महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी इंदूर येथील नाट्य भारती संस्थेने काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक हे नाटक सादर केले. स्वतःपुरते जगू नका. तुमच्या जगण्याचा इतरांनाही उपयोग करून द्या, असा संदेश नाटकाने दिला आहे.
नाटकाचे नाट्य रूपांतरण व दिग्दर्शन श्रीराम जोग यांनी केले आहे. म्हाताऱ्या लेखकाच्या आयुष्यात त्याने लिहिलेल्या कथा हे त्याच्या म्हणण्यानुसार, ‘हे त्याचे ‘स्वांतः सुखाय’ लेखन आहे’. त्याचा इतरांना उपयोग करू देणार नाही, असे त्याचे म्हणणे आहे.
लेखक ‘बाबा लेखनकर’ हा लेखक काही लेखन करत आहे, त्याला आवश्यक आणि आवडता ‘एकांत’ त्याच्यासोबत आहे, एकांताशी तो गप्पा मारत आहे, त्याला सांगत आहे की, एकांता, तू मला का आवडतोस, लेखकाची पत्नी हयात नाही. मात्र तिच्या निधनानंतरही लेखकाला ती अधून मधून भेटते, बोलते… त्यांचा संवाद होतो.
एकदा त्या लेखकाला भेटण्यासाठी एक पुस्तक प्रकाशक येतो. लेखकाला विनंती करतो, तुमचा मुलगा माझा मित्र आहे आणि त्याच्याकडूनच तुमच्या कथेचे एक पान मी वाचले आहे. तुमच्या कथा वेगळ्या धाटणीच्या आहेत, त्या वाचकांना आवडतील, आपण त्यांचा कथासंग्रह प्रकाशित करू.
लेखक त्यांना सांगतो गेली ४५ वर्षे या कथा मी माझ्या आनंदासाठी (स्वांतः सुखाय) लिहितो, त्या मला प्रकाशित करायच्या नाहीत. कारण मी त्या भूमिका जगलोय, जगतो आहे. लेखकाच्या मुलाचाही फोन येतो की, बाबा त्या कथा प्रकाशकांना द्या, त्या प्रसिद्ध होऊ द्यात. मात्र लेखक अमान्य करतो.
लेखकाची पत्नी त्याला आभासी रूपाने त्याला दिसते, भेटते. त्यांच्यात त्या कथांविषयी, त्यातील पात्रांविषयी बोलणे सुरू असतानाच, त्या सर्व कथांमधील पात्रे लेखकाच्या भोवती गोळा होतात व आम्हाला या कथांमध्ये गुदमरल्यासारखे होतंय, आम्हाला बंदिस्त का केलंय? आम्हाला जिवंत करा ! आम्हाला वाचकांपर्यंत पोहोचवा! असे सांगतात. मानवी रूपात रंगमंचावर या कथा सादर होतात.
पहिली कथा – अनवाणी
तो, दादा आणि चिंगी या तिघांच्या संवादातून ही कथा रंगमंचावर साकार होते.
दुसरी कथा – वधू
वधूला पाहाण्यासाठी जाणाऱ्या एका व्यक्तीची ही कथा आहे, नारायण, त्याचा मित्र रंगनाथ, बस कंडक्टर आणि प्रभाकर यांच्या संवादातून ही कथा रंगमंचावर सादर होते.
तिसरी कथा – शहाणपणाची टोपी
बँकेतून सेवानिवृत्ती घेतलेल्या एका व्यक्तीला समाजसेवा करावयाची इच्छा असते. ती पूर्ण करण्यासंबंधीची ही कथा. तो, ती, मित्र, आणि म्हातारी अशी पात्रे रंगमंचावर कथा साकारतात.
चौथी कथा – ढग आणि वाळू
यात लेखक लहान मुलांना गोष्ट सांगत आहे. लहान मुले, ढग आणि वाळू यांच्या काल्पनिक पात्रांच्या मदतीने कथा पाहावयास मिळते.
पाचवी कथा – पोटभर बोलणारा माणूस
तो व ती आणि मूक-बधिर शाळेतील एक तरुण शिक्षक या कथेत आहेत. तरुणाला शाळेत हाताच्या खुणांनीच बोलावे लागते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मिळेल त्या माणसाशी मिळेल त्या ठिकाणी तो खूप बोलतो, अशी ही कथा आहे.
सहावी कथा – अवध्य
घटस्फोट घेणाऱ्या एका जोडप्याच्या या कथेत, घटस्फोटाच्या कागदावर सही करून ती व तो विभक्त राहायला सुरुवात करतात, मात्र तिला त्याच्यासोबतचे सगळे क्षण आठवतात. तो काय करत असेल याच्या काळजीने ती त्याला सारखी फोन करत असते. सरतेशेवटी वकिलांना फोन करून आमचा घटस्फोट रद्द करा, अशी विनंती करते. यात तो, ती, वकील, वेटर अशी पात्रे रंगमंचावर येतात.
सातवी कथा – एक असामान्य कथा
‘लहरी’ नावाचा प्रकाशकाकडे ‘चिरंतन’ नावाचा लेखक त्याची कथा प्रसिद्ध करावी म्हणून विनंती करतो, त्याने लिहिलेली कथा वाचून ‘लहरी’ त्याच्याकडून प्रणयकथा, गंभीर कथा, प्राणी कथा अशा कथा लिहून घेतो. मात्र त्या प्रकाशित काही होत नाहीत. चिरंतनचे स्वप्न अधुरे राहते.
लेखक, कथेतील पात्रांच्या मागणीप्रमाणे त्यांना वाचकांसाठी जिवंत करण्याचे ठरवतो, प्रकाशकाला कळवतो की, कादंबरीचे लेखन पूर्ण झाले आहे, सर्व पात्रे जिवंत केली आहेत, आपण कादंबरी प्रकाशित करू. त्यामुळे सर्व पात्रे लेखकाचे आभार मानतात.
कादंबरीचे शेवटचे पान लिहीत असतानाच लेखकाचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याने लिहिलेल्या कादंबरीच्या शेवटच्या पानाचा अर्थबोध न झाल्याने, शेवटच्या पानावरील लिखाण ही त्याची इच्छा आहे असे समजून त्याचे सर्व लिखाण प्रकाशित न होता दुर्दैवाने त्याच्या अंत्येष्टीच्या वेळी नष्ट केले जाते. त्यामुळे ते शेवटी प्रकाशित होऊ शकत नाही. त्याच्याबरोबरच ते नष्ट होते.
वेगळ्याच विषयावरचे नाटक चांगले वठले आहे. नेपथ्याची मांडणी उत्तम आहे. कथांच्या गरजेप्रमाणे रंगमंचावर वेगवेगळ्या भागात प्रकाशव्यवस्थेचा वापर करून परिणामकारकता साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गरजेनुसार संगीत, रंगभूषा व वेशभूषा यांचा वापर करून एका कल्पनारम्य कथानकाला वास्तववादी स्पर्श देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.फक्त स्वतःपुरते जगू नका. असा काहीसा संदेश नाटकातून दिला आहे.
श्रेयनामावली
नाटक : काय लिहून ठेवलंय कुणास ठाऊक
संस्था – नाट्य भारती, इंदूर
नाट्य रूपांतरण / दिग्दर्शक – श्रीराम जोग
मूळ कथाकार – श्रीकांत बोजेवार, नितीन थोरात, मधुकर धर्मापुरीकर, विलास पाटील, विद्यासागर महाजन, विनोद गोरवाडकर, मीनाक्षी अंबेकर, वामन काळे
नेपथ्य – अनिरुद्ध किरकिरे
नेपथ्य सहायक – असीम कानडकर, अमेय वझे, संध्या जोग, ऋत्विक तेलंग, राहुल कवीश्वर, विवेक कुळकर्णी, दिनेश प्रजापत
प्रकाश व्यवस्था – अभिजित कळमकर
रंगभूषा – अंकुर लोकरे
वेशभूषा – श्रुतिका (जोग) कळमकर
संगीत संयोजन – शशिकांत किरकिरे
पात्रपरिचय
श्रीराम जोग – लेखक, नारायण (वधू), लहरी (एक असामान्य कथा)
अनंत मुंगी – एकांत
समृद्धी बेलसरे – लेखकाची बायको
दिलीप लोकरे – प्रकाशक, रंगनाथ (वधू)
श्रीरंग डिडोळकर – तो (अनवाणी), तो (अवध्य), चिरंतन (एक असामान्य कथा)
दर्श बेलसरे – दादा (अनवाणी)
लायना निमगावकर – चिंगी (अनवाणी)
श्रुतिका (जोग) कळमकर – कंडक्टर (वधू), म्हातारी (शहाणपणाची टोपी), बाई (पोटभर बोलणारा माणूस), ती (अवध्य)
तन्वी अकोलेकर – ती (शहाणपणाची टोपी)
लोकेश निमगावकर – तो (शहाणपणाची टोपी), माणूस (पोटभर बोलणारा माणूस)
ऋत्विक तेलंग – मित्र (शहाणपणाची टोपी), वकील (अवध्य)
अमेय वझे – ढग (ढग आणि वाळू)
सायली नामजोशी – वाळू (ढग आणि वाळू), मुलगी (एक असामान्य कथा)
राहुल कवीश्वर – तरुण (पोटभर बोलणारा माणूस), मुलगा (एक असामान्य कथा)
असीम कानडकर – प्रभाकर (वधू), वेटर (अवध्य), मॅनेजर (एक असामान्य कथा)
दीप्ती कुळकर्णी – लेखकाची सून
आर्यन गर्गे – लेखकाचा मुलगा
अनिरुद्ध किरकिरे – बापू
अमृता प्रभाकर – आत्याबाई
हिमांक कुळकर्णी – लहान मूल (ढग आणि वाळू), कुत्रा (एक असामान्य कथा)
मैत्रेयी किरकिरे – लहान मूल (ढग आणि वाळू)
अनन्या किरकिरे – लहान मूल (ढग आणि वाळू)
चरितम लघाटे लहान मूल (ढग आणि वाळू)
स्वरा कळमकर – लहान मूल (ढग आणि वाळू)
(कंसातील नावे नाटकातल्या कथांची आहेत.)
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

