
रत्नागिरीजवळच्या कर्ला गावातील स्वाती अरविंद सोनार यांनी इमिटेशन ज्वेलरीचा उद्योग सुरू केला. हृदयविकाराचा त्रास सुरू झाला, तरी त्यावर मात करून त्यांनी जिद्दीने व्यवसाय सुरू ठेवून आदर्श निर्माण केला आहे.
पुण्यातील ग्रामोन्नती.नेट या संस्थेद्वारे रत्नागिरीत दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी बचत गटांमधील महिलांसाठी उत्सव उद्योजकतेचा, सन्मान उद्योजिकांचा, लघुउद्योगांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सन्मान करण्यात आलेल्या या उद्योजिकेविषयी…
स्त्रीमनाच्या अगदी हृदयाजवळ असलेली विशेष आवडती व भावणारी वस्तू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने!आता सोन्याचे दागिने सर्वांना परवडणारे राहिलेले नाहीत. त्यामुळे हल्ली बाजारात दाखल झालेल्या तऱ्हेतऱ्हेच्या इमिटेशन ज्वेलरीची खूप चलती आहे. ज्वेलरीची हीच मागणी पाहून रत्नागिरीजवळच्या कर्ला गावातील लिमयेवाडीत राहणाऱ्या स्वाती अरविंद सोनार यांनी या इमिटेशन ज्वेलरीचा उद्योग सुरू केला. स्वातीताईंना पूर्वीपासून दागिने बनवण्याची खूप आवड होती. त्यांच्या मैत्रिणींना त्या दागिने बनवून द्यायच्या. मैत्रिणींचे दागिने पाहून त्यांच्या ओळखीचे किंवा नातेवाईक वगैरेही तसे दागिने स्वातीताईंकडून बनवून घ्यायचे. असं खूप दिवस छोट्या प्रमाणावर चालू होतं, पण त्यांच्या आयुष्यात थोडी आर्थिक अडचण निर्माण झाल्यावर, त्यांनी त्यांच्या छंदाला व्यवसायाचं स्वरूप द्यायचं ठरवलं. (उर्वरित मजकूर जाहिरातीच्या खाली)
या व्यवसायासाठी लागणारं साहित्य त्यांनी त्यांच्या बचतगटातून कर्ज घेऊन खरेदी केलं आणि वस्तू तयार करायला प्रारंभ केला. अर्थात हे साहित्य कुठून घ्यायचं, विक्री कशी आणि कुठे करायची हे प्रश्न त्यांना पडले होते.
पण उमेदतर्फे झालेल्या सरस एक्झिबिशनमध्ये गोव्याला जाऊन त्यांनी भाग घेतला आणि तिथे त्यांच्या ज्वेलरीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे त्यांचा या व्यवसायाबाबत त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत झाली. साहित्यासाठी त्यांनी मुंबईतल्या दुकानांचाही शोध घेतला.
व्यवसाय चांगला चालणार हे लक्षात येताच त्यांनी ग्रामसंघातून कर्ज घेऊन जास्त माल तयार केला आणि त्या सरस प्रदर्शनात सहभागी झाल्या. तिथले ग्राहक त्या जोडू लागल्या.
सरस प्रदर्शन राज्यातील ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून आयोजित करण्यात येतं.
व्यवसाय जसजसा वाढीला लागला, तसं स्वातीताईंनी ग्रामसंघातलं कर्ज फेडून टाकलं. त्या सरस प्रदर्शनाबरोबरच इतर खासगी प्रदर्शनांमध्येही भाग घेत होत्या. पण अचानक काही कारणांनी त्यांना बचत गट सोडावा लागला आणि त्याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर झाला. त्यांचा व्यवसाय कमी झाला. विक्रीसाठी सरसच्या माध्यमातून जे हक्काचं व्यासपीठ मिळत होतं, ते मिळेनासं झालं. मग त्यांनी न थांबता दुसऱ्या तेराजणी जमवून स्वतः बचगट स्थापन केला आणि त्या नव्या उमेदीने कामाला लागल्या. आता त्या नवीन सरस प्रदर्शनाची वाट पाहू लागल्या अन् नागपूरचं प्रदर्शन करून आल्याही. मग त्यांना वेध लागलेले पुढच्या प्रदर्शनाचे. त्यासाठी त्या मोठ्या प्रमाणावर वस्तू तयार करण्याच्या कामालाही लागल्या. पण त्यांना हार्ट अॅटॅक आला आणि मग हार्टचं ऑपरेशन करावं लागलं. चार स्टेन टाकल्या गेल्या.
थोडे दिवस सगळंच थांबलं. नव्याने उभं राहणं थोडं भीतिदायक होतं. तरीही त्या यत्किंचितही न घाबरता जिद्दीने पुन्हा उभ्या राहून ऑनलाइन विक्रीचं तंत्र शिकल्या आणि माल विकू लागल्या. सध्या त्या मिशोवर विक्री कशी करायची यासंदर्भात माहिती मिळवत आहेत.
संकटाला न डगमगता सामोरं जाणं म्हणजे काय आणि त्या संकटावर मात करून नव्या उमेदीने पुन्हा व्यवसाय सुरू करून नवनवीन मार्केटिंग तंत्र अवलंबून आपला व्यवसाय कसा सुरू ठेवायचा अन् वाढवायचा, हे स्वातीताईंकडून शिकलंच पाहिजे.
या व्यवसायात त्यांना त्यांच्या पतीचा सुरुवातीपासून पाठिंबा होता. आता त्यांची मुलगीही त्यांना मदत करते. वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये ती त्यांच्यासोबत असते. शिवाय एक मदतनीसही आहे.
स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतः काहीतरी व्यवसाय करणं यामुळे आपल्यातला आत्मविश्वास वाढतो. स्वतःच्या पायावर उभं असणं म्हणजे काय हे नेमकं कळतं आणि जीवनात आमूलाग्र बदल होतो, असं त्या म्हणतात.
व्यवसायाबरोबरच त्यांनी काही वर्षे कर्ले येथील सहयोग ग्रंथालयाच्या कार्यकारिणीवरही काम केलं. गावातील लिमयेवाडी भगिनी मंडळामध्येही त्या कार्यरत आहेत. हनुमान जयंतीच्या वेळी त्यांनी नाटकातही अभिनय केला आहे.
स्वाती अरविंद सोनार – ८६०५४२७४२४
(शब्दांकन : सौ. राधिका सचिन आठल्ये)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

