

