नव्या वर्षाचा पहिला रविवार मराठी भाषेसाठी धावण्याचा; रत्नागिरीत तिसरी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन उत्साहात

रत्नागिरी : देशाच्या १३ राज्यांतील ३०० शहरांतील २२००हून अधिक धावपटू नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी रत्नागिरीत मराठी भाषेसाठी धावले. चढ-उतार, वळणांचे रस्ते असलेले २१ किलोमीटरचे अंतर एक तास १० मिनिटे सात सेकंदांत पूर्ण करून अभिषेक देवकातेने स्वतःचाच विक्रम मोडून स्पर्धा जिंकली. अमोल आमुने दुसऱ्या, तर गौरव काकडे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. महिलांमध्ये साक्षी जड्याळ यांनी एक तास २३ मिनिटे २२ सेकंदांची वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला. श्रेया पाटील, ऐश्वर्या लोंढे यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.
मराठी भाषा आधुनिक असून, व्यावसायिक आणि व्यवस्थापकीय वापरासाठीही सक्षम आहे हे दाखवण्यासाठी स्पर्धेची संकल्पना ‘एक धाव मराठी भाषेसाठी’ अशी ठेवल्याचे सुवर्णसूर्य फाउंडेशनचे प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले. स्पर्धकांची नावे, आकडे, ई-मेल पत्रव्यवहार, स्पर्धेशी संबंधित महत्त्वाचे शब्द आणि मार्गदर्शनपर फलक मराठीतच होते. एखाद्या भाषेसाठी मॅरेथॉन होते, याचे हे जगातील पहिले उदाहरण असल्याची भावना मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. काही धावपटूंनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, संत तुकाराम, भागोजीशेठ कीर यांच्या वेशभूषेत, तर काहींनी पारंपरिक वेशात स्पर्धा पूर्ण केली. एका धावपटूने अंगावर मराठी भाषेशी संबंधित बाबींची रंगभूषा करून स्पर्धेत सहभाग घेतला. आयुषी आयुष प्रसाद बाळाला बाबागाडीमध्ये बसवून पाच किलोमीटर धावल्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अनेक अधिकारी, मान्यवर, बॅंक ऑफ इंडियाचे १०८ कर्मचारीही यात सहभागी झाले होते. एकंदरीतच ही स्पर्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

गुलाबी थंडी, नागमोडी वळणांचे चढ-उतारांचे रस्ते, खाडी व समुद्रपरिसर, जैवविविधता, पक्ष्यांचा किलबिलाट आणि नयनरम्य निसर्गसौंदर्य पाहत, मार्गावरील पुलांवरून धावताना वेगळीच ऊर्जा घेऊन धावपटू मराठी भाषेसाठी धावले. एक धाव मराठी भाषेसाठी, रत्नागिरी झाली धावनगरी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत मॅरेथॉनला सुरुवात झाली.

बरोबर सव्वासहा वाजता मंत्री उदय सामंत थिबा पॅलेस रोड येथे पोहोचले. कुठल्याही भाषेला समर्पित असलेली ही जगातली पहिलीच मॅरेथॉन होती आणि खर्या अर्थाने ती आगळीवेगळी ठरली. यापूर्वी मध्यरात्री सुरू होणाऱ्या पहिल्या गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनच्या वेळेसही ते अचूक वेळेवर अचूक वेळेवर आले आणि त्यांनी सर्वांची मने जिंकली होती, असे स्पोर्ट्स टुरिझमसाठी काम करणाऱ्या सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून २१ व १० किलोमीटर स्पर्धेला सुरुवात झाली. नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते पाच किमी स्पर्धेला झेंडा दाखवण्यात आला. या प्रसंगी प्रांताधिकारी जीवन देसाई, नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, पोलिस अधिकारी श्री. माईनकर, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद देवस्थळी उपस्थित होते. मंत्री सामंत व मान्यवरांचे स्वागत सचिन नाचणकर यांनी सन्मानचिन्ह देऊन केले. अशा स्पर्धेकरिता मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी राजाश्रय दिल्याचे सांगून एमआयडीसी, राज्य मराठी संस्था, उदय सामंत फाउंडेशन यांचे भरीव सहकार्य लाभल्याचे देवस्थळी यांनी सांगितले. तसेच सर्व प्रसारमाध्यमे, प्रशासनाविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

महत्त्वाचे धावपटू
गतिदूत – भूषण बांदेलकर , अनिरुद्ध क्षीरसागर, तुषार माळी, योगेश देशमुख, नियती ठक्कर, राधा बसणकर, सूर्यकांत पारधी, अर्चना पांचाळ.
धावदूत – योगिता पाटील, डॉ. स्वप्नील दाभोळकर, जयंत शिवदे, सुरभी सावर्डेकर, संतोष कनोजिया, ओंकार कांबळी, सुरेश वेलणकर, अरविंद काटकर, विजय फिरके, संतोष शिंदे, सचिन अप्पा खरात, आशिष डवळू, योगेश खरपुडे, भारत डांगळे, मिलिंद खानविलकर, महेश गुंदेचा, अभिजित पड्याळ, सुहास राजिवले, सतीश ठोंबरे, व्हीलचेअरवरून सादिक नाकाडे.
प्रेरणादूत – मंगेश प्रभुदेसाई, श्वेता पांडे, डॉ. प्रशांत मडव, माधव काळे, सिद्धार्थ बागव.

छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, संत तुकाराम, दानशूर भक्तीभूषण भागोजीशेठ कीर यांच्या वेशभूषेत धावपटूंनी स्पर्धा पूर्ण केली. त्यांच्या वेशामुळे सर्व धावपटूंनाही प्रेरणा, प्रोत्साहन मिळाले. भारताचा झेंडा घेऊन व संपूर्ण अंगावर मराठी भाषा आणि नारळ-पोफळीच्या लोगोची रंगभूषा ठाण्यातील विठ्ठल कांबळे यांनी केली. रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासमवेत डॉक्टर्स, अभियंते, समाजातील प्रतिष्ठित मंडळींनी धाव पूर्ण केली. सर्व फलक मराठी भाषेत लिहिले होते. बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नरेंद्र देवरे यांच्या नेतृत्वाखाली बॅंकेतील १०८ कर्मचाऱ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. भाट्ये येथे शिवरुद्रा ढोलपथकाने किनारा परिसर ढोल ताशांच्या गजरात दणाणून सोडला. आरोही फिजोओथेरपी व डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, लोकमान्य मल्टीस्पेशालिटी, जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिका सेवा यांच्या वतीने धावपटूंना मदत करण्यात आली.

स्पर्धेचा गटनिहाय सविस्तर निकाल असा
२१ किमी – ३६ ते ४५ वयोगट- पुरुष- सुनील शिवणे, पवन प्रजापती, मल्लिकार्जुन पारडे, महिला- योगिता पाटील, दिव्या जयराम, विद्या रवळे.
४६ ते ५५ वयोगट- महिला- अनिता पाटील, मानसी मराठे, शीतल बने, पुरुष- रवींद्र जगदाळे, अनंत तानकर, जयंत शिवदे.
५६ ते ६५ वयोगट- पुरुष- पांडुरंग पाटील, केशव मोटे, संजय पाटील.
खुला गट- महिला- साक्षी जड्याळ, श्रेया पाटील, ऐश्वर्या लोंढे. पुरुष- अभिषेक देवकाते, अमोल आमूने, गौरव काकडे.
२१ किमी ६६ वर्षावरील महिला- लता आलिमचंदानी. पुरुष- हेमंत भागवत, चंद्रकांत धुरी, प्रमोद शेट्ये.
५६ ते ६५ वयोगट महिला- क्रांती साळवी, मंगलादेवी गवई.

१० किमी : ३६ ते ४५ वयोगट- महिला- इंदुबाला एस. माधुरी शिवदे, मनस्वी गुडेकर, श्वेताकुमारी, पुरुषगट – रूपेश शेलार, दीपक वरपे, वसीम शेख
४६ ते ५५ वयोगट- महिला डॉ. वैशाली गायकवाड, स्मिता अडसूळ, सुनिता अरगडे, पुरुषगट- विठ्ठल अरगडे, शिवाजी पाटील, आतिश खोत,
५६ ते ६५ वयोगट- महिला- संगीता उबाळे, सुभाषिनी श्रीकुमार, शिल्पा भन्साळी, पुरुषगट- सुनील हरिदास, अतुल बांदिवडेकर, लक्ष्मण यादव,
६६ वर्षांवरील पुरुष- दयाकिशन यादव, बजरंग चव्हाण, पुरुषोत्तम गुप्ता, महिला- डॉ. प्रमिला पाटील, शुभांगी देवरुखकर. खुला गट- महिला रोहिणी पाटील, खुशी हसे, मेघा सातपुते, पुरुष- ओंकार बायकर, आदित्य धुळप, शिवम कोष्टी.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply