हंगामी फळे आणि प्रक्रिया व्यवसायातून उत्कर्ष

चांदेराई (ता. रत्नागिरी) येथील सौ. विद्याराणी झापडेकर यांनी फळे आणि प्रक्रिया व्यवसायातून उत्कर्ष साधून आगळीवेगळी वाटचाल केली आहे.
पुण्यातील ग्रामोन्नती.नेट या संस्थेद्वारे रत्नागिरीत दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी बचत गटांमधील महिलांसाठी उत्सव उद्योजकतेचा, सन्मान उद्योजिकांचा, लघुउद्योगांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सन्मान करण्यात आलेल्या या उद्योजिकेविषयी…

चांदेराई या रत्नागिरी तालुक्यातील छोट्याशा गावात श्री महालक्ष्मी बचतगटाच्या सदस्य, लेखापाल तसेच चांदेराई ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र चालक असलेल्या साौ. विद्याराणी रवींद्र झापडेकर यांची विविध व्यवसायांची वाटचाल खूपच आगळीवेगळी आहे. सौ. विद्याराणी एकत्र कुटुंबात लहानच्या मोठ्या झाल्या. त्यांच्या माहेरी साधारण वीस-पंचवीस माणसं तेव्हा एकत्र राहत होती. त्यांचे वडील आणि काका मिळून आंबा व्यवसाय करायचे. त्यामुळे बागेत काम करण्यापासून ते तो आंबा विक्रीसाठी मार्केटमध्ये पोहोचवण्याचे काम त्या अगदी वयाच्या बाराव्या वर्षापासून करायच्या. त्यामुळे पूर्वीपासूनच त्यांना व्यवसायाबद्दलच विशेष आकर्षण होतं. या व्यवसायात मिळणारा नफा-तोटाही त्यांना माहीत होता. लग्न झाल्यावर त्यांच्या पतीचा हाच मुख्य व्यवसाय असल्याने सौ. विद्याराणी त्यांना मदत करू लागल्या. (उर्वरित मजकूर जाहिरातीच्या खाली)

त्यांच्याकडील आंबा विक्री मुंबई, पुणे, अहमदाबाद या शहरांमध्ये होते. हा व्यवसाय करत असताना सुरवातीला आंबापोळी करणं, आंब्याचा पल्प काढणं अशा गोष्टी फक्त स्वतःपुरत्या होत्या. पण त्यानंतरच्या काळात रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने आंब्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर येत होतं आणि त्या मानाने मार्केटमध्ये त्याला म्हणावा तसा दर येत नव्हता. आंबे पिकून वाया जायचं प्रमाणही वाढू लागलं. एवढे कष्ट करून वाया गेलेले हे आंबे त्यांना पाहवत नव्हते. म्हणून त्यांनी आंबापोळी,आंब्याची साटं तयार करून त्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आंबापोळी कधी काळसर बनणं कधी किंवा रस काढला तर तो नासून जाणं अशा समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि ते नीट जमू लागल्यावर त्याच्या विक्रीचा प्रश्न उत्पन्न होऊ लागला. मग विद्याराणी यांनी त्यांच्या माहेरी भावाच्या दुकानात आणि गावातल्या हॉटेलमध्ये वगैरे या वस्तूंची पाकिटं तयार करून विक्रीला ठेवायला सुरुवात केली. पण त्यानंतर करोना काळात जेव्हा मार्केट डाऊन होतं तेव्हाही त्यांनी अशा प्रकारे आंबापोळी करून विक्री केली आणि यासाठी त्यांना बचत गटातून मिळालेल्या प्रशिक्षणाचा आणि त्यांच्या आई व काकी यांच्या पारंपरिक रेसिपींचा फायदा झाला.

विद्याराणींचा हा व्यवसाय करोना काळातच वाढीला लागला, असं त्या म्हणतात. त्यावेळी सगळी मार्केट बंद होती. ग्राहक बाहेरून वस्तू खरेदी करायला घाबरत होता. त्यावेळी त्यांना गरज होती ती स्वच्छ, सुरक्षित आणि उत्तम दर्जाच्या खाद्यपदार्थांची! तेव्हा त्यांनी आंब्याचे पदार्थ आणि उत्तम प्रतीच्या आंब्याची विक्री घरोघरी जाऊन केली. घरपोच सेवा दिल्यामुळे त्यावेळी त्यांच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळाली. पण याचबरोबर त़्यांना लॉकडाऊनच्या काळात थोडी आर्थिक आणि मानसिक झळही सोसावी लागली.
आंब्याच्या व्यवसायासोबतच विद्याराणी कोकम व्यवसायही करतात. तो करताना त्यांना गेल्यावर्षी खूप नुकसान सहन करावं लागलं. जवळजवळ २५ ते ५० किलो आमसुलं अवकाळी पावसामुळे खराब होऊन वाया गेली. पण अशावेळी काहीतरी युक्ती करून नेहमीच्या ग्राहकांची इच्छा त्यांना पुरवावी लागली. अशा पद्धतीने त्यांचा हंगामी फळांचा व्यवसाय हळूहळू मार्गी लागतो आहे.

विद्याराणीताई थोड्याफार प्रमाणावर दुग्ध व्यवसायही करतात. त्यांच्याकडून रोज अंदाजे सहा लिटर दूध एका हॉटेलात जातं. गोमूत्रापासून घरच्या घरी त्या सेंद्रिय जीवामृतही तयार करू लागल्या आहेत आणि स्वतःच्या बागेमध्ये त्या त्याचा वापर करत आहेत. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन आता येणारा आंबा पूर्णतः नैसर्गिक असतो.

इथपर्यंतच न थांबता विद्याराणीताई ऑनलाइन सेवा, MAHADBT दाखले, तसंच महिलांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्याबाबत डिजिटल सेवा पुरवणं, ई-श्रम कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, दिव्यांग नोंदणी, मोबाइल रिचार्ज करणं इत्यादी कामंही करतात. या पद्धतीची कामं करून त्या वैयक्तिक व्यवसायालाही पुरेसा वेळ देतात. एक स्त्री किती वेगवेगळ्या पद्धतीने संसाराचा ताळमेळ राखून इतकी कामं करू शकते, याचं विद्याराणीताई उत्तम उदाहरण आहेत. अर्थातच याला जोड त्यांच्या पतीचीही आहे. त्यामुळेच त्या प्रत्येक ठिकाणी चांगलं काम करू शकतात.

विद्याराणीताईंना लखपती दीदी पुरस्कार मिळाला आहे. या व्यवसायामुळे त्यांचा आर्थिक स्तर तर उंचावू लागलाच आहे, शिवाय मोठ्या महत्त्वाच्या माणसांशी त्यांच्या चांगल्या ओळखीही झाल्या आहेत. त्यांना त्यांचा हा उद्योग आता वाढवायचा आहे आणि अजून नवीन काही उद्योगही करायचे आहेत. यातही त्यांना नक्कीच यश मिळेल, यात शंका नाही.
विद्याराणी रवींद्र झापडेकर – ९९७०२०२३०९
(शब्दांकन : सौ. राधिका सचिन आठल्ये)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply