अग्निपंख : संस्थान खालसा होण्याच्या कालावधीतील बदलांचे नाट्य

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी रत्नागिरीच्या समर्थ रंगभूमी या संस्थेने अग्निपंख हे नाटक सादर केले.

प्रचलित जातिव्यवस्थेबद्दल तसेच संस्थानांचा अस्त, लोकशाही शासनव्यवस्थेचा उदय झाल्यामुळे संस्थानिकांना मानसिकतेत करावे लागलेले बदल, गांधीहत्येनंतर ब्राह्मण समाजाला अन्य समाजाकडून झालेला त्रास यावर अग्निपंख हे नाटक भाष्य करते.

पडदा उघडताच दुर्गा बाईसाहेब दिवाणखान्यात बसून दप्तरातील काही नोंदी पाहत आहेत. तेवढ्यात नोकर रघु मॅनेजर गोखले येत असल्याची वर्दी देतो, गोखले फाइल्स व पत्र देतात, बाईसाहेब जमिनीचा एक तुकडा विकून मुंबईच्या एका गिरणीत भागीदारी घेण्यासंबंधीच्या गडबडीत असतात. तेवढ्यात रावसाहेब येतात. बाईसाहेब याच व्यवहाराविषयीची माहिती रावसाहेबांना देतात. पण त्यांनी मद्यपान केलेले असल्याने ते बाईसाहेबांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतात. या बेजबाबदार वर्तनाबद्दल बाईसाहेब त्यांना बोलतात. त्यावर रावसाहेब म्हणतात, ”शब्दांचे तीर चालवणे आपणांस चांगले जमते, पण आम्ही शराब का पितो ते आपण का समजून घेत नाही?” बोलता बोलता रावसाहेबांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यानंतर त्यांचे शिकारीला जाणे बाईसाहेब बंद करतात. त्यावर रावसाहेब म्हणतात, ”आम्ही तुमच्या कारभारात येत नाही, तुम्ही आमच्या षौकांच्या आड येऊ नका.”

हे एक संस्थान असते की, तेथील जमीनजुमला, कापड गिरण, सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार ब्राह्मण असलेल्या नानासाहेबांच्या ताब्यात आहेत. रावसाहेब त्यांचे एकमेव वारसदार आणि त्यांना या आर्थिक व्यवहारात अजिबात रस नाही. ते सुशिक्षित आहेत, पण कलासक्त असतात. शिकार करणे, गायन ऐकणे, मद्यपान असे मनस्वी जीवन ते जगतात. म्हणून नानासाहेबांनी सर्व व्यवहार बाईसाहेब (दुर्गा) यांच्याकडे सोपवलेले असतात. त्यामुळे त्यांच्या वागण्यात शिस्त व कठोरपणा आलेला असतो.

बाईसाहेब व रावसाहेब यांना दोन मुले आहेत मुलगा राजशेखर व मुलगी इंदुमती. एका निनावी चिठ्ठीद्वारे बाईसाहेबांना इंदुमतीने मुंबईत कॉलेजात नाटकात सहभाग घेतल्याचे तसेच नोकर रघूचा नातू यशवंत याची व इंदुमतीशी मैत्री झाल्याचे समजते. बाईसाहेब गोखल्यांना पाठवून इंदुमतीला गावाकडे तातडीने बोलावून घेतात. तसेच यशवंतलाही रघूकरवी बोलावणे धाडतात.

यशवंत हवेलीत येतो. बाईसाहेब त्याला म्हणतात, ”मी तुला मुंबईत नोकरी मिळवून देते, तू गावात राहू नको. मुंबईला जा!” त्यावर, ”मला गावात राहून शाळा काढायची आहे. संस्थानं खालसा झाली. आता तुमचं राज्य चालणार नाही”, असे ताठरपणे बोलतो. त्यावर बाईसाहेब सांगतात, ”संस्थानं खालसा झाली असतील, मात्र आम्हाला कोणी खालसा करू शकत नाही.” त्यांनी सर्व प्रकारे समजावूनही यशवंत नकार देतो. बाईसाहेब त्याच्या समोरच रघूला कामावरून काढून टाकतात.

रावसाहेबांना हे कळते. ते रघूला घेऊन यायला निघतात. त्यावर बाईसाहेब म्हणतात, ”रघू वाड्यावर परत आला तर आम्हाला वाडा सोडून जावं लागेल.” या मुद्द्यावरून रावसाहेबांचे व त्यांचे जोराचे भांडण होते. रावसाहेब चिडून त्यांच्यावर हात उगारतात. रावसाहेबांच्या या कृतीने बाईसाहेब दुखावतात व जमीनदारी व आर्थिक व्यवहार यापुढे रावसाहेब पाहतील असे गोखलेंना सांगतात. ते रावसाहेबांकडे येऊन ”फाइलवर आता आपण सह्या करा, बाईसाहेब आता व्यवहार पाहाणार नाहीत”, असे सांगतात. रावसाहेब बाईसाहेबांना ”हे असं अचानक का?” असे विचारतात. त्यावर बाईसाहेब म्हणतात, ”पुरुषार्थ शब्दाचा अर्थ तुम्ही समजावून सांगितलात. आता तुम्ही सगळा कारभार तुमच्या हातात घ्या व सांभाळा.” आपल्या हातून झालेली चूक रावसाहेबांना उमगते. ते पुन्हा कारभार बाईसाहेबांच्या हाती सोपवतात.

बाईसाहेबांना मुलगा राजशेखरने लग्न केले असून तो दक्षिण भारतात हनिमूनला गेल्याचे तसेच त्याची पत्नी ब्राह्मण नसून कायस्थ आहे, हे कळते. रावसाहेब म्हणतात, ”आता तुम्ही काय करता हे आम्हास पाहावयाचं आहे.” राजशेखर व सून सुनीता वाड्यावर येतात, सुनेचे वडील मुंबईत आयसीएस अधिकारी असतात. बाईसाहेब ‘नोकरी करणारा’ अशी त्यांची संभावना करून, ”आम्ही ब्राह्मण जमीनदार आहोत, आमच्या सात पिढ्यांत कोणी नोकरी केली नाही”, असे सुनावतात. सुनीताला हा अपमान वाटतो. ती बाईसाहेबांना उलट उत्तरे देते, बाईसाहेब राजशेखरलाही खडे बोल सुनावतात आणि पंतांच्या मुलीसोबत त्याचे दुसरे लग्न लावण्याचा निर्णय घेतात.

हवेलीवर हे ताणतणाव असताना गावातल्या गिरणीत संप सुरू होतो. गावचा पुढारी सुभानराव व यशवंत एकत्र येऊन कामगारांना भडकवतात. सगळीकडून बाईसाहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असतो. बाईसाहेब हार मानत नाहीत. त्या गिरणी विकून टाकतात.

दरम्यान, महात्मा गांधीजींचा खून होतो आणि खून करणारा ब्राह्मण असल्याने ब्राह्मणांविरोधात दंगली सुरू होतात, सुभानराव व यशवंत या संधीचा फायदा घेतात. बाईसाहेबांची गिरणी व पवनचक्कीला आग लावतात. ही आग आता हवेलीपर्यंत येणार याची कल्पना बाईसाहेबांना येते. दंगलखोर हवेलीपर्यंत येण्याअगोदर बाईसाहेब सर्वांना हट्टाने मुंबईला पाठवतात व ”आम्ही मागाहून येतच आहोत”, असे सांगतात. सगळे मुंबईकडे रवाना होतात. बाईसाहेब एकट्याच हवेलीत राहतात. रावसाहेबांना याचा अंदाज येतो. ते मुंबईला जात नाहीत. ”जे काय होईल ते दोघांचे होईल, आपण फिनिक्स पक्ष्यासारखे राखेतून पुन्हा निर्माण होऊ, त्याच दिमाखाने आकाशात उडू”, असा विश्वास व्यक्त करतात. नाटक संपते.

नेपथ्यकार प्रवीण धुमक यांनी ब्राह्मण जमीनदारांचा दुमजली वाडा प्रेक्षणीय आणि दिवाणखाना, बाईसाहेबांची बसण्याची जागा इत्यादीसह बारीकसारीक सर्व तपशिलासह उभा केला आहे. अनेक महत्त्वाचे प्रसंग घडतात. त्यावेळी आवश्यक नेमकी प्रकाशयोजना महत्त्वाची ठरते. ती कुलभूषण देसाई यांनी व्यवस्थित सांभाळली आहे. पार्श्वसंगीत चिन्मय पिलणकर प्रभावीपणे देऊन प्रसंगांचे गांभीर्य वाढवले आहे.

नाटकात बाईसाहेबांची गुंतागुंतीची भूमिका ऋचा भुते यांनी छान साकारली आहे. स्वभावातील करारीपणा व प्रसंगी हळवेपणा त्यांनी सहजपणे दाखवला आहे. रावसाहेब मिनार पाटील यांनी त्यांना सुयोग्य साथ दिली आहे.

श्रेयनामावली
नाटक : अग्निपंख
लेखक : कै. प्र. ल. मयेकर
संस्था : समर्थ रंगभूमी, रत्नागिरी
दिग्दर्शक : ओंकार प्रदीप पाटील
नेपथ्य : प्रवीण धुमक
संगीत दिग्दर्शन: ओंकार बंडबे, अमेय किल्लेकर
संगीत संयोजन : चिन्मय पिलणकर
प्रकाशयोजना : कुलभूषण देसाई
रंगभूषा : उदयराज तांगडी
वेशभूषा : चैताली पाटील आणि आर्या जोगळेकर-केतकर

पात्रपरिचय
बाईसाहेब : ऋचा भुते
रावसाहेब : मिनार पाटील
इंदुमती : चैत्राली लिमये
राजशेखर : सुशांत केतकर
सुनीता : साक्षी बने
गोखले : संतोष गार्डी
रघू : सुशील जाधव
यशवंत : कौशल मोहिते

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply