रत्नागिरी : जिल्ह्यात पर्यावरणविषयक पर्यटन वाढीला लागण्यासाठी आता महाधनेश म्हणजेच ग्रेट हॉर्नबिल या पक्ष्याची प्रतिमा प्रभावी काम करणार आहे. महाधनेश ही रत्नागिरी जिल्ह्याच्या इकोटुरिझमसाठी फ्लॅगशिप स्पेसीज अर्थात पर्यावरण पर्यटनदूत असल्याचे आज (२२ फेब्रुवारी) रत्नागिरीत जाहीर करण्यात आले. वन विभागातर्फे भरवण्यात आलेल्या पहिल्या पक्षिमित्र संमेलनात ही घोषणा करण्यात आली. धनेश पक्ष्यांचे पर्यावरणातील स्थान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या चार प्रजाती रत्नागिरी जिल्ह्यात आढळतात. ते महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष्यांचे जैवविविधतेतील स्थान, त्यांना वाचवण्याची आवश्यकता यांसह अनेक मुद्द्यांवर या संमेलनात चर्चा झाली. उद्या (२३ फेब्रुवारी) या संमेलनाची सांगता होणार आहे.
‘पक्ष्यांचे अधिवास वाचवणे म्हणजेच जंगले वाचवणे गरजेचे असून, त्यासाठी केवळ वन विभाग नव्हे, तर सर्व नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. एक सकारात्मक दबावगट करणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी उद्घाटन कार्यक्रमात केले. या संमेलनाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रसंचालक जितेंद्र रामगावकर, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तुषार चव्हाण, चिपळूण विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियांका लगड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आदी मान्यवरांसह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, राज्यभरातील पक्षी निरीक्षक, संशोधक, अभ्यासक आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. (उर्वरित बातमी, फोटो आणि व्हिडिओ जाहिरातीच्या खाली)
या परिषदेत सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रतीक मोरे यांनी धनेश पक्ष्यांच्या जीवनचक्रासह त्यांचे महत्त्व सांगणारे आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दल सविस्तर माहिती देणारे सादरीकरण केले. विराज आठल्ये यांनी स्थलांतरी पक्ष्यांबद्दल माहिती देणारे, तर निसर्ग सोबती संस्थेच्या निखिता शिंदे यांनी रत्नागिरीच्या पक्षीवैभवाबद्दल माहिती देणारे सादरीकरण केले. मकरंद सावंत यांनी लिहिलेले दी कल्चर्ड व्हल्चर हे संगीत नाटकही या वेळी झाले. गिधाडांचे महत्त्व त्यातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले.












