तांडा : स्त्रियांच्या क्रूर कौमार्यचाचणी विरोधातील लढ्याचे नाट्य

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी चंद्रपूरच्या नवोदिता संस्थेने तांडा हे नाटक सादर केले.

स्त्रीचे कौमार्य हा आपल्या समाजाच्या संस्कृतीचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. मुलीचे कौमार्य जपणे हे आई-वडिलांचे कर्तव्य होऊन बसले आहे. वैद्यकशास्त्रातून हे सिद्ध झाले आहे की, शारीरिक श्रम, व्यायाम, खेळ, वाहन चालवणे यामुळे योनिपटल अगोदरच फाटू शकते. काही स्त्रियांच्या शरीरात तसा पडदा नसतो. त्यामुळे अशी चाचणी देऊन स्त्रीला तिचे कौमार्य सिद्ध करायला लावणे हे अत्यंत क्रूर आहे. या अन्यायकारक रूढी, प्रथेवर भाष्य करणारे हे नाटक आहे.

पडदा उघडताच बंजारा समाजातील तांड्यामधील पांडबाची मुलगी मोगरा आणि राक्या यांच्या लग्नाचा सोहळा सुरू असतो. भैरू आणि इतर पंच उपस्थित असतात. विवाहोत्तर मोगरा व राक्या यांना कौमार्यचाचणीसाठी पाठवले जाते. थोड्याच वेळात राक्या उपस्थितांना येऊन सांगतो की, ”मुलगी कुंवार नाही. माल खराब आहे.” तांड्यातील नियमांप्रमाणे दवंडी पिटली जाते, मोगराला ‘तेलपाण्याची’ परीक्षा देण्यास सांगण्यात येते. गरम तेलाच्या कढईत टाकलेले नाणे मुलीला काढायला सांगितले जाते. हात जळला तर मुलगी दोषी आणि जळला नाही तर ती निर्दोष अशी ती परीक्षा असते. मोगरा या परीक्षेला नकार देते. मग पंच मंडळी पांडबाला शिक्षा सुनावतात. वाळीत टाकतात. त्यावर मोगरा दाद मागण्याचा प्रयत्न करते, तर तिला पंचांचा अपमान केल्याबद्दल तिच्या तोंडाला काळे फासून तिची धिंड काढण्यात येते.

त्याच तांड्यातील शुभम नावाच्या मुलाची आई सायकोर हिने वीस वर्षांपूर्वी असाच विरोध या चाचणीसाठी केला होता. तेव्हा तिच्या तोंडात जळता निखारा ठेवण्याची शिक्षा पंचांकडून देण्यात आली होती. तिचा मुलगा शुभमला मोगराची शिक्षा सहन होत नाही. मात्र तांडा सोडून जाणे शक्य नसल्याने तो तांड्यासोबत राहत असतो. सामाजिक संस्थेत काम करतो. मोगराची धिंड काढलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ तो काढतो व शहरातील त्याची वकील मैत्रीण काव्याला पाठवतो. काव्या व तिची मैत्रीण शिवानी हा व्हिडीओ पाहून हादरून जातात, अस्वस्थ होतात. या प्रथेविरुद्ध काहीतरी केले पाहिजे, असे ठरवितात.

तांड्यातील पांडबाला वाळीत टाकल्याने त्यांची अन्न-पाण्यावाचून तडफड होत असते. त्यातच तांड्यातले गुंड त्यांना लुबाडतात. पांडबा पुरता कफल्लक होतो. तांडा सोडून जाण्याचा प्रयत्न करतो, पण तांड्यातील गुंड त्याचा हा प्रयत्न हाणून पाडतात. मोगरावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला जातो, मोगरा व बायजा पोलिसांकडे जातात, पण पोलीस भैरू पंचाच्या विरोधात तक्रार नोंदवून घेत नाहीत. पोलिसात गेल्याचा राग म्हणून भैरू बायजाला गुंडांकरवी ठार मारतो. भैरू तांड्यावर आपला वचक ठेवून असतो.

शिवानीची व तिचा होणारा नवरा राहूल यांची भेट होते, त्यावेळी राहूलही शिवानीला तिच्या कौमार्याविषी विचारतो. शिवानी संतापते व त्याच्यासोबतचा विवाह रद्द करते. कौमार्यचाचणीचा लढा लढण्याचे ठरवते. तांड्यावर जाऊन मोगराला भेटायचे ठरवते.

शुभमच्या मदतीने शिवानी मोगराची भेट घेते. तिला कौमार्यचाचणीच्या विरोधातील कायदे समजावून सांगते. आपण कोर्टात जाऊन या विरोधात न्याय मागू, असे म्हणते. मोगरा म्हणते, ”मला आता शांती हवी आहे. मी कोर्टात जाणार नाही.”

तांड्यात भिंगरी नावाच्या मुलीसोबत तेलपाण्याच्या शिक्षेच्या वेळी मोगरा तिथे येऊन तिला वाचवते. शुभम व सायकोर मोगराला समजावतात, ”तू ठाम उभी राहिलीस, कोर्टात जबानी दिलीस तर हे कायद्याने कायमचं बंद होऊ शकतं.” मोगरा तयार होते व तांड्यातील अशाच अन्यायग्रस्त स्त्रियांना एकत्र करून शिवानी कोर्टात केस दाखल करते.

कोर्टात जाण्यासाठी पांडबा, मोगरा, शुभम, शिवानी निघतात, तोच भैरू व त्याचे गुंड त्यांना अडवून मारहाण करतात. तेवढ्यात पोलीस येतात. कोर्टाच्या आदेशानुसार शिवानीसह सर्वांना संरक्षणात कोर्टात नेले जाते.

शिवानी कोर्टासमोर मोगरा, सायकोर व अन्य अन्यायग्रस्त स्त्रियांची बाजू मांडते. कौमार्यचाचणी फक्त स्त्रीलाच करायला लावणे अन्यायकारक आहे. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय हा अनिष्ट प्रथा व इतिहास दुरुस्त करणारा असेल. या निर्णयामुळे अशा प्रथा कायमच्या बंद होतील, अशी अपेक्षा व्यक्त करते. भैरूचीही बाजू कोर्टात मांडली जाते. त्यात शंभर वर्षांहूनही ही जुनी प्रथा आहे, असा युक्तिवाद केला जातो. मोगरा साक्ष देताना, आपण समाजाविरोधात नसून कौमार्यचाचणीविरोधात आहोत असे सांगते. पांडबाचीही साक्ष होते व शेवटी न्यायाधीश सर्व साक्षी, पुरावे तपासून अंतिम निकाल देतात व कौमार्यचाचणी द्यायला लावणे हा मानवतेला कलंक आहे, संविधानाच्या विरोधात आहे, ही प्रथा कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे, असा निकाल देते. शिवानी व मोगरा यांच्या लढ्याला यश येते.

नेपथ्यरचना करताना राक्याची खोली, पांडबाची झोपडी, विहीर, पंचसभेसाठी झाडाचा पार, काव्या व शिवानी यांची हॉस्टेलची खोली व कोर्टातील रचना यांची मांडणी प्रसंगानुरूप केली आहे. कौमार्यचाचणीची दृश्ये प्रकाशयोजनेद्वारे पडद्यावर साकारली आहेत. ती प्रभावशाली वाटतात.

श्रेयनामावली
संस्था – नवोदिता, चंद्रपूर
नाटक – तांडा
लेखक – निनाद नितीन पाठक
दिग्दर्शक – प्रशांत कक्कड
नेपथ्य – महेश अडगुरवार
प्रकाशयोजना – मिथुन मित्रा
वेशभूषा – मुग्धा खत्री
रंगभूषा – सुशांत भांडारकर
संगीत – वैभव पाराशर
संगीत साह्य – राज बारसागडे
गीत – प्रशांत मडपुवार
पार्श्वसंवाद – माधवी भट

पात्रपरिचय
पांडबाः प्रशांत कक्कड
मोगराः कल्याणी बोरकर
बायजाः अमृता दुधे-राहूड
शिवानीः स्नेहल राऊत
शुभमः गौरव भट्टी
सायकोरः शुभदा कक्कड
पंच भैरू : शंकर लोडे
पंच संजाः शिरीष आंबेकर
पंच बैजा: राजकुमार मुसणे
पंच ४: विलास मांडावकर
पंच ५: सागर जोगी
राक्याः रोशन गजभिये
शंकर राठोडः भीष्म सिंह
दगूबाई राठोडः सोनू वानखेडे
काव्याः स्मृती राऊत
न्यायाधीशः माधवी भट
पंचसेवक आणि राहुलः चेतन धकाते
पोलीस जय सिंहः जितेश जोशी
पोलीस उधमसिंहः अभिषेक श्रीकुंडावार
अॅड ठाकूरः नरेश बोरीकर
पोलीस ३ व भिंगरीचे वडील (देवीसिंह): ओमप्रकाश गुंडावार
भिंगरीः स्नेहल कावळे
भिंगरीची आईः शीतल खोंडे
जांबुवंतः साहिल खत्री
लहान मुलगीः आरना भांडारकर
अन्य बायकाः प्रिया लाडे, स्वरा गायकवाड
अन्य पुरुषः सुरेश गारघाटे

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply