ब्रेकपॉइंट : आभासी पात्रांच्या सततच्या प्रवेशामुळे वेगाला ब्रेक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी मुंबईतील गिरगाव येथील सेजल एंटरटेनमेंट संस्थेने ब्रेकपॉइंट हे नाटक सादर केले.

ब्रेकपॉइंट नाटकात लेखक अभिराम व त्याच्या नाटकातील पात्रांचा आभासी सहभाग वारंवार दाखविण्यात आला आहे. त्यामुळे कथानक मंद गतीने पुढे सरकते. नाटकातील अयोग्य प्रसंग आणि शिवराळ भाषाही खटकते.

नाट्यलेखक अभिराम घरी असून तो झोपलेला आहे, त्याचा मित्र शशांक हा त्याला बाहेरून हाका मारत आहे, शेवटी अभिराम उठतो आणि दार उघडतो, शशांक त्याला म्हणतो, तुझ्या लिहिण्याने सगळ्यांच्या झोपा उडाल्या आहेत आणि तू मात्र शांतपणे झोपला आहेस.

अभिराम हा एक नाट्यलेखक असून त्याचे एक नाटक रंगमंचावर प्रदर्शित झाले आहे. त्या नाटकात वादग्रस्त प्रसंग व संवाद असल्यामुळे काही समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याने त्यांनी या नाटकाविरोधात आंदोलने, निषेध करून नाटक बंद पाडलेले असते. अभिरामच्या घरावरही दगडफेक करण्यात येते.

नाटकातील या नाटकाचे निर्माते दांडेकर यांच्याकडे त्या लोकांनी निषेध व्यक्त करून निवेदन दिलेले आहे आणि या नाटकातील वादग्रस्त प्रसंग व संवाद काढा किंवा बदला अन्यथा नाटक चालू देणार नाही, असे बजावले आहे. हेच सांगण्यासाठी शशांक अभिरामकडे आला आहे व तो त्याला नाटकाच्या संहितेत बदल करण्याविषयी सुचवत आहे. मात्र मी नाटकासाठी अनेक पुस्तके वाचली आहेत, प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थिती पाहिली आहे व मगच संहिता लिहिली आहे. त्यामुळे मी संहिता बदरणार नाही, असे अभिराम सांगतो.

शशांक नाट्यनिर्माते दांडेकर यांना फोन लावतो व अभिराम संहितेत बदल करण्यास तयार नसल्याचे सांगतो. अभिरामही दांडेकर यांच्याशी बोलतो व बदल करायचे नसतील तर हे नाटक आपण बंद करू, असे सांगतो.

नाटक बंद केल्यामुळे अभिरामचे मानसिक संतुलन बिघडते. तो त्याने लिहिलेल्या नाटकातील पात्रांना साद घालतो. ती आभासी पात्रे गोळा होतात व त्याच्याशी बोलू लागतात. अभिराममुळे त्या पात्रांच्या व्यथा समाजापुढे मांडल्या गेल्या, असे ती त्याला सांगतात.

नाट्यनिर्माते दांडेकर व शशांक यांच्या सूचनेनुसार अभिराम नवीन नाटक लिहून त्याची प्राथमिक संहिता दांडेकर व शशांक यांना दाखवतो, दांडेकर त्यात काही बदल सुचवितात ते करण्याचे अभिराम मान्य करतो.

नव्या नाटकाची संहिता तयार होते. त्यातील आभासी पात्रे पुन्हा जिवंत होतात. त्यातील वसुधा देशमुख या शिक्षिकेचे पात्र, तिच्या मुलीवर गावचा पुढारी तात्यासाहेबाने केलेल्या अत्याचाराबद्दल त्या पुढाऱ्याला काहीच शिक्षा होत नाही, पुराव्याअभावी तो सुटतो, या प्रसंगावर आक्षेप घेते. ”हा अत्याचार माझ्या मुलीवर तात्यासाहेब या पुढाऱ्याने नाही तर लेखक म्हणून तूच तुझ्या लेखणीतून केला आहेस”, असे ते पात्र सांगते.

लंगड्यासारखे पात्र साक्षीसाठी उपलब्ध असताना त्याच्या तोंडी एकही वाक्य न देता त्याला गप्प केल्यानेच तात्यासाहेब पुराव्याअभावी सुटला आहे.
लंगड्यासुद्धा लेखकावर आक्षेप घेतो. ”मला एकही वाक्य न दिल्यामुळे तात्यासाहेब अत्याचार करू शकला. मला वाक्ये असती तर मी हे होऊ दिले नसते.”
तात्यासाहेब हे पात्र म्हणते, ”देशमुखबाईंनी माझ्या पोषण आहारातील भ्रष्टाचाराची तक्रार केली. यामुळे मला त्यांना धडा शिकवायचा होता, पण त्यासाठी मला वासनांध बनवून मी अत्याचार करतो हे दाखवून तू माझ्यावरही अन्याय केला आहेस.”

हा वाद शेवटी कोर्टात जातो. कोर्टात देशमुखबाई व अभिराम बाजू मांडतात, त्यावर कोर्ट निर्णय राखून ठेवते. पुन्हा अभिरामच्या नाटकातील आभासी पात्रे गोळा होतात. त्याला सांगतात की, तू अलकावर अन्याय केला आहेस, तू नाटकाचा शेवट बदल. त्यानुसार अभिराम नाटकाच्या शेवटी तात्यासाहेब याने अलकावर अत्याचार केल्याचे सिद्ध होऊन त्याला शिक्षा होते, असा बदल करतो.

नाटकातील तुटक प्रसंगांमुळे कथानकाची संगती लावणे अवघड जाते. रंगमंचावर काही अयोग्य प्रसंग कृतियुक्त दाखवण्यात आले आहेत.. तसेच नाटकातील बरेचसे संवाद शिवराळ भाषेत वापरून कथानक गडद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नटेश्वराचे पूजन करून, रंगदेवतेचे स्मरण करून नाटकाला प्रारंभ होत असतो. त्या पार्श्वभूमीवर बलात्कारासारखा बटबटीत प्रसंग दाखवावा का, अश्लील शब्द वापरावेत का, याचा विचार या नाटकाच्या निमित्ताने व्हायला हवा.

श्रेयनामावली
नाटक : ब्रेकपॉइंट
संस्था : सेजल एंटरटेनमेंट, गिरगाव, मुंबई
लेखक-दिग्दर्शक – सागर प्रकाश माने
सहाय्यक दिग्दर्शक – सुमित चंद्रकांत घाग
प्रतिनिधी – केतन सुभाष परब
नेपथ्य – यश नामानंद मोडक
प्रकाशयोजना – साईप्रसाद नंदकुमार शिर्सेकर
पार्श्वसंगीत – सागर प्रकाश माने, स्वीकार रामकृष्ण पाटील, साहिल जयदीप खेडस्कर
वेशभूषा – चंचल किशोर शिंदे
रंगभूषा – वर्षा प्रवीण जाधव
संगीत संयोजन – सुजित सामंत, अनिकेत तांबे, श्रीधर पाचंगे
गायक – नंदकुमार गोगटे
रंगमंच व्यवस्थापन – थिएटरवाले, मुंबई
विशेष आभार – रंगखांब, कणकवली

पात्रपरिचय
अभिराम – सुस्मिल चंद्रकांत धाग
शशांक – स्वीकार रामकृष्ण पाटील
अॅरिस्टोफेन्स – महेश बळीराम गायकवाड
युपोलिस – केतन सुभाष परब
चिवे – चार्वी पंकज शिंदे
इशिका – पूनम रघुनाथ ओव्हाळ
डॉ. जोशी – मानसी शैलेश नाईक
कमल – श्वेता उदय सावंत-देसाई
स्वप्ना – संचिता सुहास जोशी
यशवंत – रितिक महेश रावते
हिप्नोज – काजल संतोष सावंत
चंदा – शुभांगी अतुल देसाई-पवार
दांडेकर – प्रसंजित प्रकाश मोहिते
वसुधा – प्रतिमा प्रशांत राणे
लंगड्या – साहिल जयदीप खेडस्कर
तात्यासाहेब – सागर प्रकाश माने
अलका- श्रुती शिवाजी नाईक
न्यायाधीश- जयराम मोहन फड
लेखकाचे पात्र –
अमेय शिरीष कुलकर्णी
आर्यन विनोद दंडवते
वर्षा प्रवीण जाधव
सागर अभिमन्यू आहिरे
गोरख हिरामण म्हात्रे
संपदा विवेक दांडुक

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply