चिपळूण : धोक्यात आलेल्या सृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल समाजाला सांगण्यासाठी साहित्यिकांनी शाश्वत निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या साहित्यातून द्यायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक प्रा. सुहास बारटक्के यांनी केले.
माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास, असे ब्रीदवाक्य घेऊन राज्यभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेणारे बांधावरचे संमेलन रविवारी (दि. ८ फेब्रुवारी) चिपळूणनजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयूराची’ शिवारात उत्साहात साजरे झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रा. बारटक्के बोलत होते. ते म्हणाले, या संमेलनातून धोक्यात आलेल्या वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल हे समाजाला सांगायला हवे. आजकाल साहित्य संमेलनामध्ये मंडपाचाच खर्च लाखो कोटींच्या घरात जातो. अशा स्थितीत मंडपाशिवाय नैसर्गिक स्थितीत काजूच्या गर्द वनराईत बांधावर आयोजित केलेले हे संमेलन अनोखे आणि अनुकरणीय असून जागोजागी अशी संमेलने व्हायला हवीत.
प्रा. बारटक्के यांनी निसर्ग आणि साहित्याच्या बदललेल्या स्वरूपाचा आढावा घेतला. आपण सर्व निसर्गाचाच एक भाग आहोत. त्यामुळे कवी, लेखकांना निसर्गापासून वेगळे, दूर करता येत नाही. त्यांना कृत्रिम जीवन नसते. माणसाच्या जैविक अस्तित्वापेक्षा माणसाचे सामाजिक, सांस्कृतिक अस्तित्व जास्त महत्त्वाचे असून जीवनाचा आणि जगण्याचा शोध साहित्यातून घेता येतो. साहित्य समस्यांचे निराकरण करते. साहित्य रिझवते, साहित्य शिकवते, साहित्य माहिती देते, साहित्य कैफियत मांडते, साहित्य मानवी जीवनातील कंगोरे दाखविते. म्हणूनच ते आपल्याला जवळचे वाटते, असे प्रा. बारटक्के म्हणाले.
संमेलनाचे उद्घाटन सकाळी शेणाने सारवलेल्या शेताच्या बांधावर दीपप्रज्वलन, सातेरीमातेच्या वारुळाचे पूजन आणि गंगेने भरलेल्या मातीच्या घटाचे पूजन करून झाले.यावेळी पारंपरिक आरज लावून आणि भलरी गाऊन सोहळ्याला प्रारंभ झाला. स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी, डॉ. प्रशांत पटवर्धन, आमदार शेखर निकम, सुभाष लाड, उमेश सकपाळ, प्रशांत यादव, अरुण म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. ते म्हणाले, आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये सर्वच कार्यक्रमाचे सिंहावलोकन करून नव्या रूपात त्याची बांधणी व्हायला हवी. कारण आजच्या तरुणाईची भाषा बदलती आहे. ती संमिश्र असून इंग्रजीच्या जवळ जाणारी आहे. मात्र ती जिवंत असून तिचे स्वागत करायला हवे. चिपळूण एक सांस्कृतिक झाडीवरचे स्पंदन बनले आहे. इथल्या माणसाला साहित्य, कला, नाटक, संगीत या विषयात नुसता रस नाही तर खोल आस्था आहे. ही आस्था त्यांच्या जगण्यामध्ये मिसळली आहे. असा हा सांस्कृतिक प्रेमाचा डीएनए चिपळूणच्या लोकांमध्ये कुठून आला असेल हा प्रश्न पडतो. तेव्हा लक्षात येते की वाशिष्टीच्या प्रवाही पाण्यातून, इथल्या लाल मातीतल्या श्वासातून, ग्रामदैवत भैरीच्या जागृत श्रद्धेतून व महेंद्र पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या परशुरामाच्या आशीर्वादातून हा डीएनए येतो. चिपळूणकरांना सांस्कृतिक वारशाचे एक अदृश्य वरदान मिळाले आहे. ते टिकविण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करूया.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ अभ्यासक विजय जोशी यांचे कविता : तंत्र आणि मंत्र या काव्यविवेचनाला रसिकांनी छान प्रतिसाद दिला. ते म्हणाले, ज्या कवितेमध्ये काव्यगुण, आशयगुण, नादलय गुण आहे, अशी कविता आदर्श समजली जाते. आजचे कवी कविता लिहिल्याबरोबर फेसबुक, व्हॉटस् अॅपवर शेअर करण्याची घाई करतात. हे चुकीचे आहे. जसे लोणचे मुरल्यानंतर चविष्ट होते तसे संस्कारण, परिपूर्ण, तटस्थतेने झालेली कविता छान होते. मग ती पोस्ट करावी. कविता व्याकरणदृष्ट्या, आशयदृष्ट्या योग्य आहे का तपासावे. यासाठी मो. रा. वाळिंबे यांचे सुलभ मराठी व्याकरण हे पुस्तक वापरावे. कविता जखमेतून, वेदनेतून निर्माण होते असे त्यांनी सांगितले.
दुपारी भोजनानंतर सुरेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन सत्रात संगमेश्वरी, तिलोरी, कोकणी आणि खारवी या बोलीभाषांतील कथांचे उत्तम सादरीकरण झाल्याची भावना रसिकांनी बोलून दाखविली. यानंतर नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील २४ कवींचे ‘माती, नाती अन् माणूस’ या विषयावर काव्य संमेलन रंगले. कवी अरुण म्हात्रे यांनी दर्जेदार कवितांचे सादरीकरण केले. त्यांच्या ग्रामीण, शहरी व प्रेमकवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.
संमेलनाच्या समारोप सत्राला डॉ. तानाजीराव चोरगे, प्रकाश देशपांडे, सुहास बारटक्के, सुभाष लाड, शशिकांत मोदी, कवी अरुण म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी मंडप, स्टेज आणि खुर्च्यांच्या कृत्रिम वातावरणाला फाटा देऊन निसर्गाच्या कुशीत, काजूच्या झाडांच्या सावलीत यशस्वी केलेल्या साहित्य क्षेत्रातील पहिल्याच अभिनव प्रयोगाचे अर्थात बांधावरच्या साहित्य संमेलनाचे मनापासून कौतुक केले. संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला रसिकांनी अस्सल ग्रामीण कोकणी पद्धतीच्या ‘शाकाहारी मोंगा-पोपटीचा’ आस्वाद घेतला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे आयोजित या संमेलनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य भारती यांनी सहकार्य केले. जवळपास ३५० रसिक, साहित्यिक आणि रसिकांनी संमेलन अनुभवले.
संमेलनाच्या यशस्वितेसाठी कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर, अरुण इंगवले यांसह संयोजन समितीच्या सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली.






कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

