महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी कल्याणच्या सविता नाट्यनिर्मित कलामंचाने निब्बाण हे नाटक सादर केले.
निब्बाण हे नाटक भगवान बुद्धांचा संदेश अधोरेखित करणारी आणि अवयवदानाच्या चळवळीची जनजागृती करणारे आहे.
पडदा उघडताच अॅम्ब्युलन्सचा आवाज येतो, हॉस्पिटलमध्ये थोरवे हे मेडिकल असिस्टंट फोनवर डॉ. जोशी, डॉ. कुलकर्णी यांच्याशी बोलत आहेत, शस्त्रक्रिया, रक्तगट, रक्तपुरवठा या विषयांवर चर्चा सुरू आहे आणि पुन्हा एक फोन येतो त्यावर थोरवे म्हणतात, ”काय?”
इथून फ्लॅशबॅकमध्ये कथानक सुरु होते. अवयवदानाविषयी जनजागृती व अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारे डॉ. सुहास कुलकर्णी (ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर) आणि थोरवे यांच्यात मुलाच्या अॅडमिशनसंबंधी बोलणे सुरू असते, तसेच पनवेल हॉस्पिटलमधून या केस ट्रान्फर केलेले आदित्य पटवर्धन तुम्हाला भेटू इच्छितात. त्यांना बोलवायचे का, असे विचारतात, डॉ. कुलकर्णी आदित्य पटवर्धन यांना बोलावतात. त्यांच्या आजाराची माहिती घेतात. डॉ. मेहता व डॉ. जोशी यांनाही आपल्या केससंदर्भात माहिती आहे, असे पटवर्धन डॉ. कुलकर्णी यांना सांगतात.
पटवर्धन नामवंत बिल्डर असतात. त्यांचे लिव्हर मद्यपानाच्या सवयीमुळे खराब झाल्याने, त्यांना त्याचे प्रत्यारोपण करून घ्यावयाचे असते. अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णांच्या यादीमध्ये त्यांचा सोळावा क्रमांक असतो. पटवर्धन डॉ. कुलकर्णी यांना विचारतात, ”ही अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया लवकरात लवकर केव्हा होऊ शकते? मला ती लवकर करून घ्यावयाची आहे.’ ‘डॉ. कुलकर्णी सांगतात, ”भारतात अद्याप अवयवदानाविषयी अपेक्षित जनजागृती झालेली नसल्यामुळे लोक अवयवदान करित नाहीत. सध्या मृत्युदरही कमी असल्याने नेमकं सांगता येऊ शकत नाही. नियमानुसार प्रक्रिया राबविली जाईल, पण कदाचित तुमच्या अगोदरच्या पेशंटनी त्यांची मागणी रद्द केली, तर तुमचा नंबर लवकर लागू शकतो.”
इकडे, म्युनिसिपालिटीकडून एका निवासी सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना इमारत पाडण्याची नोटीस येते. सर्व रहिवासी एकत्र येऊन त्या विरोधात आंदोलन करतात, बिल्डरलॉबी व भ्रष्ट म्युन्सिपल कर्मचारी यांच्यावर त्यांचा रोष असतो. आंदोलनाचे नेतृत्व विश्वजित कांबळे हा तरुण करत असतो. नोटिशीविरोधात तो कोर्टात अपील करतो. त्यामुळे त्याला धमकीचे फोनही येतात.
ट्रकने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील व्यक्तीला अपघात होतो. पेशंटला हॉस्पिटलला आणले जाते. मात्र दुर्दैवाने त्याचे निधन होते. त्या पेशंटच्या इच्छेनुसार त्याचे कुटुंबीय त्याच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतात. त्या पेशंटचे नाव विश्वजित कांबळे आहे, अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांना थोरवे यांच्याकडून कळते. त्यांना वाईट वाटते. कारण अवयवदान चळवळ प्रसिद्धीसाठी डॉ. कुलकर्णी यांनी पथनाट्यस्पर्धा आयोजित केलेली असते. त्यात विश्वजितच्या संघाने भाग घेऊन प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवलेले असते. त्यामुळे विश्वजित कांबळे याला डॉ. कुलकर्णी ओळखत असतात.
विश्वजितची आई डॉ. कुलकर्णी यांना भेटून त्याचे अवयव कोणत्या व्यक्तिसाठी उपयोगात आणले जाणार हे विचारते. मात्र कायद्यानुसार ‘अवयव देणारा व घेणारा’ यांची नावे गुप्त ठेवणे बंधनकारक असल्याचे सांगतात. मग आई अशी इच्छा व्यक्त करते की, विश्वजितने त्याचे आयुष्य सामाजिक कार्यासाठी वाहून घेतले होते, असे सचोटीने, सामाजिक कार्य करणाऱ्या, प्रामाणिक, गरजू व्यक्तीला त्याचे अवयव प्रत्यारोपण करावे. मात्र अशी तरतूद नसल्याचे डॉ. कुलकर्णी सांगतात.
पटवर्धन यांच्या अगोदरच्या रुग्णांनी अवयवांची मागणी रद्द केल्याने पटवर्धन यांचा क्रमांक येतो. त्यांना भेटायला बोलावण्यात येते. पटवर्धन डॉ. कुलकर्णी विनंती करतात की, मला ज्या व्यक्तीचे अवयव प्रत्यारोपण करण्यात येणार आहे, त्यांना मला आर्थिक मदत करावयाची आहे. मात्र डॉ. कुलकर्णी कायद्यात तशी तरतूद नाही, असे सांगतात. मात्र रुग्णाच्या नातेवाईकांची इच्छा जी नैतिकतेवर आधारित आहे, ती मी तुम्हाला सांगू शकतो, असे सांगून ते म्हणतात, ”त्यांना त्यांच्या नातलगाचे अवयव त्याच्यासारख्याच, सामाजिक काम करणाऱ्या, शोषितांसाठी लढणाऱ्या, प्रामाणिक, गरजू व्यक्तीला अवयव दान करावेत, अशी आहे.”
पटवर्धन यांनी खूप अडचणींना तोंड देत आपला व्यवसाय उभा केलेला असतो. प्रसंगी व्यावसायिक तडजोडी केलेल्या असतात. त्यामुळे विश्वजितच्या कुटुंबीयांच्या इच्छा ऐकल्यानंतर ते म्हणतात, मी दात्याच्या इच्छेचा आदर करतो आणि माझी अवयव प्रत्यारोपणाची मागणी मागे घेतो.
डॉ. कुलकर्णी त्यांना पेशंट कन्सेन्ट फॉर्म भरायला देतात, पटवर्धन म्हणतात, ”डॉक्टर, मी तर मागणी रद्द करण्याच्या फॉर्म मागतोय. तुम्ही कन्सेन्ट फॉर्मवर सही करून घेत आहात. डॉ. कुलकर्णी त्यांना सांगतात, ”तुम्ही तुमच्या अंतरात्म्याचा कौल ऐकून, प्रसंगी केलेल्या तडजोडी मान्य केल्यात, नीती-अनीतीची जाणीव तुम्हाला झाली, हीच बुद्धांची शिकवण आहे.”
मानवी जीवन विविध विकारयुक्त आहे. त्यातून नैतिकता-अनैतिकता, नीती-अनीती या संकल्पना जन्माला येतात. शरीरातील षड्रिपूंवर (काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर), विकारांवर विजय मिळवावा, असे हीच गौतम बुद्धांची शिकवण सांगते. पण पूर्णपणे ते शक्य झाले नाही, तरी त्या दिशेने सुरू होणारा प्रवास स्वागतार्ह आहे. असा संदेश हे नाटक देते.
नेपथ्य रचनेत डॉ. कुलकर्णी यांचे हॉस्पिटल दाखविण्यात आले आहे. योग्य प्रकाशयोजनेद्वारे आंदोलन, पथनाट्य इत्यादी अन्य प्रसंग दाखविण्यात आले आहेत. पार्श्वसंगीत आवश्यकतेनुसार योग्य आहे.
श्रेयनामावली
संस्था – सविता नाट्यनिर्मित कलामंच, कल्याण
नाटक – निब्बाण
लेखक / दिग्दर्शक – दिनेश नामदेव जाधव
निर्माता – नरेंद्र अनंत पवार
नेपथ्य – प्रदीप पाटील
पार्श्वसंगीत – महेंद्र मांजरेकर
प्रकाशयोजना – साई शिर्सेकर
रंगभूषा – शेखर खेमनाईक
वेशभूषा – सुजय पवार
पात्रपरिचय
सुहास कुलकर्णी – अजित नामदेव देशमुख
अदित्य पटवर्धन – दिनेश नामदेव जाधव
विश्वजित कांबळे – समाधान लोंढे
आई – तन्वी बनसोडे
थोरवे – सुजय पवार
बेवडा – रोहित भोसले
मावळा – नंदकुमार कोटकर
बायको – मीरा केदारे
बुद्धमूर्ती – दर्शन अजित देशमुख
इतर – प्रकाश साखरे, प्रवीण कांबळे, सचिन बच्छाव
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)





कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

