दशानन : राम आणि रावण यांच्यातील आदर्श शोधण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अमरावती येथील सरकार बहुउद्देशीय संस्थेने दशानन हे नाटक सादर केले.

रावणाच्या अंगी पराक्रम असून संयमाचा अभाव असल्याने त्याचा पराभव झाला. भावना व पराक्रम असून चालत नाही त्यांवर नियंत्रण हवे, असा संदेश दशानन नाटक देते.

पडदा उघडताच दसरा उत्सवात होणाऱ्या नाटकातील आरतीचा सराव सुरू असतो. त्यानंतर चावडीवर उत्सवाच्या नियोजनाची चर्चा होते. उत्सवाच्या ठिकाणाची जागा विकलेली असली, तरी यावर्षी त्याच जागेवर उत्सव करू, असे ठरविण्यात येते, उत्सवात करावयाच्या नाटकातील भूमिका ठरवल्या जातात, रामाची भूमिका यंदा राघवने न करता शुभमने करावी व राघवने यंदा रावणाची भूमिका करावी, असे ठरविण्यात येते. हे राघवच्या मनाविरुद्ध असते पण चावडीचा निर्णय तो स्वीकारतो.

राघव हा अण्णा देशमुख यांचा मुलगा असतो. शुभम त्याला भेटतो. चावडीवर ठरले तरीही, राघवला तो ”तुम्हीच राम व्हा”, असे सांगतो. त्यावर ”आता मी रावण बनून दाखवणार” असे राघव त्याला सांगतो. राघव घरी येताच पत्नी शरयू जेवण वाढते. चावडीवरील घडलेल्या घटना तो तिला सांगतो. तेवढ्यात अण्णा देशमुख येतात. शरयू त्यांना म्हणते, ”राघवला तुमच्याशी बोलायचं आहे.” मात्र अण्णा न बोलता निघून जातात. अण्णा देशमुखांना राघवकडून अपेक्षा असतात त्या पूर्ण न झाल्याने त्यांच्यात व राघवमध्ये संवाद नसतो, होतात ते मतभेद. “राम होण्याचा त्याचा प्रयत्न आहे मात्र अण्णांसकट संपूर्ण गाव मला रावण बनवू पाहतंय” असे त्याला वाटत राहते.

अण्णांच्या घरात भजन सुरू असते. इतक्यात राघव त्याच्या वैदेही नावाच्या मैत्रिणीला घरी घेऊन येतो. सगळे चौकशी करतात. त्यांना राघव ”हा आमचा घरगुती मामला आहे, चावडी नव्हे”, असे सांगून घरी पाठवतो. अण्णा यावर ”आधी उर्मट, बेशिस्त होतास. आता निर्लज्ज झाला आहेस” असे म्हणतात, ”इज्जतीच्या रक्षणापायीच मी माझी बहीण प्राजक्ताला गमावलेय. आता आणखी थोडी इज्जत गेली तर काय बिघडलं?” असे उत्तर तो देतो. वैदेही हा घडलेला प्रकार पाहून गोंधळून जाते. उगाचच राघवबरोबर आले, आपल्यामुळे राघवच्या घरात, संसारात विघ्न नको असते तिला वाटते. राघव तिला धीर देतो.”तू निर्धास्त राहा. स्वतःची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घे”, असे सांगतो. वैदेही अण्णांच्या घरी राहू लागते.

राघवच्या या वागण्याचा अण्णांना मनस्ताप होतो. दुसऱ्यांची पोर राघवने घरात आणलेली असते. तिच्याबद्दल कोणालाच काही माहिती दिलेली नसते. त्यामुळे त्यांना सतत चिंता असते. राघवला नोकरी जमली नाही, कामधंदा सोडून दिला. रामाचा आदर्श सोडून दिला आणि ”सर्व कारभार माझ्या हातात द्या!” असे तो म्हणत असतो. मात्र आपण असे केल्यास शरयूने व पिहूने कोणाच्या जीवावर जगायचे? अशी व्यथा ते राघवचा मित्र प्रकाशजवळ व्यक्त करतात.

देशमुखवाड्यात आज पालखी येणार असते. नवरात्रात रामाच्या पालखीची शोभायात्रा काढण्याची प्रथा असते. सर्व गावकरी पालखी सजवायला अण्णा देशमुखांकडे येतात. वैदेहीचा विषय निघतो. जोपर्यंत या विषयाचा खुलासा होत नाही तोपर्यंत राघवला पालखीचा मानाचा टिळा लावला जाणार नाही, असे सर्व ठरवतातय अण्णाही ”दसऱ्याच्या उत्सवापूर्वी याची उत्तरे द्यावी लागतील”, असे राघवला सांगतात.

राघव अण्णांचे मित्र भाऊ यांना भेटायला येतो. ”पालखीच्या दिवशी का आला नाहीत”, असे विचारतो. आध्यात्मिक कार्यक्रमाला आपण जात नसल्याचे ते सांगतात. राघवची रावणाची भूमिका आवडल्याचे सांगतात. भाऊ त्याच्यावर विश्वास दाखवून स्वतःची जमीन राघवच्या ताब्यात देतात आणि ”तू आता या जमिनीत तुझ्या मनाप्रमाणे शिवार फुलव, शेतीचे प्रयोग कर”, असे सांगतात.

जमीन खरेदी करणाऱ्याचा माणूस गायकवाड अण्णांना भेटायला येतो. ”तुम्ही गावकऱ्यांचे मन वळवा”, असे सांगतो, अण्णा त्याला म्हणतात, ”ती जमीन हीराभाऊंची आहे. ते विकणार नाहीत व मीसुद्धा जिवंत असेपर्यंत कारखाना होऊ देणार नाही.” यावर तो दसरा उत्सव उधळवून देऊ असे धमकावतो. तेथे राघव येतो, ”कसा उत्सव उधळवता हे आम्हीही पाहतोच”, असे बजावतो.

वैदेही एकदा शरयूला विचारते, ”राघवने मला इथे आणलं आहे आणि तू त्याला किंवा मला याबद्दल काहीच कसं विचारलं नाहीस?” यावर शरयु म्हणते, ”राघव असाच आहे, मलाही तो लग्न झाल्यानंतर कळला. तो स्पष्ट बोलत नाही, मलाच त्याच्या वागण्याचे तर्क लावावे लागतात. वैदेही विचारते, ”तू काय तर्क लावला आहेस मला आणण्यामागे?” त्यावर शरयु म्हणते, ”राघवने तुला आणताच मला प्राजक्ताची आठवण झाली. त्याने तुला प्राजक्ता समजून आणलं असणार यात मला जराही संशय नाही.”

दसऱ्याचा उत्सवाच्या दिवशी नाटक होते, वैदेहीला घरी आणण्याचे सत्य सगळ्यांना समजते. गैरसमज दूर होतात, अण्णाही वैदेहीला आपली मुलगी मानतात. भाऊ अण्णांना राघवने मेहनतीने पिकवलल्या शेतीचा व्हिडीओ दाखवतातय उत्सवाचा शेवट आनंदात श्रीरामांची आरतीने होतो.

नेपथ्यरचनेत देशमुखांचा वाडा, चावडीची जागा, नाटकाचा रंगमंच, भाऊंची खोली इत्यादी गोष्टी दाखविण्यात आल्या आहेत. प्रकाशयोजनेद्वारे त्यांचा उठावदार पद्धतीने वापर केला गेला आहे. पार्श्वसंगीतही आवश्यकतेनुसार वापरले गेले आहे. उत्सवप्रसंगी ते शोभूनही दिसते.

……
श्रेयनामावली
संस्था – सरकार बहुउद्देशीय संस्था, अमरावती
नाटक – दशानन
लेखन – अभय तृप्ती गिरीश नवाथे
दिग्दर्शन – वैभव आशा नरेंद्र देशमुख
नेपथ्य : शुभम ठाकरे, साह्य : गजेंद्र मेटे
संगीत : अक्षय वैद्य
प्रकाशयोजना : प्रणय कोरे, साह्य : अनुप बहाड
रंगभूषा : नीलेश दद्गाळा, साह्य : स्नेहशील गणवीर
वेशभूषा : अभिजित झाडे
रंगमंचीय व्यवस्था: शुभम सुदा, ऋषभ शिरसाट आणि मिलिंद कहाळे
विशेष आभार –
श्रीमती गौरी अभ्यंकर, सौ. गायत्री खरे आणि शुभारंभ थिएटर्स, अमरावती

पात्रपरिचय
पिहू : स्वराज्ञी देशपांडे
शरयु : रेणुका पुराणिक
सीता/वैदेही : सिद्धी देशपांडे
आजी/त्रिजटा : ऋची वरघट
सीता : श्रद्धा कडू
स्त्री १: आराध्या चिंचोळकर
अण्णा : प्रसाद खरे
भाऊ : अमेय अनसिंगकर
प्रकाश : अभिजित झाडे
भावी : आदिनाथ भारतीय
सत्या : सत्यम किटकटे
राम/शुभम : शुभम ठाकरे
रावण/ राघव : वैभव देशमुख
गायकवाड : नीलेश दद्गाळ
लक्ष्मण/व्यक्ती १ : हिमांशु बानोले
व्यक्ती २: सुयश तामखाने
व्यक्ती ३: ऋषी भंडारकर
व्यक्ती ४ : लोकेश बोंदरकर
व्यक्ती ५: देवाशीष फडणीस
व्यक्ती ६: ऋषीकेश भागवतकर
सुशांत : आदित्य ढोरे
गायक : श्रेयस सरडे
हनुमान/गायकवाड सहायक : निखिल सखे
गायकवाड सहायक : वेद बारलिंगे

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply