महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साताऱ्यातील शिवशक्ती तरूण मंडळाने पोकळ घिस्सा हे नाटक सादर केले.
गावाच्या पाटलाच्या शब्दाबाहेर न जाणारा समाज, चोराला शिक्षा म्हणून श्रद्धेला जोडला जाणारा पाटलाचा स्वार्थ, धाकले पाटील कुस्ती हरल्याने झालेल्या अपमानामुळे पाटील एका कुटुंबालाच गावाबाहेर काढतो. आपल्या अपमानापेक्षा त्याला काहीच मोठे वाटत नाही आणि गावातील लोक हे निमूटपणे सहन करतात विरोध करत नाहीत. हे गाव-गाड्याचे चित्र दाखविण्याचा लेखक-दिग्दर्शकाचा प्रयत्न दिसतो.
पडदा उघडतो, तेव्हा काळोखात कोंबडीच्या खुराड्यातून कोणीतरी कोंबड्या चोरून नेतो. नंतर सकाळ होताच गावगाड्यातील कामे सुरू होतात. बाया-बापड्याची लगबग सुरू होते. कोणाची शेतीला पाणी द्यायला, गुरे-ढोरे सोडायला, मंदिरात दर्शनाला, तर कोणाची डेअरीवर दूध घालायला. या गावाला हागंदारीमुक्त गाव व गाडगेबाबा स्वच्छता अभियानात नंबर मिळालेला असतो. त्यामुळे गावकरी खूष असतात, गावात मारुतीचे मंदिर, व्यायामशाळा असते. गावच्या पाटलाचा मुलगा धाकले पाटील हा कुस्ती खेळणारा असतो. जवळपासच्या गावात तो कुस्ती खेळायला जातो.
गावात हनुमान जयंती साजरी करायची असते. त्याचे नियोजन करण्यासाठी रामभाऊ, पाटील आणि वस्ताद बोलत असतात. पाटील कुस्तीच्या तालमीची व धाकल्या पाटलांच्या प्रगतीची चौकशी करतात. वस्ताद माहिती देतात व आता पोकळ घिस्सा हा नवीन कुस्तीचा डाव शिकवणार असल्याचे सांगतात. पाटील वस्तादांना सांगतात हा नवीन डाव प्रथम धाकल्या पाटलाला शिकवा.
सताची बहीण चिंगी शहरातून सुटीसाठी गावाकडे आली आहे. सता तिला सांगून वावरात शेतीत धरलेल्या कणसांवर लक्ष ठेवायला जातो. चिंगी आल्याचे कळताच शेजारची मुलाणी भाभी चिंगीला भेटायला येते व येताना लाडू आणते. आता ती आई होणार असते. चिंगी म्हणते, ”तुम्ही कशाला लाडू करून आणलेत? आता तर तुम्हाला काय खावंसं वाटेल ते मीच करून देईन.” त्यावर भाभी म्हणते, ”मला हादीरड्डी खावीशी वाटतेय.” चिंगी म्हणते, ”आम्ही त्याला शिदोरी म्हणतो, पण ती तर प्रवासाला जाताना बरोबर नेतात. तुम्ही घरी जा, मी तुम्हाला शिदोरी करून आणते.”
सता चिंताग्रस्त होऊनच घरी येतो. त्याच्या वावरात कोणीतरी गुरे घातल्याने वावरातील पिकाचे नुकसान होते व कणसेही चोरून नेलेली असतात. सता ही हकीगत पाटलांना सांगायला जातो. तर वाटेत मुलाणीचाचा भेटतात. ते सांगतात, ”तू नामजाला सांग. तो चोरी पकडून देईल.” सता नामजाला भेटतो व ”चोरी शोधून दे तुला मी मापटेभर धान्य देईन”, असे सांगतो. नामजा चोरी पकडायच्या कामाला लागतो.
मुलाणीचाचा शहरातून आलेल्या मेहमानाला एसटी स्टॉपवरून घरी घेऊन येत असतात. वाटेत त्यांना धाकले पाटील भेटतात. एकमेकांची चौकशी होते. त्याच्या गावच्या पैलवानाला धूळ चारल्याचे काहीशा अवमानकारक शब्दांत धाकले पाटील सांगतात. त्यामुळे मेहमानाला चीड येते. त्यालाही मेहमानाला कुस्तीची आवड असते. तो धाकल्या पाटलाला आव्हान देतो. दोघांची कुस्ती होते. त्यात धाकले पाटील पडतात (पाठ टेकतात.) कुस्ती बघायला गाव गोळा झालेला असतो. त्या सर्वांसमोर धाकल्या पाटलांची बेअब्रू होते. मुलाणी घरच्यांना हे सांगतात. घरचे घाबरतात आणि आलेल्या मेहमानाला आल्यापावली परत पाठवतात.
नामजा सताच्या शेतात कोणी गुरे घातली, त्याचा शोध घेतो, तो प्रसंग मजेशीर आहे. गावात कोणाकडे कालवडी आहेत. याची माहिती काढतो, त्याला हऱ्याचा संशय येतो. तो त्याच्या घरावर, त्याच्या बायकोवर लक्ष ठेवून असतो. नामजाचा अंदाज खरा ठरतो. हऱ्याकडे कणसे सापडतात व कालवडीच्या शेणातून तिने कणसे खाल्ली असल्याची खात्री नामजाला पटते. तो सताकडे येतो व कणसे हऱ्याने चोरली असल्याचे सांगतो.
हऱ्याला भुरट्या चोऱ्या करायची सवय असते, कोणाच्या कोंबड्या, दूध, गवताच्या पेंढ्याची चोरी करूनच तो आपला संसार चालवीत असतो. एके दिवशी हऱ्याची बायको भागी हऱ्याला सांगते, ”गेले आठ दिवस आपण कोंबडीचं मटण खातोय. आता कंटाळा आलाय. दुसरं काहीतरी घेऊन या.”
दरम्यान, सताने पाटलाकडे हऱ्याची तक्रार केली. पाटील त्याला चावडीवर बोलावल्याचा सांगावा धाडतात. चावडी भरते हऱ्याला त्याच्या विरुद्धची तक्रार सांगितली जाते. हऱ्या ती नाकारण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मुलाची खोटी शपथही घेतो. मात्र मारुतीची शपथ घ्यायला सांगितल्यावर आपण सताच्या शेतातील कणसे चोरल्याचे कबूल करतो, पाटील त्याला शिक्षा म्हणून ‘सताच्या नावाने यंदाच्या हनुमान जयंतीच्या प्रसादाचा खर्च तू करायचा’ असे सांगतात, सताही याला संमती देतो,
चावडीवर दुसराही एक निर्णय होतो. मेहमानाने धाकल्या पाटलाला कुस्तीत पाडलेले असते, ते पाटलाला समजताच त्याचा राग पाटलांना येतो. ते मुलाणीचाचाची गावातील जमीन पडीक राहील व त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी ताबडतोब हे गाव सोडून जावे, असे फर्मावतात. चावडी संपते.
सताच्या बहिणीला हा निवाडा पसंत पडत नाही. ती म्हणते, ”आमचे आर्थिक नुकसान कोण भरून देणार, माझ्या शिक्षणासाठी शहरामध्ये फी भरावी लागते.” गावात राहायचे, तर गावकीचा निर्णय मानावा लागतो, असे सता तिला समजावतो.
मुलाणी कुटुंब गाव सोडून निघते, भाभी चिंगीला भेटायला येते. सर्वांनी काळजी घ्या सांगते. चिंगी भाभीसाठी शिदोरी घेऊन येते व तिला देते.
पोस्टपेटी, मारुतीचे मंदिर, झाड, मुलाणीचे घर नेपथ्यातून दाखवले आहे. प्रकाशयोजनेद्वारे सताचे घर, कुस्तीचा आखाडा दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
श्रेयनामावली
नाटक : पोकळ घिस्सा
संस्था : शिवशक्ती तरुण मंडळ, सातारा
लेख-दिग्दर्शन : संतोष पाटील
नेपथ्य : निरंजन कडव
प्रकाशयोजना : आदिती वर्मा
पार्श्वसंगीत : हर्षदा पाटील
वेशभूषा, रंगभूषा : निर्मला खळदकर
विशेष आभार : मेहता पब्लिशिंग कंपनी, लोकराजा राजर्षि शाहू शिक्षणा संस्था, व्यकंटेश माडगुळकर, राजश्री देशमुख, नरेंद्र पवार
पात्रपरिचय
सता – अथर्व वाघ
चिंगी – ध्रुवी पाटील
भाभी – भक्ती झणझणे
पाटील : हेमंत खळदकर
धाकले पाटील – साहील बडेकर
मुलाणीचाचा – अतुल शिंदे
अम्मी – प्रियांका शिंदे
मेहमान – अनिल पवार
राजाभाऊ – राजाराम शिंदे
नामजा – अनिकेत खताळ
वस्ताद – आकाश धुमाळ
हऱ्या – संतोष पाटील
भागी – सरिता नलावडे
बालगोपाळ – अथर्व पवार, अश्विन पवार, कार्तिक पवार
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)





कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

